ब्लंडेन, एडमंड चार्ल्स : (१ नोव्हेंबर १८९६ – २० जानेवारी १९७४). इंग्रज कवी व समीक्षक. यॉल्डिंग, केंट येथे जन्मला. क्राइस्ट हॉस्पिटल आणि क्वीन्स कॉलेज, ऑक्सफर्ड येथे शिक्षण घेतले. पहिल्या महायुद्धात त्याने सैन्यात नोकरी केली आणि ‘मिलिटरी क्रॉस’ हे मानचिन्ह मिळविले. पहिल्या महायुद्धानंतर तो पत्रकारीकडे वळला आणि अथेनिअम ह्या वाङ्‌मय कलाविषयक नियतकालिकात संपादकीय स्वरूपाचे काम करू लागला. द शेपर्ड हा ब्लंडेनचा पहिला काव्यसंग्रह १९२२ मध्ये प्रसिद्ध झाला. त्याला ‘हॉथार्डन प्राइझ’ मिळाले. टोकिओ, ऑक्सफर्ड व हाँगकाँग विद्यापीठांतून ब्लंडेनने इंग्रजीच्या अध्यापनाचे काम केले (१९२४ – २७ १९३१ – ४३ १९५३ – ६४). १९५१ मध्ये ‘कमांडर ऑफ द ब्रिटिश एंपायर’ हा किताब देऊन त्याचा गौरव करण्यात आला. १९६६ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातील काव्य ह्या विषयाच्या अध्यासनावर ब्लंडेनची नियुक्ती झाली.

ब्लंडेन हा त्याच्या अंडरटोन्स ऑफ वॉर (१९२८) ह्या काव्यसंग्रहामुळे विशेष प्रसिद्धीला आला. पहिल्या महायुद्धातील अनुभवांची छाया त्यातील कवितांवर पडलेली असून युद्धात अकारण होणाऱ्या मानवी जीवनाच्या हानीबद्दलची व्यथा ब्लंडनने त्यांत संयमाने व्यक्त केली आहे. ए हाँगकाँग हाउस (१९६२) मधील कवितांवर पौर्वात्य वातावरणाचा प्रभाव आहे १९५७ मध्ये पोएम्स ऑफ मेनी यीअर्स हा त्याचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. निसर्गसौंदर्यातील अनाकलनीय, सर्वव्यापी गूढतेबद्दल वाटणारी ओढ हे ब्लंडेनच्या कवितेचे एक लक्षणीय वैशिष्ट्य.

ब्लंडेनच्या समीक्षात्मक लेखनात नेचर इन इंग्लिश लिटरेचर (१९२९), चार्ल्स लँब अँड हिज कंटेपररीज (१९३४), टॉमस हार्डी (१९४१) ह्यांसारख्या व्यासंगपूर्ण ग्रंथांचा समावेश होतो. लँग मेलफर्ड, सफक येथे तो निधन पावला.

वानखेडे, म. ना.