कूपर, जेम्स फेनिमोर : (१५ सप्टेंबर १७८९–१४ सप्टेंबर १८५१). अमेरिकन कादंबरीकार. जन्म न्यू जर्सीमधील बर्लिंग्टन येथे. वडील कूपर्सटाउन हे गाव वसविणारे श्रीमंत जमीनदार. येल येथे चालू असलेले जेम्स कूपरचे शिक्षण त्याच्या काही बेशिस्त वर्तनामुळे संपुष्टात आले.  काही काळ अमेरिकेच्या नाविक दलात त्याने नोकरी केली. १८११ मध्ये त्याचा विवाह झाला. त्यानंतर नाविक दलातील नोकरी सोडून देऊन प्रथम वेस्टचेस्टर काउंटी आणि नंतर कूपर्सटाउन येथे काही काळ कृषिव्यवसाय केला.

एक इंग्रजी कादंबरी वाचीत असता, त्या कादंबरीहून सरस कादंबरी लिहिण्यासंबंधीचे पत्‍नीचे आव्हान स्वीकारून प्रिकॉशन (१८२०) ही पहिली कादंबरी त्याने लिहिली. इंग्रजी जीवनावरील ही कादंबरी बव्हंशी अनुकरणात्मक आहे, हे लक्षात आल्यावर त्याने अमेरिकन पार्श्वभूमीवर कादंबऱ्‍या लिहावयाचे ठरविले. या दृष्टीने पुढे लिहिलेल्या अनेक कादंबऱ्‍यांपैकी ‘लेदर-स्टॉकिंग टेल्स’ ही पाच कादंबऱ्‍यांची माला विख्यात आहे. संविधानकाच्या दृष्टीने त्या कादंबऱ्यांचा क्रम असा : द डिअर स्लेअर (१८४१), द लास्ट ऑफ द मोइकन्स (१८२६), द पाथफाइंडर (१८४०), द पायोनिअर्स (१८२३) आणि द प्रेअरी (१८२७). कादंबरीच्या नायक एक पारधी असून मालेतील उपर्युक्त कादंबऱ्यांत तो अनुक्रमाने बंपो, हॉक्-आय् पाथफाइंडर, नॅटी बंपो किंवा लेदर-स्टॉकिंग आणि ट्रॅपर अशा वेगवेगळ्या नावांनी अवतरतो. रोमहर्षक प्रसंग, रेड इंडियन लोकांचे मार्मिक-स्वभावचित्रण, ते व वसाहतकार यांच्यातील संघर्ष व नॅटीच्या निसर्गप्रेमी  दिलदार व नीतिनिष्ठ जीवनपटाचे दर्शन यांमुळे केवळ अमेरिकन साहित्यातच नव्हे, तर विश्वसाहित्यात ही कादंबरीमाला अविस्मरणीय ठरलेली आहे. याशिवाय कूपरने समुद्रजीवनावर व तत्कालीन अमेरिकन समाजजीवनावरही कादंबऱ्‍या लिहिल्या परंतु त्यांना लेदर-स्टॉकिंग टेल्सची. सर आली नाही. कूपरच्या कादंबऱ्यांत पुनरुक्ती, पाल्हाळ व अतिरंजितता हे दोष असले, तरी तो स्कॉटसारखाच एक अत्यंत प्रभावी कथनकार आहे. आधुनिक अमेरिकन टीकाकार कूपरच्या तत्कालीन समाजजीवनाच्या चित्रणाला प्राधान्य देत असले, तरी सर्वसामान्य वाचकाच्या दृष्टीने कूपर हा नॅटी बंपोचा निर्माताच राहील. कूपर्सटाउन येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Dekker, George, James Fenimore Cooper, The Novelist, 1967.

            2. New York State Historical Association, James Fenimore Cooper : A Re-appraisal,

                 Cooperstown (N. Y.), 1954.

            3. Spiller, R. E. James Fenimore Cooper, Minneapolis, 1965.

            4. Walker, W. S. James Fenimore Cooper : An Introduction and Interpretation, New York,

                   1962.

नाईक, म. कृ.