मिले, एडना सेंट व्हिन्सेंट : (२२ फेब्रुवारी १८९२–१९ ऑक्टोबर १९५०). अमेरिकन कवयित्री आणि नाटककर्त्री, रॉकलँड, मेन येथे जन्मली. १९१७ मध्ये व्हॅसर कॉलेजमधून ती पदवीधर झाली. रेनेसांस अँड अदर पोएम्स हा तिचा पहिला काव्यसंग्रह त्याच वर्षी प्रसिद्ध झाला. अ फ्यू फिग्ज फ्रॉम थिसल्स (१९२०), सेकंड एप्रिल (१९२१), द हार्प वीव्हर अँड अदर पोएम्स (१९२३), द बक इन द स्नो (१९२८), फेटल इंटरव्ह्यू (१९३१), मेक ब्राइट द ॲरोज (१९४२) हे त्यानंतरचे काही काव्यसंग्रह. द स्लॅटर्न्‌स अँड अ किंग, द लँप अँड द बेल आणि आरिआ दा कापो ही तिची तीन पद्यनाटके (सर्व १९२१ मध्ये प्रकाशित). नॅन्सी बॉइड ह्या टोपणनावाने तिने काही कथाही लिहिल्या आहेत. तथापि कवयित्री म्हणूनच ती मुख्यतः प्रसिद्ध आहे. एका स्वतंत्र, बंडखोर व स्वच्छंदतावादी मनाचे दर्शन तिच्या कवितेतून घडते. तिच्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण कवितेचा आणि १९२० नंतरच्या दशकाचा एक उत्कट भावनिक दुवा जुळला आणि तिला फार मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. उपयुर्क्त द हार्प वीव्हर…. ह्या संग्रहास पुलिट्झर पारितोषिक देण्यात आले. ऑस्टरलिट्‌झ (न्यूयॉर्क राज्य) येथे ती निधन पावली.

संदर्भ : 1. Gould, Jean, The Poet and Her Book, New York, 1969.

             2. Gurko, Miriam, Restless Spirit  : The Life of Edna St. Vincent Miliay, Ontario, 1962.

देसाई, म. ग.