टॉटल, रिचर्ड : (?–१५९४). इंग्रज प्रकाशक. साँग्ज अँड सॉनेट्स  या नावाने इंग्रजी गीतांचे व सुनीतांचे एक संकलन त्याने प्रकाशित केले (१५५७). टॉटल्स मिसेलनी  ह्या नावाने ते विशेष प्रसिद्ध आहे. त्यात मुख्यत्वेकरून ⇨ टॉमस वायट  आणि ⇨ हेन्री हॉवर्ड सरी  ह्या कवींच्या रचना आहेत. इटालियन कवितेच्या संस्कारांतून इंग्रजी कवितेला नवीन वळण देणारी कविता उपर्युक्त दोन्ही कवींनी लिहिली त्यामुळे टॉटल्स मिसेलनी  हे संकलन एका अर्थाने नव्या इंग्रजी कवितेचा जाहीरनामाच ठरले. त्याशिवाय काही कायदाविषयक पुस्तके, लिडगेटचे फॉल ऑफ प्रिन्सेस   हे काव्य, व्हर्जिलच्या ईनिड  ह्या महाकाव्याचे सरीने अनुवादिलेले दोन सर्ग (दुसरा आणि चौथा) इ. त्याची प्रकाशने उल्लेखनीय आहेत.

कुलकर्णी, अ. र.