एमर्सन, राल्फ वॉल्डो : (२५ मे १८०३ – २७ एप्रिल १८८२). विख्यात अमेरिकन निबंधकार व विचारवंत. बॉस्टनमधील घरंदाज प्यूरिटन कुटुंबात जन्म. वडील धर्मोपदेशक. हार्व्हर्ड विद्यापीठात शिकताना एमर्सनने आपले विचार टिपणवहीत लिहिणे सुरू केले. ही टिपणवही म्हणजे त्याच्या बहुतेक निबंधांची गंगोत्री होय. धर्मोपदेशक होण्याचे शिक्षण पुरे झाल्यावर यूनिटेरियन पंथाची शिकवणूक अपुरी वाटल्याने इतर धर्म व तत्त्वज्ञान ह्यांकडे तो वळला. १८३२–­­­­­३३ मध्ये यूरोपच्या दौऱ्यावर असताना कार्लाइल, वर्ड्‍‍स्वर्थ व कोलरिज यांच्या परिचयामुळे त्या काळी यूरोपला भारून टाकणारा जर्मन अतिशायितावाद व इंग्रजी स्वच्छंदतावाद यांचे त्याला आकर्षण वाटू लागले. प्‍लेटो व स्वीड्‍नबॉर्ग यांच्या गूढवादी तत्त्वज्ञानाचा तसेच हिंदू तत्त्वज्ञान व साहित्य ह्यांचाही परिचय त्याला घडला. एमर्सनचे स्वत:चे अतिशायितावादी तत्त्वज्ञान या सर्वांच्या परिशीलनातून आकारले. १८३५ साली काँकर्ड या बॉस्टनजवळच्या खेड्यात तो स्थायिक झाला व त्याचे घर या नव्या तत्त्वज्ञानाचे केंद्र बनले. थोरो, मार्गारेट फुलर, हॉथॉर्न यांची प्रभावळ त्याच्याभोवती जमली. एमर्सनचे बहुतेक सर्व लेख त्याच्या भाषणांवर आधारलेले आहेत. नेचरमध्ये (१८३६) त्याच्या तत्त्वज्ञानाचा परिपाक आहे द अमेरिकन स्कॉलरमध्ये (१८३७) अमेरिकनांच्या वैचारिक परपुष्टतेची प्रभावी निर्भर्त्सना आढळते. अमेरिकेच्या वैचारिक स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणून हा लेख गाजला. १८४१ व १८४४ मध्ये त्याच्या लेखांचे दोन भाग प्रसिद्ध झाले. रेप्रेझेंटेटिव्ह मेन… मध्ये (१८५०) कार्लाइलच्या ऑन हीरोज, हीरो वर्शिप अँड द हिरोइक इन हिस्टरीच्या धर्तीवर मानवी थोरपणाची मीमांसा आहे. इंग्‍लिश ट्रेट्समध्ये (१८५६) इंग्रजी मनाचे विश्लेषण आहे. द काँडक्ट ऑफ लाइफ (१८६०) व सोसायटी अँड सॉलिट्यूड (१८७०) हे त्याचे अखेरचे ग्रंथ. एमर्सनच्या तत्त्वज्ञानाला बरीच लोकप्रियता मिळाली. भारतीय तत्त्वज्ञानाचा त्याने केलेला गौरव व ‘ब्रह्म’ सारख्या कविता यांमुळे भारतीय राष्ट्रीयतेच्या उदयकाळी त्याच्या लिखाणाने अनेक लेखक व विचारवंत प्रभावित झाले. आधुनिक काळात त्याची विचारसरणी भाबडी व स्वप्‍नरंजनवादी वाटते. सुसंगतीचा अभाव व वैचारिक गोंधळ हे त्याचे दोष उघड आहेत तरीदेखील त्याच्या घणाघाती, ओघवत्या व प्रभावी गद्यशैलीचे आकर्षण आजही वाटावे, एवढ्या तोलाचा शब्दप्रभू तो खासच आहे. काँकर्ड येथे तो निधन पावला.

राल्फ वॉल्डो एमर्सन

संदर्भ : 1. Emerson, E. W. The Complete Works of Ralph Waldo Emerson12 Vols., Boston, 1903-04.

    2. Emerson, E. W. Forbes W. E. Ed. The Journals of Ralph Waldo Emerson, 10 Vols., Boston 1909-14.

    3. Rusk, R. L. Ed. The Letters of Ralph Waldo Emerson, 6 Vols., New York, 1939.

   4. Rusk, R. L. The Life of Ralph Waldo Emerson, New York, 1949.

नाईक, म. कृ.