पेपिस, सॅम्युएल : (२३  फेब्रुवारी  १६३३ २६ मे  १७०३). विख्यात  इंग्रज  रोजनिशीकार.  लंडनमध्ये  जन्मला.  शिक्षण लंडन आणि केंब्रिज येथे एम्. ए. पर्यंत. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत, महत्त्वाकांक्षा व जिद्द धरून पेपिस हा राजसेवेत सेक्रेटरी टू द अँडमिरल्टी (नौसेना खात्याचा सचिव) ह्या हुद्यापर्यंत चढला. ह्या धडपडीत काळात पेपिसला सर एडवर्ड माँटग्यू (पुढे अर्ल ऑफ सँडविच) ह्या आप्ताची बरीच मदत झाली. अत्यंत कार्यक्षम प्रशासक म्हणून नोकरीत पेपिसने लौकिक मिळविला होता. दुसरा चार्ल्स आणि दुसरा जेम्स ह्या इंग्लंडच्या दोन्ही राजांचा विश्वास त्याने संपादिला होता. काही काळ तो पार्लमेंटचा सदस्य होता रॉयल सोसायटीचे अध्यक्षपदही त्याने भूषविले. पेपिसच्या हितशत्रूंनी त्याच्याविरुद्ध कारस्थाने केली खून, फितुरी अशा आरोपांत त्याला गुंतविण्याचे प्रयत्न झाले. पेपसिने ते यशस्वी होऊ दिले नाहीत तथापि त्यांची झळ त्याला पोहोचलीच. १६७९ मध्ये नौसेना खात्याच्या सचिवपदावरून त्याला दूर करण्यात आले काही काळ बंदिवासही भोगावा लागला. १६८४ मध्ये नौसेना खात्याचे सचिवपद त्याला पुन्हा देण्यात आले. १६८८ मध्ये दुसरा जेम्स इंग्लंडमधून पळून गेल्यानंतर पेपिसला हे सचिवपद पुन्हा सोडावे लागले. त्यानंतरचे त्याचे सेवानिवृत्त आयुष्य त्याने मुख्यत: क्लॅपम येथे घालविले. तेथेच तो निधन पावला. 

पेपिस आज ओळखला जातो तो मु्ख्यत: त्याच्या रोजनिशीमुळे १ जानेवारी १६६० पासून पेपिसने ही रोजनिशी एका विशिष्ट प्रकारच्या लघुलिपीत लिहावयास सुरुवात केली होती. ३१ मे १६६९ रोजी त्याने हे रोजनिशीलेखन थांबविले (पुढे १६८३ मध्ये तँजिअर येथे असताना त्याने रोजनिशी लिहिली). १८२२ मध्ये पेपिसने वापरलेली लघुलिपी उलगडली गेली आणि तिचा आशय ग्रंथरूपाने ज्ञात झाला (१८२५). ह्या रोजनिशीतून प्रत्ययास येणारा निखळ प्रामाणिकपणा पेपिसच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकतो. स्वत:चे दोष त्याने कोठेही लपविलेले नाहीत. तथापि ते पाहत असताना एकूण मानवजातीच्याच स्वाभाविक दोषांचे दर्शन आपण घेत आहोत, असेच वाटत राहते. घडलेल्या घटनांची नोंद घेताना स्त्री, संगीत, नाटक, ग्रंथ, वास्तुशिल्प, लोभस गृहजीवन आदींबद्दलची उत्कट आवड व्यक्त करणाऱ्या पेपिसने जीवनाविषयीची एक वैशिष्ट्यपूर्ण जाणीव जोपासलेली आहे. जीवनातील निरनिराळ्या आनंदांना आणि मोहांना सरळ सामोरा जाणारा हा माणूस प्रशासकीय संदर्भात अत्यंत दक्ष, शिस्तप्रिय आणि पूर्णत्वाकांक्षी होता, हा ह्याच जाणिवेचा परिपाक होय. आजूबाजूचे जग, तेथे घडणाऱ्या घटना, तेथील माणसे ह्यांबद्दलचे एक निरागस कुतूहल व स्वारस्य पेपिसला होते आणि त्याच्या रोजनिशीतून ते अनेकदा व्यक्त झालेले आहे. सुंदर स्त्रियांचा मोह त्याला कधीच आवरता आला नाही पंरतु आपल्या पत्नीवरचे त्याचे प्रगाढ प्रेमही त्याच्या रोजनिशीत बोलके झालेले आहे. आपली ही रोजनिशी कुणी वाचावी, अशी त्याची अपेक्षा नव्हती त्यामुळे स्वत:ची काही पूर्वकल्पित प्रतिमा तीतून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्याने केला नाही. एका माणसाने स्वत:शी मुक्तपणे केलेला संवाद, असे ह्या रोजनिशीचे स्वरूप झाले आहे. पेपिसची शैली जिवंत, चित्रमय आणि सहजसुंदर आहे. समकालीन घटनांची अत्यंत वेधक वर्णने त्याने केलेली आहेत. लंडनचा प्लेग, लंडनला लागलेली भीषण आग अशा घटनांची विश्वसनीय माहिती ह्या दैनंदिनीतून मिळते. तसेच त्या वेळच्या पोशाखाच्या तर्‍हा, खाद्यपदार्थ, वाद्ये, नाट्यगृहे, फर्निचर, रस्ते इत्यादींबाबतचे महत्त्वाचे तपशीलही तीत मिळतात. त्याच्या काळची पुस्तके, ग्रंथविक्रेते नाट्यनिर्मिती ह्यांसंबंधीची अन्य ग्रंथांत न सापडणारी माहितीही ह्या दैनंदिनीत आढळते. त्या दृष्टीने, एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणूनही ह्या रोजनिशीचे महत्त्व आहे. तथापि ह्या रोजनिशीचे लेखन अस्ताव्यस्त स्वरूपाचे असल्यामुळे तिला कलाकृतीचे स्वरूप येत नाही, अशी टीका ह्या रोजनिशीवर केली जाते. 

संदर्भ : 1. Bryant, A Samuel Pepys, 3 Vols., Cambridge, 1933-38. 2. Ponsonby, A, Samuel Pepys, London, 1928. 3. Tanner, J. R. Mr. Pepys : An Introduction to the Diary, London, 1925. 4. Wheathy H. B. Ed. The Diary of Samuel Pepys, 10 Vols., London, 1983-99.

 

कुलकर्णी, अ. र.