अमेरिकन साहित्य : अमेरिकेतील पहिली वसाहत व्हर्जिनियातील जेम्सटाऊन येथे १६०७ मध्ये इंग्रजांनी वसविली. अमेरिकन साहित्याची सुरुवात वसाहतपाहणीच्या अहवालानी झाली. ह्या अहवालात जॉन स्मिथ ह्या इंग्रजाने लिहिलेला अ ट्ररू रिलेशन ऑफ व्हर्जिनिया (१६०८) हा उल्लेखनीय आहे. त्यानंतरच्या गेल्या साडेतीनशेहून अधिक वर्षांच्या काळात अमेरिकन साहित्य अखंडपणे निर्माण होत आहे. हे साहित्य अमेरिकेत स्थायिक झालेल्या इंग्रज, इतर यूरोपीय व निग्रो लेखकांचे आहे. तेथील मूळच्या रेड इंडियन लोकांच्या साहित्याचे आता काहीच अवशेष शिल्लक राहिलेले नाहीत.

अमेरिकन साहित्याचे कालखंड पुढीलप्रमाणे आहेत :

             १. वसाहतकालीवन साहित्य (१६०७—१७६५)             २. स्वातंत्र्ययुद्धाचा पूर्वोत्तर कालखंड (१७६५–१८१०)

             ३. राष्ट्रीय प्रबोधनाचा कालखंड (१८१०—१८६५)             ४. यादवीयुद्धोत्तर कालखंड (१८६५—१८९०)             ५. आधुनिक कालखंड (१८९० नंतर–   )

वसाहकतकालीन साहित्य: वसाहतकालीन परिस्थिती साहित्य निर्मितीला अनुकूल नव्हती. वसाहतकारांच्या भिन्न राष्ट्रीय पार्श्वभूमी, त्यांची व्यावहारिक उद्दिष्टे, प्यूरिटन-पंथीय विचारसरणी, प्रतिकूल नैसर्गिक परिसर, पुरेशा मुद्रणव्यवस्थेचा अभाव व जीवनकलहाची तीव्रता या सर्व कारणांनी साहित्य निर्माण होणे कठीण होते. तरीही इंग्रजी साहित्याच्या अनुकरणातून काही साहित्य निर्माण होऊ लागले. आरंभीचे वृत्तांतात्मक गद्यलेखन व्यावहारिक हेतूनेच करण्यात आले. त्यात नव्या वसाहतींचे वर्णन आढळते. जॉन स्मिथ (१५८०—१६३१), विल्यम ब्रॅडफर्ड (१७२२—१७९१), जॉन विन्‌‌थ्रॉप (१५८८—१६४९), टॉमस मॉर्टन (१५९० ? —१६४७), व विल्यम बर्ड (१६७४—१७४४) हे काही ऐतिहासिक वृत्तांतलेखक होत. अमेरिकन काव्याचा आरंभ ॲन ब्रॅडस्ट्रीट (१६१२ ? —१६७२), मायकेल विग्‌‌ल्‌‌स्वर्थ (१६३१—१७०५) व एडवर्ड टेलर (१६४४—१७२९) यांनी केला. धार्मिक स्वरूपाचे गद्यलेखन मॅथर कुटुंबातील रिचर्ड व इन्क्रीझ, कॉटन, सॅम्युएल व जॉनथन एडवर्ड्‌‌स यांनी केले. अमेरिकन वृत्तपत्रीय लेखन व निबंधलेखन यांस प्रेरणा देणारा ⇨बेंजामिन फ्रँकलिन (१७०६—१७९०) हा या काळातील सर्वांत उल्लेखनीय लेखक असून, त्याची पुअर रिचर्ड्‌‌स ऑल्मनॅक (१७३३—१७५८) व विशेषतः ऑटोबायॉग्रफी (अपूर्ण, १८६८) ही पुस्तके महत्त्वाची मानली जातात.

स्वातंत्र्ययुद्धाचा पूर्वोत्तर कालखंड: अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध (१७७५—१७८३) व नंतरचे अमेरिकन संघराज्याचे संविधान यांचा फार मोठा परिणाम साहित्यनिर्मितीवर झाला. प्रभावी वक्ते व प्रेरक विचारवंत यांच्या भाषणांतून व लेखनातून अमेरिकन बौद्धिक जीवनाचा व संविधानाचा पाया घातला गेला. पॅट्रिक हेन्‍री (१७३६—१७९९), ⇨टॉमस पेन (१७३७—१८०९), ⇨जॉर्ज वॉशिंग्टन (१७३२—१७९९), जॉन ॲडॅम्स (१७३५—१८२६), ⇨टॉमस जेफर्सन (१७४३—१८२६), जेम्स मॅडिसन (१७५१—१८३६) व ⇨अलेक्झांडर हॅमिल्टन (१७५५—१८०४) हे विचारवंत उल्लेखनीय आहेत. या काळातील अमेरिकन काव्यरचनेवर इंग्रजीतील नव-अभिजाततावादी काव्याचा प्रभाव होता. नवभूमीची स्तुती व राजकीय स्वातंत्र्य हे मुख्य काव्यविषय होते. या काळातील ‘येल कवी’ म्हणून गाजलेल्या कवींत जॉन ट्रंबल (१७५०—१८३१), टिमथी ड्‌‌वाइट (१७५२—१८१७) व जोएल बार्लो (१७५४—१८१२) यांचा समावेश होतो. फिलिप फ्रीनो (१७५२—१८३२) हा महत्त्वाचा भावकवी होय. पतित स्त्रियांच्या भावविवश कहाण्या काही स्त्रीकादंबरीकारांनी याच काळात प्रसिद्ध केल्या. चार्ल्स ब्रॉकडेन ब्राउन (१७७१—१८१०) हा पहिला उल्लेखनीय कादंबरीकार होय. भडक व चित्तथरारक कादंबऱ्यांची परंपरा त्यानेच सुरू केली. वीलंड (१७९८) ही त्याची एक प्रसिद्ध कादंबरी होय.रॉयल टायलर (१७५७—१८२६) याची काँट्रास्ट (१७८७) ही रंगभभूमीवर आलेली पहिली अमेरिकन सामाजिक सुखात्मिका होय. विल्यम डनलॅप (१७६६—१८३९) हा या कालखंडातील दुसरा एक यशस्वी नाटककार, दिग्दर्शक व नाट्येतिहासलेखक होय. मीशेल गीयोम झां द क्रेव्हकर (जे. हेक्टर सेंट जॉन) (१७३५—१८१३) व ह्यू ब्रॅकनरिज यांचे पश्चिम अमेरिकेतील वसाहतविस्तारावरील वृत्तांतलेखन आकर्षक आहे.

राष्ट्रीय प्रबोधनाचा कालखंड : अमेरिकन वसाहतींच्या या विस्तारकाळात उद्योगधंदे, शिक्षणसंस्था व वृत्तपत्रे यांची झपाट्याने वाढ होत होती. राष्ट्रीय अस्मिता निर्माण होत होती व म्हणूनच राष्ट्रीय अमेरिकन साहित्याच्या अभावाची तीव्र जाणीव व्यक्त करण्यात आली. या कालखंडातील प्रमुख वाङ्‌मयीन प्रेरणा स्वाभाविकपणे स्वच्छांदतावादी होती पण अमेरिकन स्वच्छंदतावाद प्रतिक्रियात्मक नव्हता. राष्ट्रीयता, प्रादेशिकता, लोकसाहित्याचे प्रेम, व्यक्तिवाद, जर्मन प्रभावातून निर्माण झालेला प्यूरिटनविरोधी व्यक्तिकेंद्रित अतशायितावाद व व्यापक आदर्शवाद या सर्व विशेषांनी तो घडविलेला होता. ⇨राल्फ वाल्डो एमर्सन (१८०३—१८८२), ⇨अब्राहम लिंकन (१८०९—१८६५) व हेन्‍री थोरो (१८१७—१८६२) यांचा निबंध—भाषणांतून व्यक्तिस्वातंत्र्य, अतिशायितावाद, आदर्शवाद आणि निसर्ग व मानव यांतील संबंध यांवरील प्रेरक विचार आढळतात. त्यांचा तत्कालीन लेखकांवर परिणाम झाला. पृथगात्म व स्वतंत्र अमेरिकन साहित्य प्रथमच निर्माण करणारे लेखक म्हणजे कथाकार ⇨वॉशिंग्टन अर्व्हिंग (१७८३—१८५९), कादंबरीकार ⇨जेम्स फेनिमोर कूपर (१७८९—१८५१) व कवी विल्यम ब्रायंट (१७९४—१८७८) हे होत. अर्व्हिंगच्या कथा अद्‌‌भुतरम्य लोककथांवर आधारलेल्या असून त्यांस आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी लाभली. ⇨हर्मन मेल्‌‌व्हिल (१८१९—१८९१) याची मोबी डिक (१८५१) ही कादंबरी प्रतीकरूपाने जीवनसंघर्षातील मूलभूत तत्त्वांचे दर्शन घडविते. ⇨एडगार ॲलन पो (१८०९—१८४९) याच्या ‘द बेल्स’ व ‘द रेव्हन’ यांसारख्या कविता, ‘द पिट अँड द पेंड्युलम’ सारखी चित्तथरारक भयकखा व समीक्षात्मक लेखन उल्लेखनीय आहे. हॅरिएट बीचर स्टो (१८११—१८९६) हिची अंकल टॉम्स कॅबिन (१८५२) ही निग्रो जीवनावरील कादंबरी जगप्रसिद्ध आहे. ⇨ नथॅन्यल हॉथॉर्न (१८०४—१८६४) याच्या कादंबऱ्यांत प्यूरिटन प्रवृत्तींचा संघर्ष आढळतो. द स्कारलेट लेटर (१८५०) ही त्याची प्रसिद्ध कादंबरी होय. सर्वश्रेष्ठ मानला गेलेला अमेरिकन कवी ⇨वॉल्ट व्हिटमन (१८१९—१८९२) याच कालखंडातील असून त्याचा लीव्ह्ज ऑफ ग्रास (१८५५) हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. उच्च वर्गातील व म्हणून गमतीने ‘बॉस्टनचे ब्राह्मण’ म्हणून ओळखले जाणारे ⇨लाँगफेलो (१८०७—१८८२), ⇨ऑलिव्हर वेंड्‌‌ल होम्स  व (१८०९—१८९४)  जेम्स रसेल लोवेल (१८१९—१८९१) हे लेखक उल्लेखनीय आहेत. जॉन व्हिटिअर (१८०७—१८९२) याच्या काव्यात निग्रो गुलामगिरीविरुद्ध विचार व्यक्त झाले आहेत.

ललितेतर साहित्यात द काँक्वेस्ट ऑफ मेक्सिको (१८४३) लिहिणारा महत्त्वाचा पहिला अमेरिका इतिहासकार विल्यम प्रेस्कॉट (१७९६—१८५९), द ऑरेगॉन ट्रेल (१८४९) लिहिणारा दुसरा इतिहासकार फ्रॅन्सिस पार्कमन (१८२३—१८९३) व अमेरिकेतील पक्ष्यांच्या जीवनावर लिहिणारा जॉन ऑडूबॉन (१७८५— १८५१) हे उल्लेखनीय आहेत.

यादवीयुद्धोत्तर कालखंड : यादवी युद्धामुळे (१८६१—१८६५) अमेरिकन जीवन ढवळून निघाले. युद्धोत्तर काळात उद्योगीकरणाचा वेग वाढला. यंत्रयुगाची सुरुवात झाली. पैसा व सत्ता ही ध्येये ठरली.


सरंजामशाहीचे व स्वच्छंदतावादाचे आदर्श नष्ट होऊ लागले. नियतकालिकांची वाढ झाली. वाचकवर्गही वाढू लागला. वाङ्‌मयक्षेत्रात प्रादेशिक वर्णनाची प्रवृत्ती निर्माण होऊ लागली. त्याचप्रमाणे सामाजिक व आर्थिक विषमतेची जाणीवही व्यक्त होऊ लागली. सोनेरी मुलाम्याखालील तीव्र अंतर्विरोध जॉन हे (१८३८–१९०५) व हेन्‍री ॲडॅम्स (१८३८–१९१८) यांनी निनावीपणे व ⇨मार्क ट्‌‌वेन (१८३५–१९१०) व सी. डी. वॉर्नर (१८२९–१९००) या दोघांनी निर्भयपणे, अनुक्रमे द ब्रेड विनर्स (१८८४), डेमॉक्रसी, ॲन अमेरिकन नॉव्हेल (१८८०) व द गिल्डेड एज (१८७३) या पुस्तकांतून व्यक्त केले. त्याच अंतर्विरोधाची विनोदपूर्ण अभिव्यक्ती  डेव्हिड लॉक (१८३२–१८८८),   हेन्‍री व्हीलर शॉ (जॉश बिलिंग्ज, १८१८–१८८५), चार्ल्‌‌स फॅरर ब्राउन (आर्टिमस वॉर्ड, १८३४–१८६७) व सॅम्युएल लँग्‌‌हॉर्न क्लेमंझ (मार्क ट्‌‌वेन) यांच्या विनोदी लेखनातून दिसू लागली. प्रादेशिक कथासाहित्याला विशेष बहर आला. ब्रेड हार्ट (१८३६–१९०२), जॉन हे, जोवाकीन मिलर (१८४१ ? – १९१३), जॉर्ज वॉशिंग्टन केबल (१८४४–१९२५) व जोएल चँडलर हॅरिस (१८४८– १९०८) हे उल्लेखनीय प्रादेशिक कथालेखक व कादंबरीकार होत. मार्क ट्‌‌वेन या अष्टपैलू लेखकाच्या दि ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर (१८७६) व दि ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबरी फिन (१८८४) या कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. वास्तववादी व तंत्रद्दष्ट्या परिपूर्ण कादंबऱ्या लिहिणाऱ्यांत विल्यम डीन हॉवेल्स (१८३७–१९२०), आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी लाभलेला ⇨हेन्‍री जेम्स (१८४३–१९१६) व आपल्या वास्तववादाला प्रादेशिकतेची डूब देणारा हॅम्‍लिन गार्लंड (१८६०–१९४०) यांचा समावेश होतो. एडवर्ड बेलमी (१८५०– १८९८) याच्या लुकिंग बॅकवर्ड (१८८८) या कादंबरीत भविष्यकालीन समाजवादी समाजारचनेचे स्वप्न रेखाटलेले आहे. हॅम्‍लिन गार्लंडच्या कादंबर्‍यांत शेतकऱ्यांचे प्रश्नोपप्रश्न आहेत. ⇨एमिली डिकिन्सन (१८३०–१८८६) ही या कालखंडातील सर्वश्रेष्ठ कवयित्री होय. बाह्य जगातील घडामोडींपेक्षा, स्वतःच्या भावविश्वाशी प्रामाणिक राहून तिने भावोत्कट व अकृत्रिम शैलीत कविता लिहिल्या. सिडनी लॅनिअर (१८४२– १८८१) हा स्वच्छंदतावादी वृत्तीचा एक उल्लेखनीय कवी होय. जेम्स व्हिटकंब रायली (१८४९–१९१६) यांच्या कवितांत प्रादेशिक वर्णने आढळतात त्यांवर लोकगीतांचा प्रभाव आहे.

आधुनिक कालखंड: अमेरिकन साहित्याचा हा उत्कर्षकाळ होय. या कालखंडात प्रादेशिकतेच्या प्रेरणा क्षीण झाल्या. व्यक्ती आणि लोकशाही, व्यक्ती आणि परंपरा व व्यक्ती आणि तिचा सामाजिक परिसर यांच्या परस्परसंबंधांतील समस्या साहित्यातूनच प्रकट होऊ लागल्या. दोन जागतिक महायुद्धे व आर्थिक महामंदी यांचे फार मोठे परिणाम साहित्यावर झाले. इंग्रजी व इतर यूरोपीय वाङ्‌मयीन विचारांचे संस्कारही त्यावर अपरिहार्यपणे झाले. अमेरिकन कथा, कादंबरी व साहित्यसमीक्षा यांचा विशेषत्वाने विकास झाला. नाटक व रंगभूमी स्थिरपद झाली. काव्यक्षेत्रात अखंड प्रयोगशीलता दिसू लागली. अनौपचारिक निबंधांची जागा नियतकालिकांतील स्फुट लेखांनी घेतली. चरित्रात्मक लेखनाची गती मात्र मंदावली.

 कादंबरी: व्यक्ती आणि तिचा सामाजिक परिसर यांचे यथार्थवादी चित्रण कादंबरीतून उमटू लागले.

स्टीव्हन क्रेन (१८७१–१९००), फ्रँक नॉरिस (१८७०–१९०२) व ⇨थीओडोर ड्रायझर (१८७१–१९४५) यांच्या अनुक्रमे मॅगी : ए गर्ल ऑफ द स्ट्रीट्‌स (१८९३), मॅक्टीग (१८९९) व ॲन अमेरिकन ट्रॅजेडी (१९२५) या कादंबऱ्यांत भेदक व कठोर वास्तवाचे दर्शन घडते. थीओडोर रूझवेल्टने ‘मक्‌‌रेकर’ (घाण उपसणारे) म्हणून ज्यांस हिणविले, अशा लेखकांनी व्यापारी व सत्ताधारी वर्गांच्या दोषांवर कडाडून हल्ले केले. आय्‌डा टार्बेलची (१८५७–१९४४) दि हिस्टरी ऑफ द स्टँडर्ड ऑइल कंपनी (१९०४), लिंकन स्टेफन्सची (१८६६–१९३६) दि शेम ऑफ द सिटीज (१९०४) व डेव्डिड फिलिप्सची (१८६७–१९११) सुझ्‌न लेनक्स : हर फॉल अँड राइझ (१९१७) या कादंबऱ्या ‘मक्‌रेकर’ या वर्गात येतात.⇨अप्टन सिंक्‍लेअर (१८७८–१९६८) याने सुधारणावादी दृष्टीने धर्म, शिक्षण, मोठे उद्योगधंदे या सर्वच विषयांवर कादंबऱ्या लिहिल्या. याची द जंगल (१९०६) व ‘लॅनी बड’ ही १९१४ ते १९५३ या काळातील घटनांवर आधारलेली अकरा कादंबऱ्यांची मालिका प्रसिद्ध आहे. विल्यम व्हाइट (१८६८–१९४४) व बूथ टार्किग्टन (१८६९– १९४६) यांच्या कादंबर्‍यांत ग्रामीण जीवनाचे आदर्शवादी चित्रण आढळते. मध्यमवर्गीय जगाचे वास्तववादी वर्णन ⇨ल्यूइस सिंक्‍लेअरच्या (१८८५–१९५१) कादंबऱ्यांत आढळते. मेन स्ट्रीट (१९२०), बॅबिट (१९२२) व ॲरोस्मिथ (१९२५) ह्या त्याच्या उल्लेखनीय कादंबऱ्या होत. प्रयोगशील अमेरिकन लेखिका गर्ट्‌रूड स्टाइन (१८७४–१९४६) हिची द मेकिंग ऑफ अमेरिकन्स (१९२५) ही कादंबरी उल्लेखनीय आहे. ⇨अर्नेस्ट हेमिंग्वे (१८९८–१९६१) याच्या, पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील  फेअरवेल टू आर्म्स (१९२९) व स्पॅनिश यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवरील फॉर हूम द बेल टोल्स (१९४०) या कादंबऱ्या व द ओल्ड मॅन अँड द सी (१९५२) ही मानवी युयुत्सू वृत्तीची प्रतीकात्मक कादंबरी जगप्रसिद्ध आहे. हेमिंग्वेला १९५४ मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. ⇨विल्यम फॉक्‌नर (१८९७–१९६२) यासही हे पारितोषिक मिळाले असून (१९५०) त्याच्या द साउंड अँड द फ्यूरी  (१९२९) वलाइट इन ऑगस्ट (१९३२) या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. ⇨पर्ल  बकच्या (१८९२–१९७३) कादंबऱ्या चिनी कृषिजीवनावर आधारलेल्या असून, द गुड अर्थ (१९३१) ही तिची कादंबरी विशेष प्रसिद्ध आहे. १९३८ मध्ये तिला नोबेल पारितोषिक मिळाले. ⇨जॉन स्टाइनबेक (१९०२–१९६८) हाही नोबेल पारितोषिक विजेता (१९६२) असून त्याच्या कथासाहित्यात शेतमजुरांच्या समस्यांचे वास्तव वर्णन आढळते. त्याची द ग्रेप्स ऑफ रॉथ (१९३९) ही कादंबरी विशेष महत्त्वाची आहे. श्रेष्ठ मानल्या गेलेल्या अन्य अमेरिकन कादंबरीकारांत फ्रान्सिस स्कॉट फिट्‌‌जेरल्ड (१८९६–१९४०), ⇨जॉन डॉस पॅसॉस (१८९६–१९७०) व ⇨टॉमस वूल्फ (१९००–१९३८) यांचा समावेश होतो. लिलिअन स्मिथच्या (१८९७–     ) स्ट्रेंज फ्रूट (१९४४) व रिचर्ड राइट (१९०९–१९६०) या निग्रो लेखका- च्या नेटिव्ह सन (१९४०) व ब्‍लॅक पॉवर (१९५४) या कादंबऱ्यांत निग्रोंचे जीवनचित्रण आढळते. हेन्‍री जेम्स व हॉवेल्स यांच्या परंपरेतील उल्लेखनीय उच्चवर्गीय कादंबरीकार ईडिथ व्हॉर्टन (१८६२–१९३७) व विला कॅथर (१८७६–१९४७) या होत. प्रादेशिक व ऐतिहासिक कादंबऱ्या अखंडपणे निर्माण होत होत्या. त्यांपेकी मार्गारेट मिचेलच्या (१९००–१९४९) गॉन विथ द विंड (१९३६) या यादवी युद्धावरील कादंबरीला जगभर लोकप्रिय- ता लाभली. जेम्स कॅबेलची (१८७९–१९५८) जर्गेन (१९१९) ही कादंबरी, मध्ययुगीन कल्पनाविश्वाचे चित्रण करून त्यातून आधुनिक जीवनावर भाष्य करण्याचा प्रयत्‍न करते. सद्यःकालीन कादंबरीकारांत ‘बीट जनरेशन’चे वर्णनकर्ते जॅक केरूॲक (१९२२–१९६९) आणि ⇨नॉर्मन मेलर (१९२३–    ) निग्रो लेखक ⇨जेम्स बॉल्डविन (१९२४–    ) व राल्फ एलिसन (१९१४–     ) आणि ⇨जॉन ओहारा (१९०५–१९७०), ⇨सॉल बेलो (१९१५–  ), ⇨जे. डी. सॅलिंजर (१९१९–    ), जेम्स जोन्स (१९२१– ), अर्विन शॉ (१९१३–    ), बर्नर्ड मॅलॅमूद (१९१४–    ), जॉन बार्थ (१९३०–   ), कुर्ट वॉनेगूट (१९२२–   ), फिलिप रॉथ इ. लेखक उल्लेखनीय आहेत.


कथा: कथाक्षेत्रात ⇨ओ. हेन्‍री  (विल्यम सिडनी पोर्टर, १८६२–१९१०) याच्या, शेवटी अनपेक्षित कलाटणी असलेल्या, कथा अत्यंत लोकप्रिय ठरल्या. द फोर मिल्यन (१९०६) हा त्याच्या तंत्रशुद्ध चित्तवेधक कथांचा एक संग्रह होय. शेरवुड अँडरसन (१८७६–१९४१) याच्या वाइन्सबर्ग ओहायो  (१९१९) या कथा- संग्रहात व अन्य कथासाहित्यात संभ्रमित व्यक्तिमनांचे भेदक दर्शन घडते. द न्यूयॉर्कर, एस्क्वायर स्टोरी  यांसारख्या मासिकांनी कथानिर्मितीला मोठी चालना दिली. हेमिंग्वे, फॉक्‌नर, विल्यम सरॉयन (१९०८–   ), कॉनरॅड एकिन (१८८९–  ), अर्स्किन कॉल्डवेल (१९०३–   ), कॅथरिन ॲन पोर्टर (१८९४–   ), के बॉयल (१९०३–   ), व ⇨जेम्स थर्बर (१८९४–१९६१) यांचे कथालेखन वैशिष्ट्यपूर्ण आहे.

काव्य : अमेरिका काव्यसृष्टीतील मोठे परिवर्तन हॅरिएट मन्‍रोने (१८३१ ? – १९३६) १९१२ मध्ये शिकागोला सुरू केलेल्या पोएट्री :ए मॅगझिन ऑफ व्हर्स या मासिकाने घडवून आणले. तत्पूर्वीचा उल्लेखनीय कवी एडविन आर्लिंग्टन रॉबिन्सन (१८६९–१९३५) हा असून त्याच्या कवितांत मानवी जीवनाच्या व्यर्थतेची सखोल जाणीव व्यक्त होते. शिकागोचे पहिले तीन प्रसिद्ध कवी म्हणजे ⇨कार्ल सँडबर्ग (१८७८–१९६७), निकोलस वेचल लिंडसे (१८७९–१९३१) व एडगर ली मास्टर्स (१८६९–१९५०) हे होत. हे सर्व बहुजन- वर्गाचे कवी होते. सामान्यांच्या भावविश्वाचे प्रभावी दर्शन त्यांच्या काव्यांतून घडते. ⇨एझरा पाउंडच्या (१८८५–१९७२) काव्यविषयक विचारांच्या प्रभावातून अमेरिकन काव्यात ⇨प्रतिमावाद अवतरला. एमी लोएल (१८७४–१९२५) ही एझरा पाउंडची शिष्या असून तिचे आठ काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. प्रतिमावादी कवींपैकी जॉन गूल्ड फ्लेचर (१८८६–१९५०), एच. डी. (हिल्डा डूलिट्ल, १८८६–१९६१) हे उल्लेखनीय आहेत. ⇨टी. एस्. एलियटच्या (१८८८–१९६५) द वेस्ट लँड (१९२२) ह्या काव्याचा व काव्यविचारांचा परिणामही मोठा होता. त्यामुळे तत्वगर्भ आशयाचे व सूचक अभिव्यक्तीचे बौद्धिक काव्य निर्माण होऊ लागले. एलिनॉर वायलीच्या(१८८५–१९२८ कवितांत भ्रमनिरास व तदनुषांगिक नैराश्य आढळते. ⇨ ई. ई. कमिंग्ज (१८९४–१९६२) याच्या पोएम्स (१९२३–१९५४) या संग्रहातील कवितांत चमत्कृतिपूर्ण अभिव्यक्ती व भेदक आशय दिसून येतो. ⇨विल्यम कार्‌लॉस विल्यम्स (१८८३–१९६३), एडना सेंट व्हिन्सेंट मिले (१८९२–१९५०), हार्ट क्रेन (१८९९–१९३२), रॉबिन्सन जेफर्स (१८८७–१९६२), ⇨वॉलेस स्टीव्हन्स (१८७९–१९५५), सेरा टीस्डेल (१८८४–१९३३), मेरियन मुर (१८८७–   ) व स्टीव्हन व्हिन्सेंट बेने (१८९८–१९४३) हे विसाव्या शतकातील महत्त्वाचे अमेरिकन कवी होत. आर्चिबल्ड मक्लीश (१८९२–   ) याचे काव्य विविध प्रकारच्या शैलीविशेषांनी व त्यातील समाजाभिमुखतेमुळे उल्लेखनीय ठरते. ⇨रॉबर्ट फ्रॉस्ट (१८७४–१९६३) हा एक श्रेष्ठ कवी होय. ग्रामीण जीवनाचे वास्तव, साधे पण सुंदर वर्णन व सखोल तत्त्वदर्शन त्याच्या काव्यात आढळते. रिचर्ड विल्बर (१९२१–  ), कार्ल शपिरो (१९१३–  ), थीओडोर रोएथकी (१९०८–१९६३), रोथ्‌क रँड्‌ल जॅरेल (१९१४–१९६५), पीटर व्हायरेक (१९१६–  ), डेल्मॉर श्वार्ट्‌झ (१९१३–  ), रॉबर्ट लोएल (१९१७–  ), कॅनिथ पॅचन (१९११–  ), सिल्व्हिया प्लॅथ (१९३२–१९६३) व बीट जनरेशनचा एक अध्वर्यू ॲलन गिन्सबर्ग (१९२६–  ) हे सध्याच्या काळातील उल्लेखनीय कवी होत.

 नाटक: अमेरिकन नाटक व रंगभूमी यांचा विकास विसाव्या शतकातच झाला. तत्पूर्वी क्लाइड फिच (१८६५-१९०९) याने यूरोपियन नाटकांची रूपांतरे व दी ट्‌रुथ (१९०७) सारखी स्वतंत्र नाटके लिहिली.

यूजीन ओनील (१८८८–१९५३) ह्याने अमेरिकन रंगभूमी व नाट्यसाहित्य यांचा पाया घातला. त्यास नोबेल पारितोषिकही मिळाले (१९३६). रुक्ष पण भेदक वास्तवता, सूक्ष्म मनोविश्लेषण व अभिव्यक्तिवादी रचनातंत्र ही ओनीलच्या नाटकांत आढळतात. ओनीलच्या मागोमाग प्रभावी नाटककारांची एक परंपराच निर्माण झाली. तीत सिडनी हॉवर्ड (१८९१–१९३९), फिलिप बॅरी  (१८९६–१९४९), जॉर्ज कॉफ्‌मन (१८८९ –१९६१), ⇨एल्मर राइस (१८९२–१९६७), थॉर्नटन वाइल्डार (१८९७–    ), ⇨टेनेसी विल्यन्स (१९१४–    ), एडवर्ड ॲल्बी (१९२८–),  व ⇨आर्थर मिलर (१९१५–  ) यांचा समावेश होतो.

समीक्षा: एकोणिसाव्या शतकापर्यंतची अमेरिकन समीक्षा प्राधान्याने नव-अभिजाततावादी होती. एमर्सन व पो यांनी तिला स्वच्छंदतावादी वळण देण्याचा प्रयत्‍न केला. विसाव्या शतकाच्या आरंभी ब्रँडर मॅथ्यूज (१८५२–१९२९), जॉर्ज नेथन (१८८२–१९५८), लूइस मम्‌फर्ड (१८९५–   ), वॉल्डो फ्रँक (१८८९–    ) व हेन्‍री लूइस मेंक्‌न (१८८०–१९५६) यांनी पारंपरिक टीकेच्या मर्यादा स्पष्ट केल्या. त्याचप्रमाणे जुन्या नव्या टीकेचा समतोल साधण्याचा सुजाण प्रयत्‍न विल्यम ब्राउनेल (१८५१–१९२८), स्ट्यूअर्ट शेरमन (१८८१– १९२६) व जॉर्ज एडवर्ड वुडबेरी (१८५५–१९३०) यांनी केला. अर्व्हिग बॅबिट (१८६५–१९३३) व पॉल मोर (१८६४–१९३७) यांची समीक्षा नव-मानवतावादी व समन्वयवादी आहे. एझरा पाउंड व टी. एस्. एलियट यांच्या वाङ्‌मयविचारांचा प्रभाव नव्या काव्यनिर्मितीवर विशेषत्वाने जाणवतो. नवटीकाकार म्हणून

गाजलेल्यां पैकी क्लेथ ब्रुक्स (१९०६–  ), आयव्हर विंटर्स (१९००– ), रिचर्ड पामर ब्‍लॅक्मर (१९०४– १९६५) व केनेथ बर्क (१८९७–  ) यांचा आकारवादी दृष्टिकोन, ॲलन टेट (१८९९– ) व जॉन क्रो रॅन्सम (१८८८– ) यांची सौंदर्यात्मक व सत्ताशास्त्रीय भूमिका एडमंड विल्सन (१८९५–  ) व लायनेल ट्रिलिंग (१९०१–  ) यांचा इतिहासनिष्ठ दृष्टिकोन व ⇨मॅक्स ईस्टमन (१८८३–१९६९) व ग्रेनव्हिल हिक्स (१९०१–   ) यांची साम्यवादी भूमिका ह्या विशेषत्वाने लक्षात येतात. व्हर्नन लूइस पॅरिंग्टन (१८७१–१९२९) हा समाजशास्त्रीय व व्हॅन वाइक ब्रुक्स हा मनोविश्लेषणाच्या दृष्टिकोनातून वाङ्‌मयाचे मूल्यमापन करतो. रॉबर्ट पेन वॉरेनच्या (१९०५– ) टीकेत व्यासंग व सर्वांगीण वाङ्‌मयीन समज आढळते. नव्या अमेरिकेन टीकेने साहित्यकृतीच्या अंतर्गत घटकांना महत्त्व देऊन शुद्ध वाङ्‌मयीन अभिरूची निर्माण करण्यास हातभार लावला.

नियतकालिके : जॉन कँप्‌बेलचे (१६५३–१७२८) बॉस्टन न्यूजलेटर (१७०४) हे सुरळीत चाललेले पहिले अमेरिकन वृत्तपत्र. नंतरच्या काळातील निकरबॉकर्स मॅगझिन (१८३३–१८६५), सदर्न लिटररी मेसेंजर (१८३४–१८६४) व द डायल (१८४०–१८४४) या मासिकांनी लेखकांना उत्तेजन दिले. हार्पर्स मंथ्‌ली मॅगझिन (१८५०) व द अटलांटिक मंथ्‌ली  (१८५७) ही मासिके आजही चालू आहेत. विद्यापीठीय नियतकालिकांची प्रथा द येल रिव्ह्यूने (१९११) पाडली. आज अनेक विद्यापीठांची स्वतंत्र नियतकालिके आढळतात. पोएट्री : ए मॅगझिन ऑफ व्हर्स  (१९१२) व द फ्यूजिटिव्ह (१९२२–१९२५) यांसारख्या मासिकां- नी नव्या कवींना व लेखकांना प्रसिद्धी दिली. दि सॅटर्डे रिव्ह्यू (१९२४), पार्टिझन रिव्ह्यू  (१९३४) व केन्यन रिव्ह्यू  (१९३९) यांनी वाङ्‌मयीन विचाराची सातत्याने जपणूक केली आहे. व्हिक्टोरियन स्टडीज (१९५७) सारखी एकाच विवक्षित विषयाला वाहिलेली वाङ्‌मयीन मासिकेही पुष्कळ आहेत.

साहित्यसंस्था व पारितोषिके : द मॉडर्न लँग्वेज असोसिएशन  (१८८३) ही संस्था वाङ्‌मयीन व भाषिक संशोधन, त्याचे प्रकाशन व वाङ्‌मयचर्चा हे कार्य करते. इंग्रजी वाङ्‌मयाहून अमेरिकन वाङ्‌मय वेगळे व स्वतंत्र आहे, हा विचार याच संस्थेतील अभ्यासकांनी पुढे मांडला. लायब्ररी ऑफ काँग्रेस  (१८००) हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे राष्ट्रीय ग्रंथालय आहे. हार्व्हर्ड विद्यापीठाचे ग्रंथालयही प्रसिद्ध आहे. उत्तम साहित्यकृती- ला १९१७ पासून ‘पुलिट्‌झर पारितोषिक’ देण्यात येते. लेखन व संशोधन यांस उत्तेजन देण्यासाठी जॉन सायमन गुगेनहाइम यांच्या स्मृत्यर्थ १९२५ पासून अनुदाने देण्यात येतात.

संदर्भ : 1. Benet, W. R. Pearson, N. H. Ed.The Oxford Anthology of American Literature, 2 vols., N.Y. 1938.

         2. Bogan, Louise,Achievement in American Poetry, 1900–1950, Chicago, 1951.

         3. Hart, J. D. Oxford Companion to American Literature, N. Y. 1965.

         4. Hoffman, F. J. The Modern Novel in America, 1900–1950, Chicago, 1951.

         5. Kazim, Alfred, On Native Grounds : An Interpretation of Moderm Prose Literaturefrom, 1890 to the Present, N. Y. 1956.

         6. Matthiessen, F. O. American Renaissance : Art and Expression in the Age of Emerson and Whitman, N. Y. 1941.

         7. Matthiesen, F. O. Ed. The Oxford Book of American verse, N.Y. 1950.

         8. Quinn, A. H. A History of American Drama, N. Y. 1936.

         9. Spiller, R. E. and Others, Ed. Literary History of the United States, N. Y. 1953.

नाईक, म. कृ. जाधव, रा. ग.