सिटवेल, इडिथ : (७ सप्टेंबर १८८७–९ डिसेंबर १९६४). इंग्रज कवयित्री. जन्म स्कारबरो, यॉर्कशर (इंग्लंड) येथे एका प्रतिष्ठित कुटुंबात. तिचे धाकटे भाऊ सर ऑस्बर्ट आणि सर सॅचव्हेरेल हेही साहित्यिक होते. तिचे शिक्षण रेनीशॉ हॉल येथील तिच्या वाडवडिलांच्या घरी खाजगी रीत्या झाले. तिची तीव्र सवेदनशीलता, वाचनात आणि संगीतात मग्न होण्याची वृत्ती आणि घरातल्या एकूणच मोठेपणाच्या वातावरणापासून अलिप्त राहण्याचा तिचा स्वभाव

इडिथ सिटवेलतिच्या आईला पसंत नव्हता. वडिलांशीही तिचे संबंध सुखाचे नव्हते. आपले जीवन स्वतंत्रपणे जगण्याचा आणि स्वतःच्याच जगात राहण्याचा तिचा निश्चय ह्यामुळे अधिक खंबीर झाला. पहिले महायुद्घ सुरु होण्यापूर्वीच्या काळात तिचा लंडनमधील वाङ्‌मयीन वर्तुळांत प्रवेश झाला. ती कवितालेखन करु लागली, तेव्हा प्रचलित कवितेत परिवर्तन घडवून आणण्याची आवश्यकता तिला तीव्रतेने भासत होती. कवितेची दिशा, तिच्यातील प्रतिमासृष्टी, निर्जीव आणि अपेक्षित आकृतिबंध, तिची लय आणि तालबद्घता हे सारे बदलण्यासाठी तिने तिच्या काव्यलेखनात प्रयोग सुरु केले. नावीन्यपूर्ण प्रतिमा, त्यांचे परस्परसाहचर्य, आधुनिक संगीतातल्या तसेच नृत्यातील पदाघातांच्या लयतालांचा कवितेत वापर हे सर्व सांकेतिक काव्यरचनांचा मनावर पगडा असलेल्या वाचकांना नुसते नवीनच नव्हे, तर धक्कादायकही होते तथापि भावगेयतेचा ताजेपणा आणि बुद्घीची चुणूकही ह्या कवितेतून दिसून येते. १९१६ पासून तिने आपल्या भावांच्या मदतीने व्हील्स ह्या नावाने निवडक कवितांचा एक संग्रह (अँथॉलॉजी) प्रतिवर्षी काढावयास सुरुवात केली. त्यांतून तिच्या प्रचलित कवितेविरुद्घच्या विशेषतः जॉर्जियन कवितेविरूद्धच्या – बंडाचा प्रत्यय येतो. हा उपक्रम काही वर्षे चालला. व्हील्समधील कविता व्हील्स : ॲन अँथॉलॉजी ऑफ व्हर्स ह्या नावाने सात भागांत प्रसिद्घ झालेल्या आहेत (१९१६–२१).

तिचा पहिला काव्यसंग्रह–द मदर अँड अदर पोएम्स –१९१५ मध्ये प्रसिद्घ झाला. त्यानंतर प्रसिद्घ झालेल्या तिच्या काव्यसंग्रहांत क्लाउन्स हाउसिस (१९१८), ब्यूकॉलिक कॉमेडीज (१९२३), फसाड (१९२३), गोल्ड कोस्ट कस्टम्स (१९२९), द कँटिक्‌ल ऑफ द रोझ (१९४९) इ. काव्यसंग्रह प्रसिद्घ झाले. ह्यांपैकी फसाडमधील कवितांचे तिने जाहीर वाचन केले होते आणि त्या कवितांना सर विल्यम वॉल्टन ह्या संगीतकाराने संगीत दिले होते. १९३१ मध्ये ह्या कवितांवर आधारित बॅले नृत्य सादर करण्यात आले. तिच्या कवितांची अनेक संकलने झाली आहेत.

तिने गद्यलेखनही केले आहे. त्यात इंग्रज कवी अलेक्झांडर पोप ह्याचे अभ्यासपूर्ण चरित्र आणि जॉनाथन स्विफ्टच्या शोकात्म जीवनावर आधारलेली आय लिव्ह अंडर ए ब्लॅक सन (१९३७) ही कादंबरी ह्यांचा समावेश होतो. ए पोएट्स नोटबुक (१९४३) आणि ए नोटबुक ऑन विल्यम शेक्सपिअर (१९४८) ह्यांसारख्या तिच्या समीक्षात्मक ग्रंथांत किंवा त्यांच्या प्रस्तावनेत तिने कवींच्या जीवनाचा अर्थ, कवितेचा हेतू, ती कशी आकारते ह्यांसारख्या विषयांवर आपले मार्मिक विचार व्यक्त केलेले आहेत. १९५३ मध्ये हॉलीवूडमध्ये जाऊन तिने पहिल्या एलिझाबेथवर लिहिलेल्या –ए फॅनफेअर फॉर एलिझाबेथ (१९४६) या पुस्तकावर आधारित पटकथा लिहिली. १९५४ मध्ये ‘डे ऑफ द ब्रिटिश एंपायर’ हा मानाचा किताब तिला देण्यात आला. टेकन केअर ऑफ हे तिचे आत्मचरित्र तिच्या मृत्यूनंतर प्रसिद्घ झाले (१९६५).

संदर्भ : 1. Bowra, C. M. Edith Sitwell, 1947.

2. Fifoot, Richard, Bibliography of Edith, Osbert and Sacheverell Sitwell, Oxford,1963.

3. Lehmann, John, A Nest of Tigers : The Sitwells in Their Times, 1969.

4. Lehmann, John, Edith Sitwell, 1952.

5. Singleton, Geoffrey, Edith Sitwell : The Hymn to Life, 1960.

कुलकर्णी, अ. र.