आनंद, मुल्क राज: (१२ डिसेंबर १९०५ – ). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इंडो-अँग्‍लिअन कादंबरीकार आणि समीक्षक. जन्म पेशावर येथे. शिक्षण पंजाब, लंडन आणि केंब्रिज विद्यापीठांत. भारतातील दलित वर्गाच्या जीवनाचे चित्रण करणाऱ्या अन्‌टचेबल, (१९३५), कूली (१९३६), टू लीव्हज् अँड अ बड (१९३७) या त्यांच्या कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांच्या इतर उल्लेखनीय कादंबऱ्यांत द बिग हार्ट (१९४५), ‘सेव्हन समर्स ’(१९५१), ‘मॉर्निंग फेस’ (१९६८) यांचा समावेश होतो. सेव्हन समर्स आणि मॉर्निंग फेस या कादंबऱ्या आत्मचरित्रात्मक आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद अनेक भारतीय भाषांत झालेले आहेत. त्यांनी कथालेखनही केले आहे (‘द बार्बर्स ट्रेड युनियन’, ‘द ट्रॅक्टर अँड द कॉम गॉडेस’, ‘रिफ्लेक्शन्स ऑन द गोल्डन बेड’, ‘द पॉवर ऑफ डार्कनेस’, ‘लाजवंती’ इ.). सूक्ष्म व तरल विनोद त्यांच्या बऱ्याच कथांतून आढळतो. त्यांनी केलेल्या कलासमीक्षात्मक लेखनात पर्शिअन पेंटिंग (१९३८), हिंदू व्ह्यू ऑफ आर्ट  यांसारख्या पुस्तकांचा समावेश होतो. भारतीय नृत्य व भारतीय रंगभूमी यांविषयीही त्यांनी लेखन केले आहे. त्यांनी  ‘टागोर प्रोफेसर ऑफ आर्ट अँड लिटरेचर’ म्हणून चंडीगड विद्यापीठात काम केले. काही काळ ते लंडनला ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनमध्येही (बी. बी. सी.) होते. साहित्य अकादेमीचे ते सदस्य असून ललित कला अकादेमीचे ते अध्यक्ष आहेत. सध्यामार्ग चे संपादक. १९६७ मध्ये पद्मभूषण.

संदर्भ : Naik, M. K. Mulk Raj Anand, New Delhi, 1973.

शिरोडकर, द. स.