ब्राउनिंग, रॉबर्ट: (७ मे १८१२-१२ डिसेंबर १८८९). श्रेष्ठ इंग्रज कवी. कँबरवेल ह्या लंडनच्या एका उपनगरात जन्मला. ब्राउनिंगचे औपचारिक शिक्षण फारसे झालेले नव्हते. आरंभीचे काही शिक्षण त्याला त्याच्या वडिलांकडूनच मिळाले. ते अभ्यासू वृत्तीचे होते घरात त्यांनी बराच मोठा ग्रंथसंग्रह जोपासला होता, स्वातंत्र्याचे वातावरणही जपले होते. ह्या ग्रंथसंग्रहातील अनेक दुर्मिळ ग्रंथ ब्राउनिंगला वाचावयास मिळाल्यामुळे त्याच्या ठायी बहुश्रुतपणा आलेला होता. मोकळ्या वातावरणामुळे उदारतेचे संस्कारही त्याच्या व्यक्तिमत्वावर झाले. ब्राउनिंगने जे थोडे औपचारिक शिक्षण घेतले, ते पेकॅममधील एका शाळेत आणि त्यानंतर लंडन विद्यापीठात. निसर्गप्रेम आणि संगीताची आवड ब्राउनिंगने आपल्या आईकडून घेतली. तिच्या  धर्मपरायणतेचा प्रभावही त्याच्यावर पडला होता. विख्यात इंग्रज कवी शेली ह्याच्या कवितेने ब्राउनिंगला काव्यनिर्मितीची प्रेरणा दिली. पुढे कीट्स आणि अन्य स्वच्छंदतावादी इंग्रज कवींची कविताही त्याने वाचली. तथापि ब्राउनिंगच्या पॉलीन : ए फ्रॅगमेंट ऑफ कनेक्शन (१८३३) ह्या पहिल्या प्रकाशित कवितेवर ठळक परिणाम जाणवतो तो शेलीचाच. ही कविता आत्मचरित्रात्मक असून ब्राउनिंगने आपल्या आयुष्याची पहिली वर्षे तीत चित्रित केलेली आहेत. तथापि ही कविता म्हणजे कवीच्या विकृत आत्मजाणिवेचा आविष्कार होय, अशा आशयाची प्रखर टीक सुप्रसिद्ध इंग्रज विचारवंत जॉन स्ट्यूअर्ट मिल ह्याने ह्या कवितेवर केली आणि तिचा ब्राउनिंगच्या पुढील कवितेवर निर्णायक स्वरूपाचा परिणाम झाला. त्यानंतर आत्मपरता टाळून जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ अशी कविता लिहिण्याचा प्रयत्न ब्राउनिंगने केला. पॅरासेल्सस (१८३५), आणि सोरदेल्लो (१८४०) ही ब्राउनिंगने पॉलीन…… नंतर लिहिलेली काव्ये. त्यांना फारसे यश मिळाले नाही तथापि कार्लाइल, वर्ड्स्वर्थ ह्यांसारख्या नामवंत साहित्यिकांचे लक्ष ब्राउनिंगकडे मुख्यतः पॅरासेल्ससमुळे वेधले गेले. ह्या दोन काव्यरचनांच्या दरम्यानच्या काळात ब्राउनिंग नाट्यलेखनाकडे ओढला गेला होता आणि स्ट्रॅफर्ड (१८३७) ही शोकात्मिका त्याने लिहिली होती. १८४१ ते १८४६ ह्या कालखंडात वेल्ज अँड पॉमग्रॅनेट्स ह्या नावाने त्याने अनेक काव्यकृती निर्मिल्या. त्यांत पिप्पा पासेस, ए ब्लॉट इन द स्कचन, ल्यूरिआ ह्यांसारख्या पद्य नाटकांचाही समावेश होतो. पिप्पा पासेस (१८४१) मध्ये ब्राउनिंगच्या समर्थ कवित्वशक्तीची आणि नाट्यदृष्टीची पहिली चाहूल लागते. शहरातून गीते गात जाणाऱ्या पिप्पा नावाच्या एका तरुण कामकरी मुलीच्या गीतांचा विविध व्यक्तींवर कसा विलक्षण परिणाम होत जातो, हे ह्या नाट्यकृतीत प्रभावीपणे दाखविलेले आहे. वेल्ज …. ह्या मालिकेतील ड्रॅमॅटिक लिरिकस (१८४२). ड्रॅमॅटिक रोमान्सीस (१८४५), मेन अँड वूमेन (१८५५) आणि ड्रॅमॅटिस पर्सोनी (१८६४) ह्यांसारख्या काव्यरचनांतून ब्राउनिंगची श्रेष्ठ आणि वैशिष्ट्यपूर्ण काव्यनिर्मितीची क्षमता अधिकाधिक तीव्रतेने प्रत्ययास येते.

रॉबर्ट ब्राउनिंग

एलिझाबेथ बॅरेट ह्या कवियित्रीबरोबर १८४४ नंतर ब्राउनिंगचा पत्रव्यवहार सुरू झाला त्यातून दोघांचे प्रेमसंबंध जुळले आणि १२ सप्टेंबर १८४६ रोजी उभयतांचा विवाह झाला. विवाहानंतर हे दांपत्य इटलीस गेले. १८६१ मध्ये एलिझाबेथचे निधन झाल्यानंतर ब्राउनिंग इंग्लंडला परतला. आपल्या वैवाहिक जीवनाच्या कालखंडात ब्राउनिंगकडून फार थोडे लेखन झाले. ख्रिसमस ईव्ह अँड ईस्टर-डे (१८५०) आणि उपर्युक्त मेन अँड वूमेन अशा काव्यग्रंथाचा त्यात समावेश होतो. शेलीवर एक निबंधही त्याने लिहिला. मेन अँड वूमेन हा ब्राउनिंगच्या ५१ कवितांचा संग्रह. त्यांपैकी तेरा कविता ह्या ड्रॅमॅटिक मॉनलॉग किंवा ‘नाट्यात्मक एकभाषिते’नावाचा जो एक वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार ब्राउनिंगच्या नावाशी निगडीत झालेला आहे, त्यातील होत.

‘नाट्यात्मक एकभाषित’ह्या पद्यप्रकारात एकच व्यक्तिरेखा बोलताना दिसते. तथापि अन्य व्यक्तिरेखांची उपस्थिती, त्यांच्या कृती आणि त्यांचे शब्दही ह्या व्यक्तीच्या निवेदनात अनुस्यूत असतात. एखादा नाट्यात्म क्षण वा जीवनात उभ राहिलेला एखादा संघर्षमय प्रसंग ह्यांनी वा अशाच काही कारणांनी प्रेरित होऊन ही व्यक्तिरेखा आपल्या अंतःकरणाचे कप्पे उघडे करू लागते. तिचा जीवनेतिहास, सामाजिक दर्जा, अन्य उपस्थित व्यक्तिरेखांशी असलेले नाते ह्या आत्माभिव्यक्तीतून स्पष्ट होऊ लागते. हा आत्माभिव्यक्तीला अनेकदा प्रखर उपरोधाची धार असते. आंद्रीआ देल सातों, माय लास्ट डचेस (१८४२), द बिशप ऑर्डर्स हिज टूम (१८४५) ही ब्राउनिंगकृत नाट्यात्मक एकभाषितांची काही प्रसिद्ध उदाहरणे होत. तथापि ब्राउनिंगने आपल्या नाट्यात्मक एकभाषितांतून निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा बहुधा आपला जीवनविषयक दृष्टिकोण वा तत्त्वज्ञा ह्यांचे समर्थन करीत असल्यामुळे त्यांच्या निवेदनात सतत युक्तिवाद येत राहतो आणि त्यामुळे नाट्यहानी होते, अशी टीका ब्राउनिंगवर झालेली आहे. परंतु ह्या नाट्यात्मक एकभाषितांतून ब्राउनिंगने उभ्या केलेल्या व्यक्तिरेखांचे वैविध्य नजरेत भरण्यासारखे आहे (प्रबोधनकालीन कलावंत, वैद्यकीय व्यवसाय करणारा एक अरब, इसवी सनाच्या पहिल्या शतकातला एक कवी, एक अमेरिकन आध्यात्मवादी इत्यादी). आपल्या व्यक्तिगत श्रद्धा आणि विचार ह्यांचे दर्शन घडविण्यासाठी ब्राउनिंगने नाट्यात्मक एकभाषितांचा परिणामकारकपणे उपयोग करून घेतला. त्यासाठी त्याने निर्माण केलेल्या काही व्यक्तिरेखा ऐतिहासिक म्हणून मांडल्या गेल्या असल्या, तरी त्या पूर्णतः ऐतिहासिक आहेत, असे नाही. त्यांत ब्राउनिंगने आपल्या कल्पनेचे रंग भरलेले आहेत.


तथापि अनेकदा एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीचे व तिच्या कालखंडाचे सत्त्व नेमके पकडण्याचा प्रयत्न ब्राउनिंगने केलेला आहे. ब्राउनिंगकृत नाट्यात्मक एकभाषितांचा प्रभाव अनेकांवर पडला. ⇨ दिवाकरांनानाट्यछटा लिहिण्याची प्रेरणा ब्राउनिंगच्या एकभाषितांमुळेच मिळाली. ब्राउनिंगची अत्यंत लोकप्रिय काव्यकृती द रिंग अँड द बुक (४ खंड, १८६८-६९) ही होय. सतराव्या शतकाच्या अखेरीस रोममध्ये झालेल्या एका खूनखटल्यावर ती आधारलेली आहे. तीत अंतर्भूत असलेल्या एकूण बारा नाट्यात्मक एकभाषितांतून ह्या खूनप्रकरणाकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टीकोण ब्राउनिंगने प्रभावीपणे दाखविले आहेत. द रिंग…..च्या प्रकाशानंतर ब्राउनिंगला लंडनच्या सामाजिक जीवनात फार मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली. राजकवी लॉर्ड ॲल्फ्रेड टेनिसन ह्याच्या तोडीचा कवी म्हणून त्याला मान्यता मिळाली.

आपल्या वाङ्मयीन कारकिर्दीच्या अखेरच्या पर्वात ब्राउनिंगने जी काव्यरचना केली तीत किफाइन ॲट द फेअर (१८७२) रेड कॉटन नाइटकॅप कंट्री (१८७३), द इन आल्बम (१८७५) ह्यांसारख्या कथाकाव्यांचा तसेच ड्रॅमॅटिक आयडिल्झ ह्या नावाने त्याने लिहीलेल्या दोन काव्यमालांचा (१८७९ १८८०) समावेश होतो. प्राचीन ग्रीक नाटककार एस्किलस ह्याच्या ॲगमेम्नॉनह्या नाटकाचा त्याने केलेला इंग्रजी अनुवादही ह्याच पर्वातला (१८७७).

बहुश्रुत वाचकांनाच ज्याचे आकलन होईल, असे ब्राउनिंगच्या कवितेतून येणारे विविध प्रकारचे उल्लेख, अनेक ठिकाणी तो करीत असलेली मार्मिक, मितभाषी आणि वाचकाच्या कल्पनाशक्तीला आवाहन करणारी अभिव्यक्तीत्याची सखोल, मनोविश्लेषणात्मक दृष्टी आदी कारणांमुळे सर्वसामान्य वाचकाला ब्राउनिंग दुर्बोध  वाटला, तरी ती दुर्बोधता त्याने जाणीवपूर्वक आणलेली नसून त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण कविप्रकृतीतून ती सहजपणे आलेली आहे. शिवाय ब्राउनिंगची सर्वच कविता दुर्बोध आहे, असे नव्हे. सर्वसामान्यांच्या अंतःकरणास स्पर्श करून त्यांना सहजानंद देऊन जाणारी उत्कट स्थळेही त्याच्या कवितेत आहेतच. अत्यंत साध्या आणि सामान्य वाटणाऱ्या विषयांतूनही वजनदार काव्यकृतीची निर्मिती करून काही चिरंतन सत्यांचा शोध घेणे, हे त्याच्या कवितेचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. त्यामुळे सतराव्या शतकातील जॉन डनसारख्या मीमांसक (मेटॅफिजिकल) इंग्रज कवींच्या कवितेशीही त्याच्या कवितेचे एक निकटचे नाते आहे.

आपल्या तत्त्वचिंतनाचा आविष्कार करण्यासाठी ब्राउनिंगने आपल्या कवितेचे-विशेषतः नाट्यात्मक एकभाषितांचे-माध्यम उपयोगात आणले आणि हे तत्त्वचिंतन फारसे प्रगल्भ वा परिपूर्ण नाही, असाही एक आक्षेप त्याच्या कवितेवर घेतला जातो. तथापि ब्राउनिंग हा चिंतनशील वृत्तीचा कवी असला, तरी कवितेच्या द्वारे एखादे दर्शन मांडण्याचा त्याचा प्रयत्न नव्हता. ब्राउनिंगची नाट्यात्मक एकभाषिते म्हणजे त्याचे आत्मनिवेदन नसून विविध वृत्तिप्रवृत्तींच्या व्यक्तींची मानसचित्रे त्याच्या नाट्यात्मक एकभाषितांतून त्याने उभी केली, हे लक्षात घेतले, तर असे दर्शन त्यांतून शोधणेही अनुचित ठरेल. तथापि कोणत्याही कवीच्या मूलभूत श्रद्धा आणि एकूण जीवनविषयक दृष्टिकोण ह्यांची प्रचीती त्याच्या काव्यकृतींतून येतेच, हे आत्मपरतेपासून अलिप्त राहू पाहणाऱ्या ब्राउनिंगच्या संदर्भातही खरे आहे. त्याच्या आईपासून त्याला मिळालेली धर्मपरायणता त्याच्या कवितेत अनेकदा प्रत्ययास येते. तसेच चित्रसंगीतादी कलांविषयी त्याला वाटणारे प्रेमही. निसर्गाविषयी मात्र त्याला फारशी ओढ नव्हतीत्याला माणसांत अधिक रस होता.  रॉबर्ट फ्रॉस्ट आणि एझरा पाउंड ह्यांसारख्या आधुनिक कवींवर ब्राउनिंगचा काही प्रभाव जाणवतो. व्हेनिस येथे तो निधन पावला.

संदर्भ:1. Cohen, J. M. Robert Browning, London, 1952.

         2. Crowell, N. B. The Triple Soul, Albuquerque, N. Mex., 1963.

         3. De Vane, W. C. A. Browning Handbook, 2nd Ed. New York, 1955.

         4. Duffin, H. C. Amphiblan : A Reconsideration of Browning, London, 1956.

         5. Gfieffin, W. H. The Life of Robert Browning, rev. ed. London, 1938.

         6. Herford, C. H. Robert Browning, London, 1905.

         7. Honan, Park, Browning’s Characlers, New Haven, 1961.

         8. Johnson, E. D. H. The Alien Vision in Victorlan Poetry, Princetion, 1952.

         9. King, R. A. The Bow and the Lyre, London, 1959.

        10. Langbaum, Robert. The Poetry of Experience, New York, 1957.

        11. Raymong, W. O. The ingialte Moment and Other Essays in Robert Browning, Toronto, 1950

        12. Whitla, William, The Central Truth, Toronto, 1964.

  

कुलकर्णी, अ. र.