ब्राउन टॉमस : (१९ ऑक्टोबर १६०५-१९ ऑक्टोबर १६८२). इंग्रज साहित्यिक. व्यवसायाने डॉक्टर. जन्म लंडन शहरी. १६२९ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाची एम्. ए. ची पदवी मिळविल्यानंतर माँटपील्यर, पॅड्युआ आणि लायडन ह्या विद्यापीठांतून त्याने वैद्यकाचा अभ्यास केला आणि लायडन विद्यापीठाची एम्. डी. ही पदवी मिळविली. (२१ डिसेंबर १६३३). त्यानंतर इंग्लंडमधील नॉरिच येथे स्थायिक होऊन तेथे तो वैद्यकीय व्यवसाय सुरू लागला. इंग्लंडमध्ये झालेल्या प्यूरिटन क्रांतीच्या वेळी ब्राउन हा राजनिष्ठ राहिला. १६७१ मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स हा नॉरिच येथे आला असता, त्याने ब्राउनला ‘सर’ हा किताब बहाल केला.

ब्राउनची कीर्ती आज मुख्यतः रिलिजिओ मेडिसी (इं. शी. ए डॉक्टर्स रिलिजन), हा त्याच्या ग्रंथावर अधिष्ठित आहे. ह्या ग्रंथाचे शीर्षक लॅटिन असले, तरी तो इंग्रजीत लिहिलेला आहे. हा ग्रंथ ब्राउनने केवळ स्वतःच्या समाधानासाठी लिहिलेला होत एखाद्या खाजगी जर्नलसारखे त्याचे स्वरूप होते तो प्रसिद्ध करण्याची त्याची इच्छा नव्हती. तथापि त्याच्या अनुज्ञेवाचून, १६४२ मध्ये तो प्रसिद्ध करण्यात आला त्यावर एक भाष्यही लिहिले गेले. त्यामुळे त्याची परिपूर्ण, अधिकृत प्रत तयार करून ती प्रसिद्ध करण्याची आवश्यकता त्याला जाणवली आणि रिलिजिओ मेडिसीची ब्राउनच्या व्यक्तिगत धर्मचिंतनाची ही नवी आवृत्ती १६४३ मध्ये प्रसिद्ध झाली. मानवी कर्तव्ये पार पाडण्याच्या दृष्टीने विज्ञान आणि धर्म ह्यांत काही विरोध आहे असे ब्राउनला वाटत नव्हते. आपण डॉक्टर असलो, तरी ख्रिस्ती आहोत, ‘चर्च ऑफ इंग्लंड’चे अनुयायी आहोत आणि आपली प्रकृती श्रद्धानुकूल आहे, असे ब्राउनने ह्या ग्रंथाच्या आरंभीच म्हटले आहे. ख्रिस्ती धर्माला अभिप्रेत असलेल्या सद्गुणांच्या विवेचनाबरोबरच धर्माशी संबद्ध अशा अनेक विषयांचा ब्राउनने ह्या ग्रंथात परामर्श घेतला आहे. त्यातून त्याचा बहुश्रुतपणा आणि व्यापक, समावेशक अभिरुची ह्यांचा प्रत्यय येतो. विशेष म्हणजे धार्मिक वादविवादांनी आणि संघर्षांनी कडवट झालेल्या तत्कालीन वातावरणात धार्मिक सहिष्णुतेचा पुरस्कार ब्राउनने ह्या ग्रंथातून केला. त्याची श्रद्धानुकूलता गूढाबद्दल आणि अद्भुताबद्दल त्याला वाटणाऱ्या आकर्षणातून व्यक्त झालेली आहे. ब्राउनची लेखनशैली आलंकारिक असूनही तिच्यात एक प्रकारचा अकृत्रिमपणा आणि ताजेपणा आहे. वक्तृत्वपूर्ण अशा प्रबोधनकालीन साहित्यशैलीच्या विरुद्ध, सतराव्या शतकात, बरोक शैलीच्या रूपाने जी प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली होती, तिचा ब्राउन हा एक महत्त्वाचा प्रतिनिधी होय. सतराव्या शतकातील श्रेष्ठ गद्यलेखकांत त्याचे स्थान ह्या ग्रंथामुळे निश्चित झाले. १६४४ मध्ये ह्या ग्रंथाचे लॅटिन भाषांतर झाले आणि ब्राउनला यूरोपीय कीर्ती प्राप्त झाली. डच, जर्मन आणि फ्रेंच ह्या भाषांतही ह्या ग्रंथाचे अनुवाद झालेले आहेत.

ब्राउनच्या अन्य उल्लेखनीय ग्रंथांत स्यूडोडोक्सिआ एपिदेमिका (१६४६, ह्याचेच प्रचारातले नाव व्हल्गर एरर्स), हायड्रिओटाफिआ, अर्न बेरिअल (१६५८) आणि गार्डन ऑफ सायरस (१६५८) ह्यांचा समावेश होतो. व्हल्गर एरर्स हा ब्राउनचा सर्वांत विस्तृत ग्रंथ. ह्यात अनेक लोकभ्रम आणि समजुती ह्यांमागील कारणांचे विश्लेषण करून त्या कशा चुकीच्या आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न आहे. स्वतः ब्राउनचा मात्र चेटुकविद्येसारख्या गोष्टीवर विश्वास होता. हायड्रिओटाफिआ…..त ब्रिटनमध्ये त्यावेळी प्रचलित असलेल्या विविध अंत्यसंस्कारपद्धतींचा विचार त्याने केला असून मृत्यू, मनुष्यास प्राप्त होणाऱ्या कीर्तीची क्षणभंगूरता ह्यांसारख्या विषयांवरील त्याचे चिंतनही त्यात आले आहे. गार्डन ऑफ सायरसमध्ये ख्रिस्ती पुराणकथेतील ईडनच्या बागेपासून सायरसच्या कारकीर्दीतील बागांपर्यंतच्या इतिहासाचा आलेख उद्यानविज्ञानाच्या दृष्टिकोणातून काढलेला आहे. ह्या ग्रंथात पंचराश्यंतराच्या (क्विन्कंक्स) कल्पनेने ब्राउन प्रभावित झालेला दिसतो. पाच ह्या आकड्याच्या काही गूढ गुणधर्मांबद्दलही त्याने लिहिले आहे. तथापि हा ग्रंथ मुख्यतः शैलीसाठी प्रसिद्ध आहे. ब्राउनच्या सर्वच ग्रंथांतून त्याच्या उच्कृष्ट गद्यशैलीबरोबरच त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाचेही दर्शन घडते. ब्राउनचे समग्र ग्रंथ ६ खंडात प्रसिद्ध झालेले आहेत (१९२८—३१).

संदर्भ : 1. Beonett, Joan, Sir Thomas Browne : A Man of Achievement In Literature, Cambridge (Mass.), 1962.

2. Dunn, Willam Parmly, Sir Thomas Browne : S Study in Religious Philosophy, Rev.Ed. Minnea polis, 1950.

3. Finch, Jeremiah Stanton, Sir Thomas Browne, New York, 1950.

4. Gosse, E. Sir Thomas Browne, London, 1905.

5. Huntley, Grank Livingston, Sir Thomas Browne, Ann Arbor (Mich.), 1962.

6. Merton, E. S. Science and Imagination in Sir Thomas Browne, New York, 1949.

7. Nathanson, L. The Strategy of Truth : A Study of Sir Thomas Browne, London, 1967.

कुलकर्णी, अ. र.