ब्रॅडली, अँड्रू सिसिल: (२६ मार्च १८५१-२ सप्टेंबर १९३५). इंग्रज साहित्यसमीक्षक. जन्म चेल्टनम, ग्लॉस्टरशर येथे. शिक्षण चेल्टनम कॉलेज आणि बेल्यल कॉलेज, ऑक्सफर्ड येथे. युनिव्हर्सिटी कॉलेज लिव्हर पूल येथे १८८१ ते १८८९ ह्या कालखंडात आधुनिक साहित्य ह्या विषयाचा प्राध्यापक. त्यानंतर ग्लासगो विद्यापीठात त्याने इंग्रजी साहित्याचे अध्यापन केले. १९०१ मध्ये ऑक्सफर्डला काव्याचा प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक झाली. १९०७ मध्ये ब्रिटिश अकॅडमीचा फेलो म्हणून तो निवडला गेला.

ब्रॅडलीच्या साहित्यसमीक्षेवर बेल्यल कॉलेजचा मुख्य बेंजामीन जौएट आणि तत्ववेत्ता टी. एच्. ग्रीन याच्या विचारांचा दाट पगडा दिसतो. प्लेटो, हेगेल, आदर्शवादी तत्वज्ञान आणि कोलरिज यांचा प्रभावही ब्रॅडलीवर पडलेला आहे. पोएट्री फॉर पोएट्रीज सेक (१९०१) व ए कॉमेंट्री ऑन इन मेमोरिअम (१९०१) या त्याच्या समीक्षात्मक ग्रंथांमुळे प्रथम त्याचे नाव झाले असले, तरी शेक्सपिअरिअन ट्रॅजिडी (१९०४) या त्याच्या शेक्सपिअरकृत हॅम्लेट, ऑथेल्लो, किंग लिअर व मॅक्बेथ ह्या शोकात्मिकांच्या विश्लेषणाने शेक्सपिअर समीक्षेत एक नवेच युग निर्माण केले. शेक्सपिअरच्या शोकात्मिकेचे स्वरूप, वैशिष्ट्ये व तिच्यातील प्रमुख पात्रांचे स्वभावविशेष यांचे इतके मार्मिक व सुबोध विवेचन इतरत्र आढळत नाही. आधुनिक टीकाकारांच्या मते शेक्सपिअरने रंगविलेली पात्रे या नाटकातील व्यक्तिरेखा नसून जिवंत व्यक्तीच आहेत असे मानण्यात ब्रॅडलीने घोडचूकच करून ठेवलेली आहे शिवाय या नाटकांचा विचार करताना तत्कालीन रंगभूमीची वैशिष्ट्ये व त्यांचा शेक्सपिअरच्या नाट्यकलेवर पडलेला प्रभाव या महत्त्वाच्या बाबींकडेही ब्रॅडलीने दुर्लक्ष केले आहे. तरीही शेक्सपिअरच्या शोकात्मिकेचा कोणताही आधुनिक टीकाकार ब्रॅडलीला पूर्णपणे डावलून पुढे जाऊ शकत नाही, यातच ब्रॅडलीचे यश सामावले आहे.

ऑक्सफर्ड लेक्चर्स ऑन पोएट्री (१९०९) हा त्याचा अखेरचा महत्त्वाचा ग्रंथ. लंडनमध्ये तो निधन पावला.

नाईक, म. कृ.