लॅंग्लंड, विल्यम : (१३३०?-१४००?). मध्ययुगीन इंग्रज कवी. त्यांच्या जीवनाविषयीची माहिती मुख्यतः पिअर्स प्लाउमन ह्या सर्वसाधारण मतानुसार त्याच्या मानल्या गेलेल्या काव्यग्रंथातील काही उल्लेखांवरूनच मिळते. तथापि हे काव्य त्यानेच लिहिले किंवा कसे, ह्याबद्दल अद्याप निर्णायकपणे काही सांगता आलेले नाही. ह्या काव्यग्रंथात लँग्लंडसंबंधीचे जे उल्लेख आहेत ते पाहाता, तो वेस्टर्न मिडलंड्सचा रहिवासी असावा. ग्रेट मॉल्‌ व्हर्न येथील मठात त्याचे बहुधा शिक्षण झाले असावे. तो लंडनलाही गेला असावा. 

उपर्युक्त पिअर्स प्लाउमनची ए, बी आणि सी अशी तीन हस्तलिखिते उपलब्ध आहेत. ह्या तीन हस्तलिखितांतील ओळींची संख्या वेगवेगळी -२,५०० पासून ७,३००- पर्यंत आहे. ह्या काव्याची रचना १३६० ते १३९९ पर्यंत केव्हा तरी झालेली असावी.

मध्ययुगीन इंग्रजी साहित्यातील बहुधा सर्वोत्कृष्ट काव्यकृती मानले जाणारे पिअर्स प्लाउमन हे रूपकात्मक काव्य म्हणजे कवीचे एक प्रदीर्घ स्वप्न-‘व्हिजन’-आहे. ह्या स्वप्नात त्याला लाच (मीड), मती (रीझन), सदसद्‌विवेकबुद्धी इ. मूर्तिमंत झालेल्या दिसतात. सदसद्‌विवेकबुद्धी जनतेला उपदेश करीत असते पश्चात्ताप त्यांची अंत:करणे हेलावून सोडीत असतो. ‘संत सत्या’ चा (सेंट ट्रूथ) शोध चालू असतो पण हे कार्य अवघड असते. अशा वेळी पिअर्स प्लाउमन अवतरतो. तो सर्वांना मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शवितो फक्त ह्या सर्वांनी त्याचे अर्ध्या एकराचे शेत नांगरून देण्यास मदत करावी, एवढीच त्याची अपेक्षा असते. काही जण ही मदत करतात पण अंगचोरपणा करणारेही असतात. ह्या निमित्ताने तत्कालीन श्रमविषयक प्रश्नांची काही चर्चा होते. धट्ट्याकट्ट्या भिकाऱ्यांची कडक दखल घेतली गेली पाहिजे, असा विचार आलेला आहे. हे थोडक्यात ए ह्या हस्तलिखिताविषयी.

बी व सी ह्या हस्तलिखितांत चर्चमधील भ्रष्टाचारावर विशेष भर देण्यात आला आहे. दारिद्र्याचे फायदे, प्रेम हा सर्वोच्च गुण होय, हेही सांगितले जाते. ख्रिस्तांचे जीवनही वर्णिले असून ख्रिस्त आणि पिअर्स प्लाउमन हे एकमेकांत मिसळून गेल्याचे दिसते. तत्कालीन धर्मव्यवस्था, राज्यकारभार आणि समाज ह्यांतील दोषांवर ह्या काव्यातून प्रखर टीका केल्याचे दिसते. भक्तीची आर्तता, सुधारणेची तळमळ, बोचरा उपहास, घणाघाती भाषा व अनुप्रासयुक्त छंदाचा उपयोग हे लँग्लंडच्या शैलीचे ठळक विशेष.

संदर्भ : 1. Bloomfield, M.W. Piers Plowman as a Fourteenth Century Apolcapse, New  

               Brunswick, 1962.

           2. Goodridge, J.F. Ed, Piers Plowman, 1959.

           3. Lowlor, J. Piers Plowman, An Essay in Criticism, New York, 1962.

           4. Salter, E. Piers Plowman, An Introduction, Cambrige, 1962. 1970.

           5. Skeat, W.W. Ed. Piers Plowman, 1886, 1957.

नाईक, म. कृ.