ल्यूइस, सेसिल डे : (२७ एप्रिल १९०४-२२ मे १९७२). इंग्रज कवी. जन्म आयर्लडमधील वेलिंगटोघर येथला. शिक्षण ऑक्सफर्ड येथे. काही वर्षे शाळेतील शिक्षक होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याने ब्रिटिश सरकारच्या माहिती खात्यात काम केले. १९४६ साली केंब्रिज विद्यापीठात तो अधिव्याख्यात होता. तेथे त्याने दिलेली व्याख्याने द पोएटिक इमेज ह्या नावाने प्रसिद्ध झाली. प्रतिमा हा कवितेचा प्राण आहे, हे ह्या व्याख्यानांत आवर्जून सांगितले आहे. काव्यानुभवाचे मार्मिक विश्लेषणही यांत आलेले आहे. १९५१ साली कवितेच्या अध्यापनासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात त्याची नेमणूक झाली तसेच १९६४-६५ ह्या कालखंडात हार्व्हर्ड विद्यापीठात ‘चार्ल्स एलिअट नॉर्टन अधिव्याख्याता’ ह्या नात्याने तो राहिला. इंग्लंडचा राजकवी जॉन मेस्फील्ड ह्याचे निधन झाल्यानंतर (१९६७) त्या बहुमानाच्या जागी ल्यूइसची नियुक्ती केली गेली. हर्टफर्डशरमधील हॅड्लीवुड येथे त्याचे निधन झाले.

त्याच्या काव्यसंग्रहांत ए टाइम टू डान्स (१९३५), ओव्हरचर्स टू डेथ (१९३८), वर्ल्ड ओव्हर ऑल (१९४३) ॲन इटॅलियन व्हिजिट (१९५३), द रूम अँड अदर पोएम्स (१९६५) आणि द व्हिस्परिंग रूट्स(१९७०) ह्यांचा समावेश होतो. १९५४ मध्ये त्याच्या संकलित कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला.

डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या डब्ल्यू. एच्. ऑडन ह्या कवीचा आरंभी ल्यूइसवर प्रभाव होता. द मॅग्नेटिक माउंटन (१९३३) ह्या काव्यग्रंथांतून तो विशेषत्वाने प्रत्ययास येतो. व्यूइसच्या कवितेत जुन्या प्रथा व नव्या जाणिवा  तसेच कवीच्या व्यक्तिगत गरजा व समाजाचा घटक म्हणून असलेल्या जवाबदाऱ्या ह्यांमधील संघर्ष जाणवतो. त्याची भावकविता प्रथम श्रेणीची आहे.

ल्युइसने अनुवादक म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे. व्हर्जिलच्या ईनिड ह्या महाकाव्याचा तसेच जॉर्जिक्स आणि एक्लॉग्ज ह्या अन्य काव्यरचनांचा त्याचप्रमाणे पॉल व्हालेरी या फ्रेंच कवीच्या कवितांचा काव्यानुवाद त्याने केला आहे.

शिवाय तीन कादंबऱ्या व निकोलस ब्लेक ह्या टोपण नावाने त्याने अनेक गुप्तहेर कादंबऱ्याही लिहिल्या. त्यांपैकी मिनिट फॉर मर्डर (१९४८) आणि व्हिस्पर इन द ग्लूम (१९५४) ह्या उल्लेखनीय होत. द बेरीड डे (१९६०) ह्या त्याच्या आत्मचरित्रात साम्यवादाचे त्याला आरंभी वाटलेले आकर्षण आणि नंतर त्याबद्दल झालेला त्याचा भ्रमनिरास ह्यांबद्दलचा वृत्तांत आढळतो.

संदर्भ :  1. Dyment, Clifford, Day LeWis, London, 1955, Rev. Ed. 1963.

            2. Handley-Taylor, Geoffrey Smith, T. d’A. Ed. Day Lewis : The Poet Laureate : A Bibilography, London, 1968.

            3. Riddel, y3wuoeph, N. Day Lewis, London, 1971.

             4. Smith, Elton E. The Angry Young Men of the Rhirties, London, 1975.

वानखडे, म. ना.