एलियट, जॉर्ज : (२२ नोव्हेंबर १८१९­­­—२२ डिसेंबर १८८०). इंग्रज कांदबरीकर्त्री. मूळ नाव मेरी ॲन एव्हान्स. जन्म इंग्‍लंडमधील वॉरिकशर येथे. शिक्षण ननीटन आणि कॉव्हेंट्री येथे. घरातील वातावरण कर्मठ धार्मिकतेचे. तथापि वयाच्या बाविसाव्या वर्षी आपल्या पित्यासह कॉव्हेंट्री येथे वास्तव्यासाठी आल्यानंतर चार्ल्स ब्रे आणि चार्ल्स हेनेल ह्या नवविचारांच्या व्यक्तींचा सहवास तिला घडला. परिणामत: तिच्या धर्मविषयक दृष्टिकोनात क्रांतिकारक बदल घडून आला. चर्चमध्ये जाण्याचेही तिने नाकारले. तत्त्वज्ञान, विज्ञान ह्यांसारख्या विषयांवरील ग्रंथांचे वाचन आणि मुक्त चिंतन ह्या सवयी तिला जडल्या. कॉव्हेंट्री येथील शाळेत असताना फ्रेंच आणि इटालियन भाषांचे काही ज्ञान तिने मिळविले होते. त्यानंतर लॅटिन आणि जर्मन भाषांचा अभ्यास तिने स्वतंत्रपणेच केला. डेव्हिड श्ट्राउस ह्या जर्मन तत्त्वज्ञाच्या Das Leden Jesu ह्या ग्रंथाचे द लाइफ ऑफ जीझस (३ खंड, १८४६) हे भाषांतर करून तिने आपल्या वाङ्‍मयीन कारकीर्दीचा आरंभ केला. इंग्‍लंडमधील विवेकवादावर ह्या अनुवादाचा परिणाम घडून आला. १८५० मध्ये ती वेस्टमिन्स्टर रिव्ह्यूसाठी लिहू लागली आणि १८५१­­­–१८५३ ह्या काळात याच नियतकालिकाची सहसंपादिका झाली. येथे काम करीत असताना हर्बर्ट स्पेन्सर, प्रान्सिस न्यूमन, जॉर्ज हेन्‍री ल्यूइस इ. विचारवंतांशी तिचा परिचय झाला. त्यांपैकी जॉर्ज ल्यूइसच्या उद्‍ध्वस्त वैवाहिक जीवनाच्या पार्श्वभूमीवर मेरीच्या आणि त्याच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. घटस्फोट मिळण्यात अडचणी असल्यामुळे विवाह न करता तिने त्याच्याशी पत्‍नीचे नाते ठेवले. जॉर्जच्या उत्तेजनानेच मेरी तात्त्विक स्वरूपाच्या लेखनाकडून ललित साहित्याकडे वळली आणि आपल्या टोपण नावात त्याचे नाव तिने अंतर्भूत केले. जॉर्ज हेन्‍री ल्यूइसच्या मृत्यूनंतर तिने दुसरा विवाह केला (१८८०) पण त्याच वर्षी लंडन येथे ती निधन पावली.

जॉर्ज एलियट

सीन्स ऑफ क्‍लेरिकल लाइफ (१८५८) ही तिची पहिली कादंबरी यशस्वी ठरली. त्यानंतर ॲडम बीड (१८५९), द मिल ऑन द फ्‍लॉस (१८६०), सायलस मार्नर (१८६१), रोमोला (१८६३), फेलिक्स हॉल्ट द रॅडिकल (१८६६), मिड्लमार्च (१८७१-१८७२), डॅन्यल डेरोंडा (१८७६) ह्या कादंबऱ्या तिने लिहिल्या. फेलिक्स हॉल्ट… ही इंग्‍लंडमधील राजकारणावर आधारलेली तिची एकमेव कादंबरी. मिड्लमार्च ही तिची सर्वोत्कृष्ट कादंबरी.

तिच्या व्यासंगी आणि चिंतनशील व्यक्तिमत्त्वाचा तिच्या कादंबरीलेखनावर परिणाम झालेला दिसतो. वैयक्तिक श्रद्धा आणि कादंबरीलेखन यांतील परस्परसंबंधांत तिच्या कादंबऱ्यांनी एक लक्षणीय जवळीक साधली. तिच्या कादंबऱ्यांतून नैतिक समस्यांना आणि तत्त्वचिंतनाला प्राधान्य प्राप्त झाले. ती विवेकवादी असल्यामुळे भावविवशता तिच्या लेखनात आढळत नाही उलट व्यक्तिरेखांचे चिकित्सक विश्लेषण करण्याची प्रवृत्ती प्रत्ययास येते. स्वाभाविकपणेच तिच्या कादंबऱ्यांत एक प्रकारचा भारदस्तपणा आलेला दिसतो. तथापि तिच्या संवादांतून तिची श्रेष्ठ विनोदबुद्धीही दिसून येते. इंग्रजी कादंबरीतील वास्तववादाच्या विकासाला तिने हातभार लावला आणि तिच्यातील समाजमनस्कता अधिक खोलवर नेली. इंग्रजी कादंबरीच्या इतिहासात आणि विशेषत: व्हिक्टोरियन काळातील इंग्रजी कादंबरीकारांत तिचे स्थान महत्त्वाचे आहे.

कादंबऱ्यांखेरीज स्पॅनिश जिप्सी (१८६८) आणि द लेजंड ऑफ जूबल अँड अदर पोएम्स (१८७४) ही तिची काव्ये प्रकाशित झाली आहेत. इंप्रेशन्स ऑफ थीओफ्रॅस्टस सच (१८७९) मध्ये तिचे बोधवादी निबंध संगृहीत केलेले आहेत. जॉर्ज हेन्‍री ल्यूइसचे निधन झाल्यानंतर (१८७८) प्रॉब्‍लेम्स ऑफ लाइफ अँड माइंड  हा त्याचा अपूर्ण राहिलेला तात्त्विक ग्रंथ पूर्ण करण्यावर तिने आपले सारे लक्ष केंद्रित केले होते.

संदर्भ : Haight, G. S. George Eliot, Oxford, 1968.

कुलकर्णी, अ. र.