गिल्बर्ट, विल्यम श्वेंक : (१८ नोव्हेंबर १८३६—२९ मे १९११). इंग्रज नाटककार. जन्म आणि शिक्षण लंडन येथे. १८६३ मध्ये वकील झाला. तत्पूर्वी काही काळ लष्करातील अधिकारी तसेच ‘प्रिव्ही कौन्सिल’च्या शिक्षण खात्यात नोकरी. १८९९ मध्ये मिडलसेक्स परगण्याचा न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. १८६१ पासून फन  या नियतकालिकातून विनोदी कविता लिहावयास प्रारंभ. त्या अत्यंत लोकप्रिय झाल्या आणि बॅब बॅलड्‌स (१८६९) आणि मोअर बॅब बॅलड्स (१८७३) ह्या नावांनी संगृहीत करण्यात आल्या. डलकॅमॅरा ऑर लिट्ल डक् अँड द ग्रेट कॉक (१८६६) हा बर्लेस्क लिहून त्याने नाट्यलेखनास आरंभ केला. त्यानंतर त्याने आणखी काही नाटके लिहिली. तथापि त्याची कीर्ती मुख्यतः आर्थर सलायव्हन (१८४२—१९००) ह्या संगीतकाराच्या सहकार्याने लिहिलेल्या विनोदी संगीतिकांवर अधिष्ठित आहे. विविध सामाजिक विषयांवरील मार्मिक आणि चुरचुरीत टीका त्यांत असे. ह्या संगीतिकांपैकी काही अशा : ट्रायल बाय ज्यूरी  (१८७५), द सॉर्सरर (१८७७), एच्.एम्.एस्.पिनॅफोर (१८७८), द पायरेट्स ऑफ पेंझान्स (१८७९,न्यूयॉर्क, १८८०, लंडन), पेशन्स (१८८१), प्रिन्सेस इडा (१८८४), यूटोपिआ लिमिटेड (१८९३) आणि द ग्रँड ड्यूक (१८९६). त्याच्या विनोदी संगीतिकांपैकी बऱ्याचशा ‘सॅव्हॉय थिएटर’ मध्ये सादर केल्या गेल्यामुळे त्यांना ‘सॅव्हॉय ऑपेराज’ असेही म्हणण्यात येते.                                                                  १९०७ मध्ये त्यास नाइट करण्यात आले. मिडलसेक्स परगण्यातील हॅरोवील्ड येथे तो निधन पावला.                                                                                    देशपांडे, मु. गो.