विल्यम ब्लेक

ब्लेक, विल्यम : (२८ नोव्हेंबर १७५७ – १२ ऑगस्ट १८२७). गूढवादी इंग्रज कवी, चित्रकार व उत्कीर्णक (एनग्रेव्हर). लंडनमध्ये जन्मला. औपचारिक शिक्षण त्याला फारसे मिळालेले नव्हते. चित्रकलेकडे असलेला त्याचा ओढा लक्षात घेऊन त्याच्या वडिलांनी, तो दहा वर्षांचा असतानाच त्याला एक उत्कृष्ट चित्रशाळेत घातले होते. तेथे तो चार वर्षे होता. १७७२ मध्ये एका नामवंत उत्कीर्णकाकडे ब्लेक उमेदवारी करू लागला. ह्या काळात वेस्टमिन्स्टर ॲबीमधील, तसेच काही प्राचीन चर्चवास्तूंमधील स्मृतिशिल्पांची चित्रे त्याने काढली. ती काढीत असताना गॉथिक कलेचा प्रभाव त्याच्यावर अपरिहार्यपणे पडला. १७७८ मध्ये त्या उत्कीर्णकाकडील ब्लेकची उमेदवारी संपल्यानंतर काही काळ त्याने लंडनच्या रॉयल अकॅडमी ऑफ आर्टसमध्ये कलाशिक्षण घेतले. चित्रकला व उत्कीर्णन हीच त्याच्या उपजीविकेची साधने होती. ब्लेकला औपचारिक शिक्षण फारसे मिळालेले नसले, तरी त्याने स्वतः स्वतंत्रपणे त्याचा व्यासंग वाढविला होता. बायबल, मिल्टन, एलिझाबेथकालीन कवी आणि गूढवादी स्वीडीश तत्वज्ञ स्वीडनबॉर्ग ह्यांचा अभ्यास त्याने केला होता. ह्या व्यासंगाचा प्रभाव त्याच्या कवितेवर पडलेला आहे. बालपणापासूनच ब्लेक काव्यरचना करू लागला होता. विविध प्रकारचे गूढ साक्षात्कारही त्याला होत असत. कधी एखाद्या झाडाखाली प्रेषित इझीक्येल उभा असलेला दिसे, तर कधी कोण्या वृक्षावर अनेक देवदूत वसलेले त्याला दिसत. अशा साक्षात्कारांचे संस्कारही ब्लेकच्या कवितेवर झाले. ‘पोएटिकल स्केचिस’ हा ब्लेकच्या कवितांचा पहिला संग्रह त्याच्या काही मित्रांनी १७८३ मध्ये प्रकाशित केला. शेक्सपिअर, एडमंड स्पेन्सर, मिल्टन, टॉमस चॅटरटन ह्यांसारख्या कवींच्या काव्यरचनेची दाट छाया ह्या संग्रहातील कवितांवर पडलेली आढळते. ह्या काव्यसंग्रहानंतर देअर इज नो नॅचरल रिलिजन (१७८८), साँग्ज ऑफ इनोसन्स (१७८९), टिरिएल(१७८९),द बुक ऑफ थेल (१७८९),द मॅरिज ऑफ हेवन अँड हेल(१९७३),अमेरिका(१७९३), साँग्ज ऑफ एक्स्पीरिअन्स (१७९४),द बुक ऑफ आहानिया (१७९५), मिल्टन (१८०४ – ०८) आणि जेरूसलेम(१८०४ – २० ?) ह्यांसारख्या काव्यग्रंथांचा समावेश होतो. व्हाला, ए ड्रीम ऑफ नाइन नाइट्स हे दीर्घकाव्य (पुढे द फोर झोज असे त्याचे नामकरण केले गेले) ब्लेक अनेक वर्षे लिहीत, संस्कारित होता. ते अपूर्णच राहिले आहे.

उस्फूर्तपणा आणि साधेपणा ही ब्लेकच्या कवितेची लक्षणीय वैशिष्ट्ये होत. तथापि त्याच्या कवितेचा साधेपणा केवळ वरवरचा आहे. त्याच्या पलीकडे असलेली सूक्ष्म प्रतीकात्मकता आणि निगूढ अर्थवत्ता उलगडून तिच्या तळाशी असलेल्या गहन तत्वज्ञानाचे ओझरते दर्शन घेण्यासाठीही ती पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक वाचावी लागते. कविता आणि द्रष्टेपण हे दोन शब्द समानार्थी आहेत, अशी ब्लेकची भूमिका होती. त्याचे काही काव्यग्रंथ तर ‘द्रष्टे ग्रंथ’ – ‘प्रॉफेटिक्स बुक्स’ म्हणूनच ओळखले जातात. अमेरिका, यूरोप, द फर्स्ट बुक ऑफ यूरिझन, द बुक ऑफ आहानिया, द फोर झोज, जेरूसलेम, मिल्टन ह्यांसारख्या काव्यग्रंथांचा त्यांत समावेश होतो. मानव आणि त्याची नियती ह्यांच्यासंबंधीचा आपला दृष्टिकोण ब्लेकने त्यांत व्यक्त केला आहे. मिथ्यकथा आणि प्रतीके ह्यांचा अत्यंत प्रभावी उपयोग ब्लेकने त्यासाठी करून घेतलेला आहे. असा उपयोग करून घेण्यासाठी आवश्यक असलेली विलक्षण कल्पनाशक्ती ब्लेकच्या ठायी होती. आपल्या मिथ्यकथांचे संकुल विश्व उभारताना ग्रीक, नॉर्स, केल्टिक अशा विविध परंपरांचा आधार त्याने घेतला. विवेकवादाविरुद्धची प्रतिक्रिया म्हणून स्वच्छंदतावादाचा उदय होत असतानाच्या काळात ब्लेकची काव्यनिर्मिती बहरास आली आणि वर्डस्वर्थ कोलरिजसारख्या स्वच्छंदतावाद्यांनाही ती गौरवास्पद वाटली. बुद्धी, कायदा आणि प्रस्थापित धर्म ह्यांच्या शृंखलांतून आत्म्याची शक्ती कशी विमुक्त करता येईल, ह्या विचाराने तो आयुष्यभर झपाटलेला होता. स्वातंत्र्यप्रेमामुळे अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांती ह्यांबद्दल ब्लेकला सहानुभूती होती. फ्रेंच राज्यक्रांतीवर त्याने एक काव्यही लिहिले होते (१७९१). त्याच्या समकालीनांपासून मात्र तो मनाने वेगळाच पडला होता. त्याच्या काळी मान्यता पावलेल्या वैज्ञानिक भौतिकवादाला त्याचा विरोध होता. त्याची धर्मश्रद्धा खोल होती परंतु धर्माच्या सांकेतिक चौकटीत त्याने स्वतःला कधीच बंदिस्त करून घेतले नाही. त्याच्या उत्तरायुष्यात ख्रिस्त आणि कला ह्यांत त्याला सारूप्यच जाणवू लागले होते. ख्रिस्ती धर्मासंबंधीचा त्याचा व्यक्तिगत दृष्टिकोणही अधिक स्पष्टपणे मांडण्याची त्याची इच्छा होती. द एव्हरलास्टिंग गॉस्पेल ही कविता लिहिण्यामागे त्याचा हा एक हेतू होता. तथापि ही कविता त्याच्या हातून पूर्ण होऊ शकली नाही. आजही ती त्रुटित स्वरूपातच उपलब्ध आहे.

ब्लेक हा जसा कवी, तसाच एक चित्रकार आणि उत्कीर्णही होता. आपल्या कवितांना स्वतःच्या चित्रांची, पाणरंगांत सजावट व महिरप करून, तो त्यांच्या प्रती आपल्या मित्रांना विकीत असे. ह्या प्रतींची संख्या साहजिकच मर्यादित असल्यामुळे आज त्यांना वाटेल तेवढे मोल द्यावयास कित्येक रसिक तयार आहेत. टॉमस बट ह्या आपल्या अत्यंत निकटच्या मित्रासाठी त्याने काढलेली खास चित्रेही अशीच बहुमोलाची आहेत. आपल्या कवितांसाठी मुद्राक्षरे (टाइपसेट) तयार न करता, तो आपल्या कविता तांब्याच्या पत्र्यावर विशिष्ट प्रकारे कोरून त्यांचे मुद्रणयोग्य ठसे तयार करीत असे. मिल्टनच्या काही कवितांसाठी त्याने सुंदर चित्रे काढली होती. मिल्टनला तो फार मानीत असे. त्याच्या दृष्टीने मिल्टनचे काव्य म्हणजे स्फूर्तिशक्तीची मूर्तिमंत प्रतिमा होती. बायबलच्या जुन्या आणि नव्या करारांतील विषय घेऊनही त्याने काही चित्रे काढली होती. द बुक ऑफ जॉबआणि इटालियन महाकवी दान्ते ह्याची डिजाइन कॉमेडी ह्या ग्रंथांसाठी त्याने काढलेली चित्रे व उत्कीर्णनेही प्रसिद्ध आहेत. १८०९ मध्ये त्याने आपल्या चित्रांचे एकुलते एक प्रदर्शन भरविले. त्याला प्रतिसाद मात्र फारसा मिळाला नाही. ब्लेकच्या उत्कीर्णन व चित्रव्यवसायांत त्याला त्याच्या पत्नीचे मोलाचे साहाय्य झाले. त्या अशिक्षित स्त्रीस त्याने साक्षर केले होते. ब्लेकला आपल्या ह्या व्यवसायात कधीच फारसे पैसे मिळाले नाहीत. त्याचे मित्र आणि शिष्य त्याला अनेकदा आर्थिक मदत करीत असत.

कवी म्हणूनही त्याच्या हयातीत त्याला फारशी कीर्ती मिळाली नाही. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीअखेरीस मात्र त्याच्या प्रतिमेची मौलिकता आणि सामर्थ्य ओळखले गेले. लंडनमध्ये तो निधन पावला. १९५७ मध्ये त्याच्या मृत्यूच्या द्वितीय शताब्दीच्या निमित्ताने ‘पोएट्स कॉर्नर’ मध्ये त्याचा ब्राँझचा अर्धपुतळा बसवण्यात आला. जागतिक कीर्तीचा शिल्पकार जेकब एप्स्टाइन ह्याने तो बनविलेला आहे.

संदर्भ : 1. Bentley, G. E. Jr. Nurmi, M. K. Blake Bibliography, Minneapolis, 1964.

           2. Berger, P. Trans. Conner, D. H. William Blake: Poet and Mystic, London, 1914.

           3. Binyon L. The Engraved Designs of William Blake, Cambridge, 1949.

           4. Bronowski, J. A Man Without a Mask, London, 1943 Rev. Ed., 1954.

           5. Damon, S. F. William Blake, His Philosophy and Symbols, Boston, 1924.

           6. Erdman, D. V. Blake : Prophet Against Empire, Prineeton, 1954.

           7. Fyre, N. Fearful Symmetry A Study of William Blake, London, 1925.

           8. Gardner, S. Infinity on the Anvil : A Critical Study of Blake’s Poetry, Oxford, 1954.

           9. Gilchrist, Alexander, Life of William Blake, New York, 1945, First Published 1863.

         10. Keynes, Sir G. Blake Studies, London, 1949.

         11. Margoliouth, H. M. William Blake, Oxford, 1951.

         12. Saurat, D. Blake and Modern Thought, London, 1929.

         13. Swinburne, A. C. William Blake, London, 1968.

         14. Witcutt, W. P. Blake, A Psychological study, London, 1946.

रेगे, सदानंद