किंग्झली, चार्ल्स :(१२ जून १८१९ — २३ जानेवारी १८७५). इंग्रज कादंबरीकार. जन्म डेव्हनशरमधील होन ह्या गावी. शिक्षण लंडन आणि केंब्रिज येथे. पदवीधर झाल्यानंतर अँग्लिकन धर्मोपदेशक होऊन क्यूरेट म्हणून तो हॅंपशरमधील एव्हर्ली येथे गेला. १८४४ मध्ये तो तेथील रेक्टर झाला. तेथे असतानाच तो लिहू लागला होता. टॉमस कार्लाइल आणि फ्रेडरिक डेनिसन मॉरिस ह्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास इंग्लंडमध्ये घडून आलेल्या सामाजिक सुधारणाविषयक चळवळींत त्याने आस्थेने भाग घेतला. तसेच ख्रिश्चन समाजवादाचा तो कट्टर पुरस्कर्ता बनला. चार्टिस्टांच्या अतिरेकी धोरणांना त्याचा पाठिंबा नव्हता. ‘पार्सन लॉट’ ह्या टोपण नावाने त्याने पॉलिटिक्स ऑफ द पीपल आणि ख्रिश्चन  सोशालिस्ट ह्या नियतकालिकांतून अनेक वैचारिक लेख लिहिले. ऑल्टक लॉक (१८५०) व यीस्ट (१८५१) ह्या त्याच्या कादंबऱ्यांतून ख्रिश्चन समाजवादी दृष्टीकोन प्रकर्षाने दिसून येतो. टू ग्रिअर्स ॲगो (१८५७) ह्या कादंबरीत तत्कालीन आंग्ल समाजातील काही नैतिक समस्या त्याने हाताळल्या आहेत. हायेपेशिआ (१८५३) आणि वेस्टवर्ड हो ! (१८५५) ह्या त्याच्या ऐतिहासिक कादंबऱ्या इतिहासकालीन वातावरणाच्या परिणामकारक निर्मितीच्या दृष्टीने विशेष लक्षणीयक आहेत. कादंबऱ्यांखेरीज द हीरोज (१८५६) आणि द वॉटर बेबीज (१८६३) ही कथांची पुस्तके त्याने मुलांसाठी लिहिली. द सेंट्स ट्रॅजेडी (१८४८) ही एक पद्यमय शोकात्मिकाही त्याने लिहिली आहे. १८६० — ६९ ह्या काळात त्याने केंब्रिज विद्यापीठात आधुनिक इतिहासाचा प्राध्यापक म्हणून काम केले. तेथे असताना त्याने दिलेले पहिले व्याख्यान द लिमिट्स ऑफ एक्झॅक्ट सायन्स ॲज अप्लाइड टू हिस्टरी, द रोमन अँड द ट्यूटन ह्या नावाने प्रसिद्ध झाले (१८६४). एव्हर्ली येथे तो निवर्तला. 

देशपांडे, मु. गो.