क्रोनिन, आर्चिबॉल्ड जोसेफ : (१९ जुलै १८९६–  ). स्कॉटिश कांदबरीकार. इंग्रजीत कादंबरीलेखन. त्याचा जन्म स्कॉटलंडमधील कार्‌ड्रॉस ह्या गावी झाला. ग्‍लासगो विद्यापीठातून वैद्यकाची पदवी (१९१९). १९२५ मध्ये एम्. डी. पहिल्या महायुद्धाच्या काळात नाविक दलात काम. ‘मेडिकल इन्स्पेक्टर ऑफ माइन्स फॉर ग्रेट ब्रिटन’ ह्या पदावर काम केले (१९२४). वेल्श आणि लंडन येथे काही काळ वैद्यकीचा खाजगी व्यवसायही केला. १९३० मध्ये तो आजारी पडला आणि त्यानंतरच्या विश्रांतिकाळात हॅटर्स कॅसल (१९३१) ही आपली पहिली कादंबरी त्याने लिहावयास घेतली. ह्याच वर्षी वैद्यकीचा व्यवसाय सोडून देऊन सर्वस्वी लेखनाला वाहन घेण्याचा निर्णय त्याने घेतला. हॅटर्स कॅसलला फार मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. त्यानंतरच्या कादंबऱ्यांतील द स्टार्स लुक डाउन (१९३५), द सिटॅडेल (१९३७), द कीज ऑफ द किंगडम (१९४२), शॅनन्स वे (१९४८) आणि द स्पॅनिश गार्डनर (१९५०) ह्या काही होत.

आरंभीच्या कादंबऱ्यांत त्याने औद्योगिक संस्कृतीतील आर्थिक, सामाजिक आणि नैतिक प्रश्नांचे चित्रण केले. नंतरच्या कादंबऱ्यांचा कल मात्र धार्मिक आणि चिंतनात्मक विषयांकडे दिसतो. सर्वसामान्य वाचकांसाठी त्याने कादंबऱ्या लिहिल्या. कलात्मक प्रयोगशीलतेचा वा तरल आत्माविष्काराचा भाग त्यांत कमी आहे. अ साँग ऑफ सिक्स पेन्स (१९६४) ह्या नावाने त्याने आत्मचरित्र लिहिले आहे.

हातकणंगलेकर, म. द.