विल्यम थॅकरी

थॅकरी, विल्यम मेकपीस : (१८ जुलै १८११ – २४ डिसेंबर १८६३). एक श्रेष्ठ इंग्रज कादंबरीकार. जन्म भारतात कलकत्ता येथे. त्याचे वडील भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे एक अधिकारी होते. त्यांच्या निधनानंतर (१८१५) दोन वर्षांनी थॅकरी इंग्‍लंडमध्ये आला. ‘पॉलिगॉन’, ‘वॉलपोल हाउस’, ‘चार्टरहाउस’ ह्या विख्यात शिक्षणसंस्थांत सुरुवातीचे शिक्षण पुरे केल्यानंतर १८२९ मध्ये केंब्रिजच्या ‘ट्रिनिटी कॉलेजा’त त्याने प्रवेश घेतला. तथापि एका वर्षातच त्याने महाविद्यालयीन शिक्षण सोडले. त्यानंतर वायमार येथे जर्मन भाषेचा, पॅरिसमध्ये फ्रेंच साहित्याचा व परत इंग्‍लंडमध्ये काही काळ त्याने कायद्याचा अभ्यास केला. वयाच्या एकविसाव्या वर्षी पुरेशी वडिलार्जित मिळकत त्याच्या हाती येणार होती त्यामुळे एखाद्या व्यवसायात मनापासून पडावे, याकडे त्याचा कल नव्हता. तथापि वृत्तपत्रव्यवसायाची त्याला फार ओढ होती. द नॅशनल स्टँडर्ड हे अंशतः स्वतःच्या मालकीचे वाङ्मयीन नियतकालिक त्याने सु. वर्षभर चालविले (मे १८३३–फेब्रुवारी १८३४). तथापि आर्थिक प्रतिकूलतेमुळे ते बंद पडले. त्याला लाभलेली वडिलार्जित मिळकतही ह्या सुमारास संपली. १८३६ मध्ये त्याचा विवाह झाला आणि कुटुंबाच्या निर्वाहासाठी त्याने विविध नियतकालिकांतून निनावी किंवा टोपणनावाने विपुल लेखन केले. १८४० मध्ये त्याच्या पत्‍नीला मानसिक आजार उद्‌भवला. त्यानंतर जेन ब्रुकफील्ड नावाच्या एका स्त्रीच्या प्रेमात तो पडला तथापि तो प्रेमसंबंधही १८५१ मध्ये संपुष्टात आला. अशा विविध प्रकारच्या ताणतणावांचा दुःखद अनुभव घेत असताना थॅकरी कादंबरी–लेखनाकडे वळला. व्हॅनिटी फेअर ह्या त्याच्या पहिल्याच कादंबरीने त्याला कीर्ती मिळवून दिली. १८४७–४८ मध्ये ही कादंबरी क्रमशः प्रसिद्ध झाली. बेकी शार्प आणि ॲमिलिया सेड्ली ह्या परस्परविरोधी स्वभाव असलेल्या दोन स्त्रियांच्या जीवनक्रमाचे चित्रण ह्या कादंबरीत त्याने केलेले असून वास्तव जीवनात मानवी श्रद्धा कशा ढासळतात, हे त्यातून परिणामकारकपणे दाखवून दिले आहे. विदारक उपरोध हे ह्या कादंबरीचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. तत्त्वशून्य व साहसी बेकी शार्प ही थॅकरीने निर्माण केलेल्या श्रेष्ठ व्यक्तिरेखांपैकी एक होय. त्यानंतर पेंडेन्निस (१८४८–५०), हेन्‍री एझ्मंड (१८५२), द न्यूकम्स (१८५३–५५), व्हर्जिनिअन्स (१८५७–५९) या प्रमुख कादंबऱ्या त्याने लिहिल्या. तथापि सामान्यतः व्हॅनिटी फेअर हीच त्याची सर्वश्रेष्ठ साहित्यकृती समजली जाते. हेन्‍री एझ्मंड ही त्याची कादंबरी व्हॅनिटी फेअर इतकीच श्रेष्ठ मानणारे समीक्षकही आहेत. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धातील इंग्रज समाजाचे वेधक चित्रण तीत थॅकरीने केले आहे. वास्तव जीवनात घडून येणारा भ्रमनिरास आणि उच्च मध्यम वर्गीयांच्या दांभिकतेचा व उसन्या प्रतिष्ठेचा उपहास हे त्याच्या एकूण कादंबरी–लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. लंडन येथे तो निधन पावला.

देशपांडे, मु. गो.