फिट्सजेरल्ड, एडवर्ड : (३१ मार्च १८०९-१४ जून १८८३). नामवंत इंग्रजी विद्वान, रसिक व प्रतिभावान अनुवादक. सफक परगण्यातील वुडब्रिजजवळील ब्रेडफील्ड हे त्याचे जन्मठिकाण.१८३० मध्ये केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमधून पदवी संपादन केली. नंतर लवकरच तो वुडब्रिज येथेच कायमचे वास्तव्य करून एकांतात राहू लागला. आपले सर्व आयुष्य त्याने काव्यशास्त्र, संगीत, बागकाम आणि सन्मित्रांशी सुखसंवाद यांत घालविले. थॅकरी, टेनिसन, कार्लाइलहे त्याचे निकटवर्ती मित्र होते.

अकराव्या शतकातील प्रख्यात फार्सी कवी आणि खगोलशास्त्रज्ञ ⇨ उमर खय्याम याच्या रूबायांच्या इंग्रजी अनुवादांमुळे फिट्‍सजेरल्डचे नाव जगद्‍विख्यात झाले. त्याअगोदर स्पॅनिश भाषा आणि साहित्य यांचा प्रदीर्घ, गाढ व्यासंग त्याने केला होता. स्पॅनिश नाटककार काल्देरॉन याच्या सहा नाट्यकृतींचा इंग्रजी अनुवाद त्याने १८५३ साली प्रसिद्ध केला. तसेच ग्रीक नाटककार एस्कीलस आणि सॉफोक्लीझ यांच्या दोन नाटकांचेही अनुवाद त्याने केले. हे अनुवाद करताना मूळ कृतींचा आशय आपल्या भाषेत आणि शैलीत मांडण्याचा त्याचा प्रयत्‍न होता. या प्रयत्‍नाचा उत्कट आणि उत्कृष्ट आविष्कार त्याने केलेल्या खय्यामच्या रूबायांच्या अनुवादात दिसून आला. हा अनुवाद रूबाईयत ऑफ उमर खय्याम या नावाना १८५९ साली प्रसिद्ध झाला. तो त्याने स्वखर्चाने प्रसिद्ध केला होता. त्याच्या २५० प्रती त्याने काढल्या होत्या. या पुस्तकाला अजिबात मागणी नव्हती. जेमतेम ५० प्रती वाटल्या गेल्या आणि विकल्या गेल्या. त्यानंतर मात्र या सुंदर अनुवादाच्या आधारे इंग्लंड-अमेरिकेमध्ये उमर खय्यामचे वेडच फोफावले. आंतरराष्ट्रीय उमर खय्याम मंडळे स्थापन झाली. या अनुवादाच्या विविध आणि सुंदर सचित्र आवृत्त्या एकामागून एक निघाल्या. बायबलखेरीज दुसऱ्या कोणत्याही पुस्तकाच्या इतक्या विविध आणि सुंदर आवृत्त्या निघालेल्या नाहीत.

फिट्‍सजेरल्डच्या वृत्तीची एकतानता उमर खय्यामच्या वृत्तीशी पूर्णपणे झाली असल्याने हा अनुवाद अतिशय सरस आणि प्रतिभासंपन्न झाला. या अनुवादाने, माधव जूलियन म्हणतात त्याप्रमाणे ‘मूळ हुर्मुजी मोत्याच्या सराला एकपिंडत्व आणि पूर्णत्व दिले.

चार ओळींच्या काव्यबंधाची ही मालिका म्हणजे संदेहवादी सुखवाद्यांची एक गीताच होऊन बसली. एकोणिसाव्या शतकात इंग्‍लंडमधल्या सुखवस्तू सुशिक्षित लोकांत असमाधान होते. शास्त्रीय शोधांमुळे त्यांची श्रद्धा नाहीशी झाली आणि शुष्क तर्कवादाने त्यांना मनःशांती लाभेना. याच वेळी डार्विनचा ऑरिजिन ऑफ स्पीशीज हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. या वातावरणात खय्यामच्या सुखवादाची भुरळ रसिकांना पडली. असे असले, तरी या कृतीचा इंग्रजी काव्यप्रवाहावर फार खोल परिणाम झाला नाही.

मराठीमध्ये फिट्‌सजेरल्डकृत रूबाईयतचे प्रसिद्ध भाषांतर माधव जूलियन यांनी द्राक्षकन्या (१९३१) या नावाने केले आहे. इतरही भाषांतरे झाली आहे. रूबायातील तत्त्वज्ञानाचा प्रभाव मराठी कवींवर काही प्रमाणात झाला आहे असे दिसते.

हातकणंगलेकर, म. द.