राव, राजा : (५ नोव्हेंबर १९०८–). इंडो-अँग्लिअन कथाकादंबरीकार. जन्म कर्नाटक राज्यातील हसन येथे. वयाच्या एकविसाव्या वर्षी उच्च शिक्षणासाठी ते फ्रान्सला गेले व त्यानंतर त्यांचे बहुतेक वास्तव्य परदेशांतच झालेले आहे. १९६५ मध्ये टेक्सास विद्यापीठात ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. आरंभी कन्नड आणि फ्रेंच ह्या भाषांत लेखन केल्यानंतर ते इंग्रजीतून लिहू लागले. कांतापुरा (१९३८), सर्पन्ट अँड द रोप (१९६०), द कॅट अँड शेक्सपिअर :ए टेल ऑफ इंडिया (१९६५), कॉम्रेड किरिलव्ह (१९७६) ह्या त्यांच्या उल्लेखनीय कादंबऱ्या. गांधीयुगात, कर्नाटकमधील एका छोट्या खेड्यामध्ये घडून आलेल्या सामाजिक-राजकीय क्रांतीची स्फूर्तिदायक कहाणी कांतापुरात आलेली आहे. द सर्पन्ट अँड द रोप ही त्यांची कादंबरी आत्मचरित्रात्मक असून तीत रामस्वामी हा हिंदू युवक आणि त्याची फ्रेंच पत्नी मॅद्‌लिन ह्यांच्या वैवाहिक जीवनाच्या अनुषंगाने पौर्वात्य आणि पश्चिमी संस्कृतींचा तौलनिक परामर्श त्यांनी घेतलेला आहे. अद्वैत तत्त्वज्ञानाची बैठक असलेली ही प्रदीर्घ कादंबरी राजा राव ह्यांची सर्वोत्कृष्ट साहित्यकृती आणि इंडो-अँग्लिअन साहित्याचे एक भूषण मानली जाते. ह्या कादंबरीस साहित्य अकादेमीचे पारितोषिक देण्यात आले (१९६३). द कॅट अँड शेक्सपिअर ….. मध्ये तत्त्वज्ञान आणि विनोद ह्यांचे आगळे रसायन आढळते. साम्यवादाचा पाईक आणि भारताचा कडवा टीकाकार पद्मनाभन् अय्यर हा कॉम्रेड किरिलव्ह ह्या कादंबरीचा नायक. कॉम्रेड किरिलव्ह ह्या रशियन नावाने ओळखला जाणारा पद्मनाभन अय्यर हा अंतर्यामी खराखुरा भारतीयच कसा असतो, ह्याचे उपरोधपूर्ण चित्र ह्या कादंबरीत आहे.

द कौ ऑफ द बॅरिकेड्‌स अँड अदर स्टोरीज (१९४७) हा त्यांचा कथासंग्रह व द पोलिसमन अँड द रोझ (१९७८) ही त्यांची सुधारित आवृत्ती. जावनी आणि अक्कैय्या ह्या हिंदू अबलांच्या कारुण्यमय जीवनाचे त्यात घडविलेले दर्शन हृदयस्पर्शी आहे, तर ‘द पोलिसमन अँड द रोझ’ व ‘इंडिया : अ फेबल’ ह्या कथांत भारतीय तत्त्वज्ञान व परंपरा ह्यांचे प्रतीकात्मक चित्रण केलेले आढळते. चेंजिंग इंडिया (१९३९) हे पुस्तक त्यांनी इक्‌बाल सिंग ह्यांच्या सहकार्याने संपादित केलेले आहे.

राजा राव ह्यांचे लेखन अल्प, परंतु सकस आहे. भारतीय तत्त्वज्ञान व परंपरा ह्यांचे पश्चिमी जीवनमूल्यांच्या तुलनेत उठून दिसणारे जे स्वरूप आहे, त्याचे बरेचसे आदर्शवादी चित्रण त्यांच्या साहित्यात दिसते. त्यांच्या कादंबऱ्यांतून प्रत्ययास येणारी त्यांची विद्वत्ता व चिंतनशीलता, त्यांनी निर्मिलेल्या अविस्मरणीय व्यक्तिरेखा, त्यांची आशयघन प्रतिमासृष्टी, भारतीय कथा-पुराणांची काव्यात्म निवेदनशैली वापरण्याचे त्यांचे कौशल्य, भारतीय भाषांची-विशेषतः कन्नड व संस्कृत-विशिष्ट लय व शब्दप्रयोग इंग्रजीत आणू पाहण्याचे त्यांचे धाडसी प्रयत्न ह्यांमुळे इंडो-अँग्लिअन साहित्यात त्यांनी मानाचे स्थान मिळविले आहे. १९८८ साली साहित्याचे न्यूस्टाड हे आंतरराष्ट्रीय पारितोषिक त्यांना देण्यात आले.

संदर्भ : 1. Naik, M. K. Raja Rao, New York, 1972. rev.1982.

2. Narasimhaiah, C. D. Raja Rao, New Delhi,1973.

3. Rao, K. R. The Fiction of Raja Rao, Aurangabad,1980.

4. Sharma, K. K., Ed., Perspetives on Raja Rao, Ghaziabad,1980.

5. Shrivastava Narasingh, The Mind and Art of Raja Rao, Bareilly,1980.

नाईक, म. कृ.