नोआ वेब्स्टरवेब्स्टर, नोआ : (१६ ऑक्टोबर १७५८–२८ मे १८४३). अमेरिकन कोशकार. जन्म वेस्ट हार्टफर्ड (कनेक्टिकट) येथे. येल कॉलेजातून बी.ए. ची पदवी घेतल्यानंतर (१७७८) कायद्याचा अभ्यास करून तो बॅरिस्टर झाला तथापि अमेरिकन क्रांतीच्या त्या प्रक्षुब्ध कालखंडात वकिलीवर जगणे अवघड झाल्यामुळे त्याने शिक्षकाचा व्यवसाय पत्करला. त्याने काही पाठ्यपुस्तकेही लिहिली. ग्रॅमॅटिकल इन्स्टिट्यूट ऑफ द इंग्लिश लॅंग्वेज ह्या त्याच्या ग्रंथाचा पहिला भाग १७८३ मध्ये प्रसिद्ध झाला. द अमेरिकन स्पेलिंग बुक (१७८७) व द एलिमेंटरी स्पेलिंग बुक (१८२९) अशी त्याची नंतरची नामांतरे. ह्या पुस्तकाच्या लाखो प्रती खपल्या. अमेरिकन इंग्रजीतील स्पेलिंगे निश्चित करून त्यांना प्रमाणित स्वरूप देण्यात ह्या पुस्तकाने बजावलेली कामगिरी मोठी आहे.

वरील पुस्तकाचा दुसरा भाग व्याकरणाचा होता (१७८४, सुधारित आवृ. १८०७, १८३१) आणि तिसरा भाग ॲन अमेरिकन सिलेक्शन ऑफ लेसन्स (१७८५, सुधारित आवृ. १७८७) हा भाषाभ्यासाच्या दृष्टीने तयार केलेल्या पाठांचा (रीडर) होता. अमेरिकेत संकलित करण्यात आलेले हे पहिले `रीडर’ होय. एलिमेंट्‌स ऑफ यूजफुल नॉलेज (४ खंड, १८०२–१२), हिस्टरी ऑफ द युनायटेड स्टेट्‌स (१८३२) आणि ए मॅन्युअल ऑफ यूजफुल स्टडीज (१८३९) हे त्याचे शिक्षणविषयक अन्य काही ग्रंथ होत.

वेब्स्टरची कीर्ती आज मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्याने तयार केलेल्या इंग्रजीच्या शब्दकोशांवर. ए कॉंपेंडिअस डिक्शनरी ऑफ द इंग्लिश लॅंग्वेज हा जॉन एंटिक ह्याच्या शब्ददोशाच्या आधारे तयार केलेला त्याचा शब्दकोश १८०६ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर ॲन अमेरिकन डिक्शनरी ऑफ द इंग्लिश लॅंग्वेज (२ खंड, १८२८) हा ७०,००० शब्दांचा शब्दकोश त्याने तयार केला. इंग्रजी भाषेच्या शब्दकोशांतून पूर्वी अंतर्भूत न केलेले सु. ५,००० शब्द त्यात होते. त्याची सुधारित आवृत्ती १८४१ मध्ये प्रसिद्ध झाली. शब्दांच्या नेमक्या व्याख्या, त्यासाठी अमेरिकन आणि इंग्रज साहित्यिकांच्या साहित्याचा घेतलेला उचित आधार, अर्थांचे उत्तम विश्लेषण ह्या गुणांमुळे ह्या शब्दकोशाला फार मोठी मान्यता मिळाली.

`अमेरिकन कृतिस्वाम्याचा (कॉपीराइट) जनक’ म्हणूनही नोओ वेब्स्टर ओलखला जातो. त्याच्या विविध ग्रंथांच्या कृतिस्वाम्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने त्याने कृतिस्वाम्यविषयक कायदे मंजूर करून घेण्याच्या दृष्टीने धडपड केली आणि त्यात त्याला यशही आले.

त्याने स्केचिस ऑफ अमेरिकन पॉलिसी (१७८५) असे एक पुस्तपत्र लिहून जे विचार व्यक्त केले, ते अमेरिकन संविधानाला आकार देताना प्रभावी ठरले, असे म्हटले जाते. डिझर्टेशन्स ऑन द इंग्लिश लॅंग्वेज (१७८९) ह्या ग्रंथात त्याने स्पेलिंग–सुधारणेविषयी महत्त्वपूर्ण विचार मांडले. त्याने लिहिलेल्या अन्य काही ग्रंथांत मात्र शुद्धलेखनविषयी पारंपरिक दृष्टी बाळगल्याचे दिसते. अमेरिकन मिनर्व्हा आणि हेरल्ड ह्या फेडरॅलिस्ट नियतकालिकांचा संपादक म्हणूनही त्याने काही काळ काम केले. विज्ञान, वैद्यक, अर्थशास्त्र अशा विषयांवरही त्याने लेखन केले आहे.

येल विद्यापीठाने सन्माननीय डॉक्टरेट देऊन त्याचा सन्मान केला (१८२३).

न्यू हेवन येथे त्याचे निधन झाले.                  

कुलकर्णी, अ. र.