ब्राउनिंग, एलिझाबेथ बॅरेट: (६ मार्च १८०६ – २९ जून १८६१). इंग्रज कवयित्री. इंग्लंडमधील डरॅम विभागातील कॉक्सहो हॉल येथे जन्म. बालपण हेरफर्डशरमधील मॉलव्हर्न हिल्स येथे गेले.

एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग

शिक्षण घरीच खाजगीरीत्या झाले. ग्रीक लॅटिन भाषांचा अभ्यास तिने केला होता. वाचनाची आणि काव्यरचनेची आवड तिला बालपणापासूनच होती. द बॅटल ऑफ मॅराथॉन ह्या तिच्या काव्याच्या पन्नास प्रती तिच्या वडिलांनी हौसेने छापवून घेतलेल्या होत्या (१८१९). वयाच्या पंधराव्या वर्षी एलिझाबेथला झालेल्या एका गंभीर आजारामुळे तिची प्रकृती कायमच नाजूक राहिली. १८३३ मध्ये बॅरेट कुटुंब इंग्लंडला आले. १८३८ मध्ये ती पुन्हा आजारी पडून तिला अपंगत्व आले. पुढील तीन वर्षे विश्रांतीसाठी ती टॉर्की ह्या समुद्रकिनारी असलेल्या सौम्य हवेच्या ठिकाणी जाऊन राहिली. ह्याच कालखंडात तिचा अत्यंत आवडता भाऊ एडवर्ड ह्याच्या झालेल्या अपघाती निधनामुळे पार खचून जाऊन ती एकलकोंडी बनली घराबाहेर पडेनाशी झाली स्वतःच्या कौटुंबिक वर्तुळापलीकडे ती स्वतःचा कोणाशीही फारसा संबंध येऊ देत नसे. तथापि तिच्या काव्यलेखनामुळे लंडनमधील वाङ्मयीन गटांना ती परिचित झालेली होती आणि पोएम्स बाय एलिझाबेथ बॅरेट (१८४४) ह्या तिच्या काव्यसंग्रहाला वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला होता. त्यानंतर लवकरच विख्यात इंग्रज कवी रॉबर्ट ब्राउनिंग ह्याने तिला एक पत्र पाठवून तिच्या कवितांचे कौतुक केले. त्यानंतर रॉबर्ट आणि एलिझाबेथ ह्यांचा सतत पत्रव्यवहार सुरू झाला आणि त्याची परिणती त्यांच्या प्रेमविवाहात झाली (१२ सप्टेंबर १८४६). आपल्या कोणत्याही अपत्याने विवाह करू नये, अशी एलिझाबेथच्या वडिलांची इच्छा असल्याने तिच्या विवाहाला त्यांचा कायम विरोध राहिला. विवाहानंतर ह्या दांपत्याचे बरेचसे वास्तव्य इटलीत झाले. तेथे काव्यरचनेबरोबरच इटलीतील राजकारणातही तिने रस घेतला. फ्लॉरेन्स येथे ती निधन पावली.

उपर्युक्त पोएम्स बाय एलिझाबेथ बॅरेट ह्या काव्यसंग्रहाखेरीज सॉनेट्स फ्रॉम दे पोर्तुगीज (१८४७), कासा रिषदी विंडोज (१८५१) आणि ऑरोरा ली (१८५६) हे तिचे काव्यग्रंथ उल्लेखनीय आहेत. सॉनेट्स मध्ये एकूण ४४ सुनीते अंतर्भूत असून पतीबद्दलच्या तिच्या उत्कट प्रेमाची ती अभिव्यक्ती आहे. कास रिचदी विंडोजमध्ये इटलीतील राजकीय घटना आणि इटलीच्या स्वातंत्र्याबद्दल एलिझाबेथला वाटणारी आस्था ह्यांचे प्रतिबिंब उमटलेले आहे. ऑरोरा ली ह्या प्रीतिविषयक खंडकाव्यात तिचे सामाजिक, वाङ्मयीन व नैतिक प्रश्नांवरील चिंतन आढळते.

एलिझाबेथची कविता अत्यंत भावनोत्कट पण पसरट आहे. तिची भावनोत्कटताही अनेकदा भावविशतेकडे झुकलेली दिसते. तिच्या कवितेची शब्दकळा आणि तिच्यातील प्रतिमासृष्टी बहुतांशी सांकेतिकच आहे. तथापि सॉनेट्स…… मध्ये उत्कट भावना, विचारघनता व तंत्रशुद्ध आविष्कार यांचा संगम झालेला दिसतो. एफ्. जी. केन्यन ह्याने तिची समग्र कविता संपादून प्रसिद्ध केली आहे (१८९७).

संदर्भ : 1. Hayter, Alethea, Mrs. Browing, New York, 1963.

2. Lubbock, Percy, Elizabeth Barrett Browing in Her Letters, London, 1906.

3. Taplin, G. B. The Life of Elizabeth Barrett Browing, New Haven, 1957.

कुलकर्णी, अ. र.