बोएन, एलिझाबेथ : (७ जून १८९९-२२ फेब्रुवारी १९७३). इंग्रजी कथालेखिका व कादंबरीकार. डब्लिन येथे जन्म. केंट येथे शिक्षण. १९२३ मध्ये तिचा एनकाउंटर्स हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. द होटेल (१९२७) ही तिची पहिली कादंबरी. द लास्ट सप्टेंबर (१९२९), फ्रेंड्‌स अँड रिलेशन्स (१९३१), द हाउस इन पॅरिस (१९३६), द डेथ ऑफ द हार्ट (१९३८), द हीट ऑफ द डे (१९४९) आणि द वर्ल्ड ऑफ लव्ह (१९५५) ह्या तिच्या उत्कृष्ट कादंबऱ्या. द डेथ ऑफ द हार्ट ही तिची सर्वोत्कृष्ट कादंबरी. या कादंबरीत सरळ मनाच्या व निष्पाप अशा व्यक्तींची भावनाशून्य, राक्षसी जगात कशी ससेहोलपट होते, ह्याचे चित्रण केलेले आहे. द हीट ऑफ द डे ही समक्षकांनी गौरवलेली कादंबरी. ह्या कादंबऱ्यांतून बोएनच्या काव्यात्मक शैलीचा आणि सुजाण कलात्मकतेचा प्रत्यय येतो. ह्या बाबतींत ती जेम्स जॉइसची परंपरा पुढे चालविते. बोएन्स कोर्ट (१९४१), सेव्हन रायटर्स (१९४२), द इंग्लिश नॉव्हलिस्ट (१९४२), अंटोनी ट्रॉलप (१९४६), द शेलबोर्न हॉटेल (१९५१), इ. ग्रंथांतून तिचे समीक्षापर व ललित स्वरुपाचे लेखन प्रसिद्ध झाले. तिने ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनसाठी कथात्मक स्वरुपाचे लेखनही केले. लंडन येथे तिचे निधन झाले.

वानखडे, म. ना.