जेरार्ड मॅन्‌ली हॉपकिन्झहॉपकिन्झ, जेरार्ड मॅन्‌ली : (२८ जुलै १८४४–८ जून १८८९). इंग्रज कवी आणि जेझुइट धर्मोपदेशक. स्ट्रॅटफर्ड, एसेक्स येथे जन्मला. त्याचे वडील मॅन्ली हॉपकिन्झ हे अँग्लिकन होते. ते हवाई येथे ब्रिटिश कॉन्सल जनरल होते. ते स्वतःही कवी होते. हॉपकिन्झनेहायगेट स्कूलमध्ये प्रवेश घेतला (१८५४). तेथे एक हुशार विद्यार्थी म्हणून त्याची दखल घेतली गेली. तेथे त्याला काव्यलेखनाचे पारि-तोषिकही दिले गेले. ऑक्सफर्डच्या ‘बॅलिअल कॉलेज ङ्खमध्ये त्याने प्रवेश घेतला (१८६४). तेथे काव्य-लेखनाबरोबरच त्याने अ भि जा तसा हि त्या चा ही अभ्यास केला. विद्यार्थिदशेतील त्याच्या टिपणवह्या, पत्रे उपलब्ध आहेत आणि त्यांतूनही त्याच्या बुद्धिमत्तेची चुणूक दिसते.

 

१८६४ मध्येच जॉन हेन्री न्यूमन तथा कार्डिनल न्यूमन ह्याच्या अपोलोजिया प्रो व्हिटा सुआ ह्या विख्यात कैफियतीचा खोल परिणाम हॉपकिन्झवर झाला. ही कैफियत म्हणजे न्यूमनच्या धार्मिक परिवर्तनाचा आणि आध्यात्मिक विकासाचा प्रांजल आलेख होय. न्यूमनने रोमन कॅथलिक पंथाचा स्वीकार केला होता. हॉपकिन्झलाही त्यानेच २१ऑक्टोबर १८६६ रोजी ह्या पंथात प्रवेश दिला. कॅथलिक झाल्यानंतर त्याच्या मूळच्या विरक्त वृत्तीला विशेष वाव मिळाला. ती एक प्रकारेत्याची गरजच होती. त्याने धर्मोपदेशक होण्याचे ठरविले. सुरुवातीच्या कविता त्याने जाळून टाकल्या. लेखनाचा आपल्या व्यवसायाशी संबंध नाही, अशी त्याची धारणा झाली होती तथापि १८७५ पर्यंत तो एक नियतकालिक चालवीत असे. त्यात निसर्गानुभवाला त्याच्याकडून मिळणारे प्रतिसाद, तसेच त्याचे तात्त्विक विचार त्याने सुस्पष्ट स्वरूपात नोंदविलेले आहेत. कोणत्याही निसर्गवस्तूला तिचे असे एक व्यक्तिमत्त्व असते, ह्या विचारावर त्याच्या तत्त्वज्ञानाचा भर होता.

 

१८७४ मध्ये हॉपकिन्झ उत्तर वेल्समधील सेंट ब्यूनोज कॉलेज-मध्ये ईश्वरशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी गेला. तेथे तो वेल्श भाषाशिकला आणि तिच्यातील कवितेने तो प्रभावित झाला. त्याने पुन्हा काव्य- लेखन सुरू केले आणि ‘रेक ऑफ द डॉइशलँड’ ही दीर्घ कविता लिहिली. डॉइशलँड नावाचे एक जर्मन गलबत टेम्स नदीत वादळाने बुडाले होते.त्यात पाच फ्रान्सिस्कन जोगिणी होत्या. हे त्यांचे हौतात्म्य आहे, असे हॉपकिन्झला वाटत होते. ही कविता ह्या दुःखद घटनेबद्दलची आहे. त्यानंतर त्याने काही सुनीतेही लिहिली. काव्यभाषेची समृद्धी, लयताल ह्या दृष्टींनीह्या सुनीतांची मौलिकता लक्षणीय होती. त्याच्या ‘विंडहॉव्हरङ्ख ह्या कवितेचे विश्लेषण समीक्षकांकडून अनेकदा केले गेले आहे.

 

हॉपकिन्झचा धर्मगुरू होण्याचा दीक्षाविधी झाला (१८७७). त्यानंतर लंडन, ऑक्सफर्ड, लिव्हरपूल, ग्लासगो ह्यांसारख्या अनेक ठिकाणी असलेली जेझुइट चर्चेस आणि संस्था ह्यांमध्ये त्याने धर्मकार्य केले. लँकाशरमधील ‘स्टोनीहर्स्ट कॉलेजा ङ्खत त्याने ग्रीक व लॅटिन भाषांतील अभिजात साहित्याचे अध्यापन केले. तसेच डब्लिनच्या ‘युनिव्हर्सिटी कॉलेजा ङ्खत ग्रीक साहित्य शिकविले. त्याने सुनीतांच्या आणखी एका मालेची रचना सुरू केली (१८८५). एकाकीपणाची वेदना ह्या सुनीतमालेतून दिसते. आध्यात्मिक जगातील रखरखीतपणा आणि कलात्मकतेच्या संदर्भातील वैफल्य, ही ह्या वेदनेची दोन कारणे होती. ‘भयावह सुनीतेङ्ख म्हणून ही सुनीते प्रसिद्ध आहेत.

 

डब्लिनमध्ये असताना हॉपकिन्झने संगीतरचना केल्या. त्याच्या रचना फार नाहीत पण मौलिकता हे त्याच्या कवितांचे वैशिष्ट्य ह्या रचनांमधूनही प्रत्ययास येते.

 

हॉपकिन्झ याच्या कवितांचा पहिला संग्रह मरणोत्तर निघाला (१९१८). त्यात काही कवितांची भर घालून १९३० मध्ये तो पुन्हा प्रकाशित झाला.

 

टी. एस्. एलियट, डिलन टॉमस, डब्ल्यू. एच्. ऑडन, स्टीव्हन स्पेंडर इ. विसाव्या शतकातील मोठे कवीही हॉपकिन्झच्या काव्यप्रतिभेनेप्रभावित झाले होते.

 

डब्लिनमध्ये तो निधन पावला.

 

संदर्भ : 1. Boyle, R. R. Metaphor in Hopkins, 1961.

           2. Dunne, Tom, Gerard Manley Hopkins: A Comprehensive Bibliography, 1976.

           3. Heuser, Alan, The Shaping Vision of Gerard Manley Hopkins, 1958.

 

कुलकर्णी, अ. र.