सर मोनिअर मोनिअर विल्यम्स

विल्यम्स, मोनिअर : (१८१९–११ एप्रिल १८९९). संस्कृत भाषेचे गाढे पंडित. जन्म मुंबईत. संपूर्ण नाव मोनिअर मोनिअर-विल्यम्स. त्यांचे वडील कर्नल मोनिअर-विल्यम्स हे ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीस होते आणि ‘सर्व्हेअर जनरल’ ह्या हुद्यावर कंपनीने त्यांची मुंबई इलाख्यात नेमणूक केलेली होती. मोनिअरविल्यम्स ह्यांनी लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये काही शिक्षण घेतल्यानंतर ऑक्सफर्ड येथील बॅलिअल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ह्या कॉलेजांमध्येच त्यांनी फार्सी व हिंदी ह्या भाषांचे शिक्षण घेतले. बॅलिअल कॉलेजची सन्माननीय छात्रवृत्तीही (ऑनररी फेलोशिप) त्यांना देण्यात आली होती. पुढे ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटी कॉलेजात बोडेन संस्कृत स्कॉलर म्हणून त्यांची नेमणूक झाली (१८४३). ह्या पदावर काही काळ काम केल्यानंतर १८४४ पासून १८५८ पर्यत ईस्ट इंडिया कॉलेज, हेलिबरी येथे संस्कृत, फार्सी आणि हिंदी ह्या भाषांचे अध्यापक म्हणून त्यांनी काम केले (ईस्ट इंडिया कंपनीने हिंदूस्थानात पाठवावयाच्या सनदी नोकरांच्या प्रशिक्षणासाठी १८०६ साली हे स्थापन केले होते). १८६० मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात संस्कृतचे ‘बोडेन प्रोफेसर’ म्हणून ते नेमले गेले. त्याच नात्याने निवृत्तीपर्यत तेथे त्यांनी काम केले.

संस्कृत–इंग्लिश डिक्‌शनरी एटिमॉलॉजिकली अँड फिलॉलॉजिकली अरेंजड विथ स्पेशल रेफरन्स टू कॉरनेट इंडो–यूरोपिअन लँग्वेथजिस हा १८७२ साली प्रसिद्ध झालेला कोश ही त्यांची सर्वांत मोठी आणि महत्त्वाची ग्रंथरचना होय. ए डिक्‌शनरी : इंग्लिश अँड संस्कृत (१८५१) हा कोशही त्यांनी तयार केला. ‘द ऑनरेबल ईस्ट इंडिया कंपनी’च्या संचालकांना तो त्यांनी अर्पण केलेला आहे. त्यांच्या अन्य ग्रंथसंपदेत स्टडी ऑफ संस्कृत इन रिलेशन टू मिशनरी वर्क इन इंडिया (१८६१), संस्कृत मॅन्युअल (१८६२), ग्रामर ऑफ द संस्कृत लँग्वेज (१८६२), इंडियन विझ्‌डम (१८७५), हिंदुइझम (१८७७), मॉर्डन इंडिया अँड द इंडिअन्स (१९७८), रिलिजस लाइफ अँड थॉट इन इंडिया (१८८३), बुधिझम ( १८९१ ) आणि ब्रॅह्मनिझम अँड हिंदूइझम (१८९१) ह्यांचा समावेश होतो. प्राच्यविद्येवरील आणखीही काही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

हिंदुइझममध्ये हिंदू धर्म आणि तत्त्वज्ञान ह्यांची मीमांसा त्यांनी केली आहे. बुधिझममध्ये गौतम बुद्धाचे चरित्र, तत्वज्ञान व सर्वसमावेशक विश्वबंधुत्व ह्यांचे विवेचन केले आहे. रिलिजस थॉट . . . मध्ये भारतातील विविध धर्मांचे स्वरूप व त्यांच्या अभ्यासावर आधारलेली स्वतःची मतेही त्यांनी दिली आहेत. वेदांतील तत्वज्ञान. उपनिषदे, षड्‌दर्शने, सूत्रग्रंथ, रामायणमहाभारत ही महाकाव्ये, मृच्छकटिकादी नाटके, नीतिशास्त्र इत्यादींबद्दल साक्षेपाने लिहिले आहे. ह्यांखेरीज कालिदासाच्या शाकुंतलाचे इंग्रजी भाषांतर त्यांनी केले आहे. ह्या भाषांतराबरोबरच ह्या नाट्यकृतीचे इंग्रजी भाषांतर त्यांनी केले आहे. ह्या भाषांतराबरोबरच ह्या नाट्यकृतीचे उत्कृष्ट रसग्रहणही त्यांनी केले आहे. नलोपाख्यानाची संपादित आवृत्ती त्यांनी काढली. तीत विवरणात्मक, व्याकरणात्मक आणि इतर स्पष्टीकरणपर अशी विपुल माहिती त्यांनी दिली आहे.

भारतीय संस्कृती, साहित्य, संस्कृत भाषा ह्यांचा त्यांना मोठा अभिमान होता. संस्कृत भाषेचे ज्ञान सर्वांनी करून घ्यावे, ह्या आग्रहापोटी १८८२ साली ऑक्सफर्ड येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट’ ही संस्था काढली. ऑक्सफर्ड विद्यापीठात अभ्यास करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी, तसेच आय्. सी. एस्. च्या परीक्षेला बसणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतीय भाषा व साहित्य ह्यांच्या अभ्यासासाठी मार्गदर्शन करणे ह्या संस्थेचे उद्दिष्ट होते.

रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड, ओरिएंटल सोसायटी ऑफ जर्मनी, बाँबे ब्रॅंच ऑफ एशियाटिक सोसायटी ह्यांसारख्या नामवंत संस्थांचे सन्माननीय सदस्यत्व त्यांना देण्यात आले होते. ऑक्सफर्ड, गटिंगेन, कलकत्ता ह्या विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या (अनुक्रमे डी. सी. एल्. पी. एच्. डी. डॉक्टर इन लॉ.) त्यांना प्राप्त झाल्या होत्या. १८८६ मध्ये त्यांना सर हा किताब देण्यात आला. १८८७ साली के. सी. आय्. ई. हा किताब त्यांना प्रदान करण्यात आला. दक्षिण फ्रान्समधील कॅन येथे ते निधन पावले.

इनामदार, वि. वा.