मॅक्‌फर्सन, जेम्स : (२७ ऑक्टोबर १७३६–१७ फेब्रुवारी १७९६). स्कॉटिश कवी. इन्‌व्हर्नेसशरमधील रूथव्हेन ह्या गावी एका शेतकरी कुटुंबात जन्मला. ॲबर्डीन आणि एडिंबरो विद्यापीठांतून त्याने शिक्षण घेतले. १७६० साली मॅक्‌फर्सनने फ्रॅग्‌मेंट्स ऑफ एन्शंट पोएट्री ह्या नावाने एक काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. ‘अशीन’ किंवा ‘ओसियन’ ह्या आख्यायिकीय गेलिक कविश्रेष्ठाच्या मूळ गेलिक भाषेतील कवितांचा आपण केलेला हा इंग्रजी अनुवाद आहे, असे मॅक्‌फर्सनचे म्हणणे होते. ह्या काव्यसंग्रहाला फार मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर मॅक्‌फर्सनने फिंगल (६ खंड, १७६२) आणि टिमोरा (८ खंड, १७६३) ही दोन महाकाव्येही ‘ओसियन’ च्या मूळ गेलिक महाकाव्यांचा इंग्रजी अनुवाद म्हणून प्रसिद्ध केली. मॅक्‌फर्सनने प्रसिद्ध केलेल्या ह्या काव्यकृतींची थोर जर्मन महाकवी गटे ह्यानेही प्रशंसा केली होती. तथापि डॉ. सॅम्युएल जॉन्सनसारख्या साहित्यश्रेष्ठींचा मॅक्‌फर्सनच्या म्हणण्यावर विश्वास नव्हता. मॅक्‌फर्सनचे म्हणणे जेव्हा वादग्रस्त ठरले, तेव्हा त्याने गेलिक भाषेतील त्या साहित्यकृतींची ‘मूळ हस्तलिखिते’ प्रसिद्ध केली. मॅक्‌फर्सनच्या मृत्यूनंतर ह्या हस्तलिखितांच्या अस्सलपणाची चिकित्सा झाली, तेव्हा मात्र असे आढळून आले, की ह्या सर्व काव्यकृतींत मॅक्‌फर्सनचे स्वतःचेच कवित्व अधिक होते आणि पारंपरिक गेलिक कवितेचा त्याने थोडासा उपयोग करून घेतला होता. असे असले, तरी मॅक्‌फर्सनने ओसियनच्या काव्यांचे अनुवाद म्हणून जे इंग्रजी काव्य रचिले, त्याला यूरोपभर लोकप्रियता मिळाली. स्वच्छंदतावादी प्रवृत्तींचा ठळक प्रत्यय देणाऱ्या त्याच्या काव्यकृतींचे अनुवाद सर्व प्रमुख यूरोपीय भाषांतून झाले. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी इंग्रजी साहित्यात सुरू झालेल्या स्वच्छंदतावादी चळवळीवर मॅक्‌फर्सनच्या कवितेचा लक्षणीय प्रभाव पडला.

मॅक्‌फर्नने इंग्लंडच्या इतिहासावरही लेखन केले आहे. १७८० पासून इंग्लंडच्या ‘हाउश ऑफ कॉमन्स’चा तो सदस्य होता.

इन्‌व्हर्नेसशरमधील बेलव्हिल येथे तो निधन पावला.

देवधर, वा. चिं.