टॉमस हार्डी

हार्डी, टॉमस : (२ जून १८४०–११ जानेवारी १९२८). विख्यात इंग्रजी कादंबरीकार आणि कवी. त्याचा जन्म बॉकहॅम्पटन ( डॉर्सेट) येथे टॉमस हार्डी व जेमिमा या दांपत्यापोटी झाला. त्याचे वडील बांधकाम व्यावसायिक होते. टॉमसचे शिक्षण स्थानिक विद्यालयात झाले. त्याला पुढे महाविद्यालयीन शिक्षण घ्यावयाचे होते. दरम्यान वडिलांनी त्याला डॉर्चेस्टर येथील जॉन हिक्स या स्थापत्यविशारदाकडे शिकाऊ उमेदवार म्हणून पाठविले (१८५६). तेथून तो लंडनमध्ये आला (१८६२) व कविता करू लागला.

लहानपणापासून हार्डीला वाचनाची आवड होती. त्याने तरुणपणीच बायबल, ग्रीक व रोमन अभिजात वाङ्मय, शेक्सपिअरच्या शोकांतिका, वॉल्टर स्कॉट व आलेक्सांद्र द्यूमा यांच्या कादंबऱ्या यांचे वाचन केले होते. लंडनमधील समृद्ध वैज्ञानिक व सांस्कृतिक जीवनाशी त्याचा परिचय झाला होता. शेक्सपिअरच्या नाटकांचा त्याच्यावर खोल परिणाम झाला, त्यामुळे आपल्या पारंपरिक ख्रिस्ती संस्कारांचा त्याने त्याग केला. चार्ल्स डार्विन याच्या उत्क्रांती सिद्धांताचा त्याने स्वीकार केला. जर्मन तत्त्ववेत्ता आर्थर शोपेन हौअर याच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्याच्यावर होता. हार्डीने जी काव्य व कादंबरी वाङ्मयाची निर्मिती केली, त्यामध्ये त्याने मानवी दुःख, क्रूर नियती, मानवी एकाकीपण आणि योगायोग या आशयसूत्रांची पेरणी केल्याचे दिसून येते.

हार्डीने जुलै १८६७ मध्ये आपल्या कवितांना कोणी प्रकाशक मिळत नाही, हे पाहून लंडन सोडले व तो आपल्या गावी परत आला. तेथे तो ट्रायफिना स्पार्क्स या १६ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडला. त्याच्या कितीतरी कादंबऱ्या व कवितांमध्ये ही मुलगी वेगवेगळ्या स्वरूपांत प्रकट झालेली दिसते. तिच्या मृत्यूनंतर ‘हार्डीने थॉट्स ऑफ फिना’ नावाची एक स्वतंत्र कविता त्यांच्या प्रेमसंबंधावर लिहिली.

हार्डीच्या डेस्परेट् रेमिडिज् (१८७१), अंडर द ग्रीनवुड ट्री (१८७२) इ. कादंबऱ्यांना फारशी प्रसिद्धी लाभली नाही परंतु फार फ्रॉम द मॅडिंग क्राउड (१८७४) व द रिटर्न ऑफ द नेटिव्ह (१८७८) या त्याच्या दोन कादंबऱ्यांना विशेष लोकप्रियता लाभली. शिवाय त्याला चांगली आर्थिक प्राप्तीही झाली.

हार्डीने जरी काव्यलेखन केले असले, तरी त्याची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्याच्या कादंबरीलेखनावर. त्याच्या उल्लेखनीय कादंबऱ्यांमध्ये द मेअर ऑफ कास्टर ब्रिज (१८८६), टेस ऑफ द डर्बरविलिस (१८९१) आणि ज्यूड द ऑबस्क्यूअर (१८९५) ह्यांचा समावेश होतो.

हार्डीच्या कादंबऱ्या प्रथम नियतकालिकांतील मालिकांच्या स्वरूपात प्रसिद्ध होत. त्याच्या सर्व कादंबऱ्यांमधून ‘वेसेक्स’ या इंग्लंडमधील प्रदेशातील लोकजीवन चित्रित झाले आहे. गंभीर लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या हार्डीने आपल्या कादंबऱ्यांमधून एकीकडे स्वतःच्या तीव्र भावना आणि दुसरीकडे विपरीत सामाजिक परिस्थिती यांच्याशी संघर्ष करणारी व्यक्तिचित्रे रंगविली आहेत. तसेच औद्योगिकीकरण व शहरीकरण यांमुळे ख्रिस्ती समाजजीवन तसेच लोकपरंपरा यांच्या पडझडीचा शोधही त्याने घेतला आहे.

हार्डीने १८७४ मध्ये एमा लॅव्हिनीया गिफर्ड या मुलीशी विवाह केला. पुढे तिच्यासह हार्डीने अनेक देशांना व शहरांना भेटी दिल्या. त्यांमध्ये पहिल्या नेपोलियनचा पराभव झालेल्या वॉटर्लू रणभूमीचाही समावेश होता. त्यावेळी नेपोलियनच्या युद्धांवर आधारित द डिनस्टस् हे महाकाव्य लिहिण्याचा त्याने संकल्प केला व त्यानुसार द डिनस्टस् ही दीर्घ कविता त्याने निर्यमक छंदात पूर्ण केली (३ भाग, १९१०).

हार्डीच्या टेस … आणि ज्यूड … या कादंबऱ्या वादग्रस्त ठरल्यानंतर त्याने कादंबरीलेखन बंद केले आणि तो काव्यलेखनाकडे वळला. त्याने आपल्या कविता एकत्रित करून वेसेक्स पोएम्स अँड अदरव्हर्सेस हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध केला (१८९८). विसाव्या शतकात फिलीप लारकीनसारख्या ‘मूव्हमेंट’ कवींवर त्याच्या काव्याचा विशेष प्रभाव जाणवतो.

हार्डीची पत्नी एमा हिचे अचानक निधन झाल्यानंतर (१९१२) तिच्यासोबत व्यतीत केलेल्या अनुभवांवर आधारित पुष्कळ कविता त्याने लिहिल्या. १९१४ मध्ये त्याच्यापेक्षा चाळीस वर्षांनी लहान असलेली त्याची सचिव फ्लॉरेन्स एमिली डूग्डेल हिच्याशी त्याने विवाह केला. तिने पुढे त्याचे चरित्र लिहिले.

हार्डीने उर्वरित आयुष्य मॅक्स गेट (डॉर्सेट) येथे व्यतीत केले. तेथे तत्कालीन मान्यवर लेखक, कलावंत व राजकारण्यांनी भेटी दिल्या. त्याने गुप्तपणे आपले आत्मचरित्र लिहिले (१९२०–२७). गंभीर आजारामुळे डॉर्चेस्टर (डॉर्सेट) येथे त्याचे निधन झाले.

हार्डीने १४ कादंबऱ्या, ४० लघुकथा, ९०० कविता आणि दोन नाटके लिहिली. ॲबर्डिन विद्यापीठाची सन्माननीय पदवी (१९०५), इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज यांच्याकडून ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ (१९१०), ‘द रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर’तर्फे सुवर्णपदक (१९१२) व केंब्रिज विद्यापीठाची सन्माननीय डी. लिट्. (१९१३) इत्यादी मानसन्मान त्याला लाभले.

संदर्भ : 1. Gittings, Robert, Thomas Hardy, 2001.

           2. Halliday, F.E. Thomas Hardy: His Life and Work, 2001.

          3. Thomalin, Claire, Thomas Hardy: The Time-Torn Man, 2007.

  सावंत, सुनील