जॉन्सन, बेन : (१५७२ ? – ६ ऑगस्ट १६३७). इंग्रज नाटककार व कवी. जन्म वेस्टमिन्स्टर येथे. शिक्षण ‘वेस्टमिन्स्टर स्कूल’मध्ये विल्यम कॅम्‌डेन ह्या  प्रसिद्ध इतिहासकाराच्या हाताखाली झाले. जॉन्सनने १५८८ मध्ये शाळा सोडली असावी. त्यानंतर काही काळ त्याने आपल्या सावत्र वडिलांना त्यांच्या बांधकाम व्यवसायात साहाय्य केले. पुढे काही वर्षे त्याने काय केले ह्यासंबंधी निश्चित स्वरूपाचे तपशील मिळत नाहीत. तथापि १५९२ च्या आधी केव्हा तरी तो फ्लँडर्स येथे सैनिकी जीवन जगला, असे दिसते. १५९२–९५ च्या दरम्यान त्याचा विवाह झाला परंतु त्याचे वैवाहिक जीवन सुखाचे नव्हते. १५९७ मध्ये फिलिप हझेंलो ह्या लंडनमधील नाट्यगृहव्यवस्थापकाकडे जॉन्सनने नट आणि नाटककार म्हणून नोकरी स्वीकारली. १५९८ मध्ये एका नटाला त्याने द्वंद्वयुद्धात ठार मारले. ह्या गुन्ह्याबद्दल तुरुंगात असताना त्याने रोमन कॅथलिक पंथाचा स्वीकार केला आणि पुढे बारा वर्षांनी त्याचा त्याग केला.

 

बेन जॉन्सन

एव्हरी मॅन इन हिज ह्यूमर (१५९८) ह्या त्याच्या सुखात्मिकेमुळे त्याला फार मोठी प्रसिद्धी मिळाली. ही नाट्यकृती लॉर्ड चेंबरलिन ह्याच्या आश्रयाने निघालेल्या त्या वेळच्या प्रसिद्ध नाटकमंडळीने रंगभूमीवर आणली. तीत शेक्सपिअरने एक भूमिका केली होती. ह्या वैशिष्ट्यपूर्ण नाट्यकृतीने ‘कॉमेडी ऑफ ह्यूमर्स’ ह्या एका नवीन सुखात्मिकाप्रकाराला जन्म दिला. नाटकातील एकेका व्यक्तिरेखेच्या प्रधान स्वभाववैशिष्ट्याची प्रभावी, विनोदपूर्ण मांडणी अशा सुखात्मिकांतून केलेली असते. त्यानंतर एव्हरी मॅन आउट ऑफ हिज ह्यूमर  (१५९९), व्हॉलपोन   (१६०७), एपिसीन  (१६०९), द अल्केमिस्ट  (१६१२), बार्‌थॉलोम्यू फेअर (१६१४) अशा अनेक सुखात्मिका त्याने लिहिल्या. सिजेनस  (१६०३) आणि कॅटिलाइन  (१६११) ह्या  त्याच्या शोकात्मिका. तथापि सुखात्मिकाकार म्हणूनच त्याने जास्त लौकिक मिळविला. त्याने काही उत्कृष्ट मास्कही लिहिले. नाट्यात्मक मनोरंजनाचा हा एक प्रकार. संविधानक आणि व्यक्तिरेखन ह्यांपेक्षा नृत्य-संगीताला त्यात विशेष प्राधान्य असे. दरबारी मंडळींत मास्क अत्यंत लोकप्रिय असत. मास्क ऑफ ब्‍लॅकनेस  (१६०५) हा त्याने लिहिलेला पहिला मास्क. त्यानंतर मास्क ऑफ ब्यूटी (१६०८), मास्क ऑफ क्वीन्स (१६०९), लव्ह रिस्टोअर्ड (१६१२) इ. मास्क त्याने लिहिले. जॉन्सनने ह्या मनोरंजनप्रकारास श्रेष्ठ कलात्मकता प्राप्त करून दिली. मास्कबरोबर सादर करण्यासाठी त्याने अँटी-मास्क म्हणून ओळखले जाणारे काही विनोदी विष्कंभकही लिहिले. ॲरिस्टोफेनीसच्या सुखात्मिकांची काही वैशिष्ट्ये त्यांत आढळतात.

 

इतर काही नाटककारांबरोबर सहकार्य करून जॉन्सनने काही नाटके लिहिली. ईस्टवर्ड हो!  (१६०५) ह्या अशाच एका नाटकातील काही आक्षेपार्ह भागाबद्दल चॅपमन आणि मार्स्टन ह्या आपल्या सहनाटककारांबरोबर जॉन्सनलाही तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली होती.

१६१६ मध्ये त्याच्या लेखनाचा एक दुपत्री ग्रंथ (फोलिओ) प्रसिद्ध करण्यात आला. त्याने उत्कृष्ट भावकविताही लिहिल्या आहेत. शेक्सपिअरसारख्या असामान्य प्रतिभाशाली नाटककाराचा समकालीन असूनही जॉन्सनने आपल्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाचा ठसा तत्कालीनांवर उमटविला. प्राचीन ग्रीक-लॅटिन साहित्यकृतींच्या साक्षेपी व्यासंगातून त्याची वाङ्‍मयदृष्टी नव-अभिजाततावादी झालेली होती. स्थळ, काळ आणि कृती ह्यांच्या नाटकांतर्गत ऐक्याचा केवळ पुरस्कार करूनच तो थांबला नाही, तर स्वतःच्या नाट्यकृतींतूनही त्याने त्यांचे कसोशीने पालन केले. नैतिक उद्‍बोधन हे साहित्यिकाचे श्रेष्ठ कर्तव्य होय, अशी त्याची धारणा होती. ‘टिंबर, ऑर डिस्कव्हरीज मेड अपॉन मेन अँड मॅटर्स’ ह्या त्याच्या टिप्पणीवजा लेखनात त्याचे वाङ्‍मयविषयक विचार आढळतात. १६४० मध्ये त्याच्या लेखनाच्या प्रसिद्ध झालेल्या दुपत्री ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीत त्याचा समावेश आहे. प्राचीन अभिजात साहित्यकृतींच्या प्रभावामुळे स्वतःच्या कालासंबंधीचे त्याचे भान मात्र सुटलेले नव्हते.त्याच्या नाट्यकृतींची संविधानके त्या दृष्टीने लक्षणीय आहेत. त्याच्या समकालीन जीवनातील दोषांवर आणि विसंगतींवर त्याने आपल्या नाट्यकृतींतून परिणामकारक भाष्ये केली आहेत.

आपल्या वाङ्‍मयीन कर्तृत्वामुळे जॉन्सनला समाजात आणि राजदरबारी प्रतिष्ठा प्राप्त झाली. १६१६ मध्ये पहिल्या जेम्सने त्याला मानवेतन सुरू केले. १६१९ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने एम्.ए. ही सन्मानपदवी त्याला दिली. लंडनमध्ये तो मरण पावला.

संदर्भ: 1. Barish, Jonas A. Ed. Ben Jonson : A Collections of Critical Essays, New York, 1963.

2. Baum, H. W. The Satiric and Didastic in Ben Jonson’s Comedy, Chapel Hill, 1947.

3. Herdford, C. H. Simpson, Percy Simpson, Evelyn, Ed. The Works of Ben Jonson, 11 Vols., Oxford, 1925–52.

4. Kerr, M. Influence of Ben Jonson on English Comedy, 1598-1642, New York, 1912.

5. Knights, L. C. Drama and Society in the Age of Jonson, London, 1937.

6. Orgel, Stephen, The Jonsonion Masque, Cambridge, Mass, 1965.

 देवधर, वा. चिं.