शॉ, जॉर्ज बर्नार्ड : (२६ जुलै १८५६– २ नोव्हेंबर १९५०). विख्यात ब्रिटिश नाटककार, समीक्षक, जॉर्ज बर्नार्ड शॉपत्रकार आणि समाजवादाचा खंदा प्रचारक. जन्म आयर्लंडमधील डब्लिनचा. कर्तृत्वशून्य वडील आणि गायिका होऊ पाहणाऱ्या आईच्या प्रेमशून्य संसारातील तीन अपत्यांपैकी सर्वांत धाकटा. त्याच्या दोन बहिणींपैकी एक क्षयाने वारली. दुसरी, संगीत-साधनेसाठी लंडन गाठणाऱ्या आपल्या आईसोबत गेली. वडिलांबरोबर राहून डब्लिनमध्येच दोन वर्षे कारकुनी केल्यावर शॉही आपल्या आईकडे लंडनला गेला. तेथे काही काळ आर्थिक आधारासाठी त्याला आपल्या आईवरच अवलंबून राहावे लागले. शॉचे औपचारिक शिक्षण फारच थोडे झाले होते. तथापि स्वप्रयत्नाने त्याने अनेक विषयांचा अभ्यास करून बहुश्रुतपणा प्राप्त केला होता. घरातील संगीताच्या वातावरणाच्या प्रभावातून तो पियानो वाजवायला शिकला होता. लंडनमध्ये तो आला, तेव्हा तो अतिशय लाजरा-बुजरा होता तथापि आपल्या व्यक्तिगत जीवनाची गुणवत्ता वाढवत, लंडनच्या सामाजिक जीवनात आत्मविश्वासाने वावरण्यासाठी सतत आत्मप्रसिद्धीच्या झोतात राहू पाहणारे स्वत:चे एक धीट, बेधडक व्यक्तिमत्त्व त्याने घडविले. संगीतावर लेख लिहून सुरू केलेल्या पत्रकारितेबरोबर तो कांदबऱ्याही लिहीत होता आणि त्या प्रकाशकांकडून नाकारल्या जात होत्या. कमाईही फारशी नव्हती. अशा खडतर परिस्थितीला निश्चयाने तोंड देत लंडनमधल्या बुद्धिमंतांच्या वर्तुळांतून तो वावरू लागला आणि तिथल्या चर्चांमध्ये भाग घेऊन आपल्या उपस्थितीची जाणीव तिथल्या मंडळींना ठसठशीतपणे करून देऊ लागला. अशाच एका वर्तुळात त्याला त्याचा आयुष्यभराचा मित्र ⇨सिडनी वेब भेटला. एक बुद्धिमंत आणि लेखक म्हणून त्याची काहीएक प्रतिमाही घडत होती. त्याला असलेल्या अर्धशिशीच्या विकारावर उपचार म्हणून तो शाकाहारी झाला (१८८१) आणि तेही त्याच्या प्रतिमेचे एक वैशिष्ट्य ठरले. १८८२ साली ख्यातनाम अमेरिकन अर्थतज्ञ ⇨ हेन्री जॉर्ज ह्याच्या एका व्याख्यानाच्या प्रभावातून शॉ समाजवादाकडे वळला आणि पुढे फेबिअन सोसायटी ह्या लंडनमधील समाजवादी संघटनेचा एक आधारस्तंभ बनला. इंग्लंडमध्ये समावाद आला पाहिजे पण तो क्रांतीच्या मार्गाने नव्हे, तर योग्य त्या सामाजिक- आर्थिक सुधारणांमधून येईल. अशी फेबिअन समाजवाद्यांची धारणा होती. [⟶ फेबिअन समाजवाद]. पोथीनिष्ठ सैद्धांतिकतेपेक्षा विवेक आणि मानवतावाद ह्यांवर शॉचा अढळ विश्वास होता आणि तो त्याच्या लेखनातूनही अटळपणे प्रकट झालेला आहे.

सामाजिक-राजकीय, तसेच वाङ्‌मयीन क्षेत्रांत सक्रिय असलेल्या शॉला जे अनेक बुद्धिमान, सर्जनशील स्नेही मिळाले, त्यांत ⇨ॲनी बेझंट, ⇨ विल्यम मॉरिस ह्यांच्या सारख्यांचा समावेश होतो. त्यांतील काहींनी शॉच्या कादंबऱ्या नियतकालिकांतून क्रमश: प्रसिद्ध केल्या तथापि शॉ नाट्यलेखनाकडे उत्साहाने वळला, तो विल्यम आर्चर (१८५६–१९२४) ह्या त्याच्या मित्रामुळे. ⇨इब्सेनच्या नाट्यकृतींचा अनुवादक, तसेच एक समीक्षक म्हणून आर्चर मान्यता पावला होता. पत्रकारितेत शॉला निश्चित उत्पन्न मिळेल, अशी व्यवस्था त्याने केली. आर्चर आणि शॉ ह्यांनी परस्परांच्या सहकार्याने एक नाटक लिहिण्याचाही प्रयत्न केला होता.

शॉच्या काळी पश्चिमी जगातील नाटककरांवर इब्सेनचा मोठा प्रभाव होता. शॉदेखील त्याचा चाहता होता. क्विटेसन्स ऑफ इब्सेनिझम (१८९१) हे त्याचे इंग्रजी भाषेतले इब्सेनवरचे पहिले पुस्तक होय. इब्सेनिझम घोस्ट्‌स हे नाटक लंडनच्या रंगभूमीवर आणणाऱ्या ‘इंडिपेन्डेन्ट थिएटर सोसायटी’ ह्या संस्थेने शॉकडे नाटकाची मागणी केली आणि शॉनेही विल्यम आर्चरच्या सहकार्याने पूर्वी लिहिलेले एक नाटक सुधारून आणि विडोअर्स हाउसेस (प्रयोग १८९२) हे नाव देऊन त्या संस्थेला दिले. त्यांनर शॉने साठांहून अधिक नाटके लिहिली.

शॉ नाट्यलेखन करू लागला, त्या वेळी नाटककार म्हणून ख्याती पावलेले ⇨ आर्थर विंग पिनीरो आणि ⇨ हेन्री आथॅर जोन्स हे नाटककार आधुनिक वास्तववादी नाटके लिहिण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांचा दर्जा बेताचा होता. त्यातून ब्रिटिश रंगभूमीवर निर्माण झालेली पोकळी इब्सेनची नाटके तिथे सादर होऊ लागल्यानंतर अधिकच तीव्रतेने जाणवू लागली. ती पोकळी शॉच्या नाटकांनी समर्थपणे भरून काढली.

साहित्यनिर्मितीमागे सामाजिक हेतू असला पाहिजे, ही शॉची स्पष्ट भूमिका होती. प्रत्येक नाटक लिहिण्यामागचा आपला हेतू शॉने त्या त्या नाटकाला आपली प्रस्तावना जोडून स्पष्ट केला आहे. ए डॉल्स हाउससारखे इब्सेनचे नाटक शेक्सपिअरच्या मिड्‌समर नाइट्‌स ड्रीमसारखे कायम ताजे-तल्लख वाटणार नाही पण त्या नाटकाने साधलेला सामाजिक परिणाम शेक्सपिअरच्या त्या नाटकापेक्षा मोठा असेल आणि सर्वश्रेष्ठ प्रतिभेने तेवढे करणे पुरेसे आहे, अशा आशयाचे उद्‌गार र्शाने काढलेले आहेत. ह्या धारणेला अनुसरून शॉने समाजाच्या सदसद्विवेवकबुद्धीची जपणूक करण्याची भूमिका स्वीकारली. त्यामुळेच त्याचे साहित्य प्रचारकी न बनता कलात्मक पातळी गाठू शकले. कोणत्याही सामाजिक व्यवस्थेत एक प्रकारची एकात्मता आणि आत्मसुसंगती असते. त्यामुळे तिच्या कोणत्याही भागाचा अभ्यास करून तिच्या समग्र स्वरूपाचे आकलन होऊ शकते, असे शॉचे मत होते. ह्या समग्रतेचे जपलेले नेमके भान त्याच्या नाट्यसृष्टीतून प्रत्ययास येते.

शोषणावर आधारलेल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये स्वत:ला निरपराध समजणारेही त्या शोषणात अजाणतेपणे कसे सहभागी झालेले असतात, हे शॉने त्याच्या विडोअर्स हाउसेस आणि मिसेस वॉरेन्स प्रोफेशन (लेखन १८९३, प्रयोग १९०२) ह्या नाटकांतून दाखवून दिले. द फिलॅंडरर नाटकात (लेखन १८९३, प्रयोग १९०५) त्याने तत्कालीन ‘फॅशनेबल’ बुद्धिमंतांना आपले लक्ष्य केले. ह्या नाटकातील दु:खद सामाजिक वस्तुस्थिती विचारात घेऊन शॉने ह्या नाटकसमूहाला अप्रिय नाटके –अन्‌प्लेझंट प्लेज– असे म्हटले होते. त्यानंतर त्याने काही सुखद नाटके  (प्लेझंट प्लेज) लिहिली. आपल्या वैचारिक बैठकीशी तडजोड न करता व्यावसायिक रंगभूमीसाठीही त्याने हे नाट्यलेखन केले. ह्या नाटकांपैकी आर्म्स अँड द मॅन (प्रयोग १८९४) आणि कॅन्डिडा (प्रयोग १८९७) ही विशेष उल्लेखनीय आहेत. आर्म्स… मध्ये त्याने युद्धाचा विषय हाताळला. ज्यांना युद्धाचे आणि सैनिकी पराक्रमाचे आकर्षण वाटते, त्यांना युद्धातील अंगभूत रानटीपणाचा विसर पडतो, हे केवळ पैशासाठी युद्धावर गेलेल्या एका सैनिकाच्या व्यक्तिरेखेद्वारे दाखवून तो युद्धाबद्दल ‘रोमॅंटिक’ कल्पना बाळगणाऱ्या तत्कालीन ब्रिटिश मानसिकतेला धक्का देतो. ह्या नाटकाचा संदेश लक्षात घेतला असता, तर पहिले महायुद्ध झाले नसते, असा दावा शॉने केला होता. कॅन्डिडा म्हणजे इब्सेनच्या ए डॉल्स हाउसची र्शाने त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोणातून केलेली नवी मांडणी, असे म्हटले जाते. ख्रिश्चन समाजवादी विचारांचा आपला धर्मोपदेशक नवरा आणि अपरिपक्व, रोमॅंटिक कल्पनांनी झपाटलेला कवी ह्यांच्यापैकी कुणाच्या प्रेमाचा स्वीकार करायचा, असा प्रश्न समोर असलेली कॅन्डिडा ह्या दोघांपैकी आपल्या नवऱ्याचाच स्वीकार करते. आपल्या विवाहाचा सखोल आशय समजणारी आणि तिच्यावर प्रेम करणाऱ्या दोन्ही पुरुषांना पूजनीय वाटणारी ही नायिका आहे. स्त्री-पुरुषांचे नाते, विवाह ह्यांसंबंधीचा आपला तात्त्विक विचार शॉने मॅन अँड सुपरमॅन (प्रयोग १९०५) ह्या नाटकात विनोदी पद्धतीने मांडला. स्त्री आणि पुरुष यांच्या जीवनशक्तींतून (लाइफ फोर्स) जीवनाला नवे परिमाण देणाऱ्या क्रमविकासाची एक संथ, सहेतुक प्रक्रिया चालू असते आणि तीतून महामानव निर्माण होईल. महामानव निर्मितीसाठी ह्या प्रक्रियेतील सातत्य राहावे म्हणून स्त्रीने पुरुषाचा पाठलागही करावा. ह्या नाटकाची नायिका नायकाचा पाठलाग करून त्याला आपल्याशी विवाह करण्यास भाग पाडते. ह्या नाटकाचा नायक म्हणजे डॉन वॉनच्या प्रचलित प्रतिमेचे शॉने घडविलेले रूप आहे. हा डॉन वॉन स्वैराचारी नसून स्त्रीबरोबरच्या आपल्या नात्याची जीवशास्त्रीय नियती स्वीकारणारा आहे. ह्या नाटकाच्या अंतर्गत डॉन वॉन इन हेल हे आणखी एक नाटक शॉने घातले असून, त्याचा प्रयोग सामान्यतः स्वतंत्रपणे करण्यात येतो. बॅक टू मेथ्युसिला (प्रयोग १९२२) ह्या आपल्या नाटकात शॉने आपले सर्जनशील क्रमविकासाचे तत्त्वज्ञान मांडले. स्वतःमधल्या विध्वंसक शक्तींना समर्थपणे प्रतिकार करू शकेल, असा महामानव सर्जनशील क्रमविकासातून उत्क्रांत झाला, तरच मानवी समस्या सुटतील आणि मानवी संस्कृतीला वाचवता येईल, असा विचार शॉने ह्या नाटकाच्या पाच भागांत सांगितला. इ. स. पू. ४००४ मध्ये ⇨आदम व ईव्ह ह्यांना मृत्यूचे ज्ञान होते, येथपासून इ. स. ३१,९२० पर्यंतचा माणसाचा शॉप्रणीत जीवशास्त्रीय इतिहास येथे नाट्यात्म केला आहे. नाटकाच्या अखेरीस, चिरंतन जीवन जगण्यासाठी शरीरधारी प्राणी म्हणून नव्हे तर ‘शुद्ध विचार’ ह्या अवस्थेत माणसे राहावीत, असे दाखविले आहे.


समाजातील वर्गव्यवस्थेच्या मुळाशी असणऱ्या श्रेष्ठ-कनिष्ठतेबाबतच्या गृहीतकांची मार्मिक चिकित्सा शॉने पिग्मेलियन (प्रयोग १९१३) ह्या नाटकात केली. लंडनच्या ईस्ट एंड भागात राहणाऱ्या आणि रस्त्यावर फुले विकणाऱ्या अत्यंत गरीब मुलीला प्रतिष्ठित इंग्रजी समाजाची भाषा आणि शिष्टाचार ह्यांचे शिक्षण देऊन एक भाषाशास्त्रज्ञ तिला त्या समाजातली एक प्रतिष्ठित, सुसंस्कृत स्त्री म्हणून सहज खपवतो. त्या मुलीच्या मानसिकतेवर होणारे परिणामही तो प्रभावीपणे दाखवतो. ह्या नाटकावर चित्रपट निघाले (१९३८ आणि माय फेअर लेडी १९६४). त्याने मराठी रूपांतर पु. ल. देशपांडे ह्यांनी ती फुलराणी ह्या नावाने केले. मेजर बार्बारा (प्रयोग १९०५) ह्या नाटकात दारूगोळ्याचा कारखाना चालवून श्रीमंत झालेला बाप, ‘सेल्व्हेशन आर्मी’ त (एक ख्रिस्ती धार्मिक संघटना) मेजर असलेल्या मुलीला जाणवून देतो की, प्रचलित समाजव्यवस्थेत दारिद्र्य हाच सर्वांत वाईट अपराध ठरतो. द डॉक्टर्स डिलेम्मा (प्रयोग १९०६) मध्ये वैद्यकीय व्यवसायातील स्वार्थी वृत्तीवर प्रकाश टाकला आहे. हार्टब्रेक हाउस (प्रयोग १९२०) मध्ये ऱ्हासशील समाज कोलमडण्याच्या अवस्थेस आलेला दाखविला आहे. धर्माकडे पाठ फिरवलेला माणूसही निखळ करुणेच्या भावनेने एखाद्या धर्मगुरूचा जीव वाचविण्यासाठी स्वतःच्या प्राणांची पर्वा करत नाही हे द डेव्हिल्स डिसाय्‌पल (प्रयोग १८९७) मध्ये दिसते. सेंट जोन (प्रयोग १९२३) मध्ये प्रस्थापित धर्मनेत्यांच्या पलीकडच्या धर्माचे दर्शन झालेली सेंट जोन आणि तिचा नाश करण्यासाठी निघालेले धर्मनेते ह्यांच्यातील संघर्षाचे दर्शन घडते. त्यातील दाहक उपरोध विलक्षण अस्वस्थ करणारा आहे. शॉने स्वत:ला आपल्या पिढीचा सर्वश्रेष्ठ नाटककार मानले. त्याचा प्रभाव ब्रिटिश रंगभूमीवर सु. ५० वर्षे होता.

शॉने लिहिलेल्या कादंबऱ्यांत कॅशेल वायरन्स प्रोफेशन (१८८६), ॲन अन्‌सोशल सोशॅलिस्ट (१८८७), लव्ह अमंग द आर्टिस्ट्‌स (१९००), द इर्‌रॅशनल नॉट (१९०५) आणि इम्मॅच्युअरिटी (१९३०) ह्यांचा समावेश होतो. त्याने लिहिलेल्या निबंधांपैकी काही असे : कॉमनसेन्स अबाउट द वॉर (१९१४), द इंटलिजंट वुमन्स गाइड टू सोशलिझम अँड कॅपिटॅलिझम (१९२८), मेजर क्रिटिकल एसेज (१९३०) आणि एसेज इन फेबिअन सोशलिझम (१९३२). ह्यांपैकी पहिल्या महायुद्धाच्या वेळी लिहिलेल्या कॉमनसेन्स… वर बरीच टीका झाली. देशात आंधळ्या देशभक्तीचा पसरलेला उन्माद त्याला मान्य नव्हता. त्यामुळे देशद्रोही म्हणूनही त्याची संभावना झाली.

साहित्याचा नोबेल पुरस्कार त्याला १९२५ साली देण्यात आला. शार्लट पेन-टाउनशेंड ह्या फेबिअन सोसायटीतल्याच एका संपन्न स्त्रीशी शॉचा विवाह झाला होता (१८९८). १९४३ साली ती मरण पावली. हर्टफर्डशरमधील एअर सेंट लॉरेन्स ह्या गावी रहात असताना तेथेच त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Bentley, Eric, Bernard Shaw, London, 1985.

           2. Gibbs, A. M. The Art and Mind of Shaw, 1983. 

           3. Grene, Nicholas, Bernard Shaw : A Critical View, New York, 1984, 

           4. Holroyd, Michael, Bernard Shaw, 3. Vols., 1988-91.

           5. Irvine, William, The Universe of George Bernard Shaw, New York, 1968. 

           6. Meisel, Martin, Shaw and the Nineteenth Century Theatre, Princetion (N. J.), 1984.

कुलकर्णी, अ. र.