बटलर, सॅम्युएल : (१६१२-२५ सप्टेंबर १६८०) इंग्रज कवी. स्ट्रेनशॅम, वूर्सेस्टरशर येथे जन्मला. त्याची जन्मतारीख निश्चितपणे ज्ञात नसली, तरी त्याचा वाप्तिस्मा ८ फेब्रुवारी १६१२ रोजी झाला, असे दिसते. वूर्सेस्टर येथील ‘किंग्ज स्कूल’ मध्ये शिक्षण घेतल्यानंतर केंटची काउंटस एलिझाबेथ हिचा सचिव म्हणून तो काम करू लागला. पुढे ऑलिव्हर क्रॉमवेलच्या सैन्यातील एक अधिकारी सर सॅम्युएल ल्यूक ह्याचा सचिव म्हणून त्याने काम केले. तर सॅम्युएल ल्यूक हा कट्टर प्रेस्बिटेरिअन होता. त्याच्या नोकरीत असताना बटलरला प्यूरिटनपंथीय व्यक्तीचे तऱ्हे- वाईक नमुने पहावयास मिळाले. ह्यूडिब्रॅस (३ भाग–१६६१ १६६४ १६७८) हे आपले प्रसिध्द उपरोधप्रचुर काव्य लिहिताना बटलरच्या डोळ्यांसमोर हे नमुने होते.

इंग्रजी भाषेतील पहिली श्रेष्ठ उपरोधिका म्हणून ह्यूडिब्रॅसचा उल्लेख करण्यात येतो. ह्या काव्यात प्यूरिटन पंथीयांवर हल्ला केलेला असला, तरी बटलरचे उद्दिष्ट तेवढेच नव्हते, हेही जाणवते. बटलरचा काळ सामाजिक, राजकीय आणि धार्मिक वादंगांचा होता. ह्या वादंगांतून असहिष्णुता व अभिनिवेश व्यक्त होत होते तर्कसंगत युक्तिवादापेक्षाही शाब्दिक कसरतींनी खंडनमंडन करण्याची प्रवृत्ती दिसून येत होती. बटलरचा रोख ह्या अर्थशून्य वादपध्दतींवर होता. त्याने केलेले आघात विशिष्ट व्यक्तींविरूध्द नव्हेत, तर प्रवृत्तीविरूध्द होते.

ह्यूडिबॅस ह्या काव्याचा नायक एक प्रेस्बिटेरिअन सरदार आहे. राल्फो नावाच्या आपल्या स्क्वायरबरोबर तो करीत असलेल्या तथाकथित तात्त्विक चर्चेतून त्या दोघांचाही अडाणीपणा आणि अप्रामाणिक वृत्ती बटलरने दाखवून दिलेली आहे. ह्यूडिब्रॅसच्या नायकाचे व्यक्तिरेखन करीत असताना बटलरच्या डोळ्यांसमोर सर सॅम्युएल ल्यूक होता, असे म्हणतात. विख्यात स्पॅनिश लेखक सर्व्हँटीझ ह्याच्या दॉन किखोते (डॉन क्किक्झोट) ह्या कादंबरीचा आदर्श बटलरसमोर ही कादंबरी लिहिताना होता, असे दिसते तसेच फ्रेंच कवी पॉल स्काराँ (१६१०-६०) ह्याचाही बटलरवरील प्रभाव जाणवतो.

प्यूरिटनांची सत्ता संपुष्टात येऊन दुसऱ्या चार्ल्सने पूर्ववत सत्ता ग्रहण केल्यानतंर (१६६०), कॅरबेरीचा अर्ल रिचर्ड व्हॉन ह्याचा सचिव म्हणून बटलरने काही काळ काम केले. लंडन येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.