हॉलिनशेड, रॅफेएल : (१५२९–१५८०). इंग्रजी इतिवृत्तकार. चेशरमधील एका कुटुंबात त्याचा जन्म झाला असावा. पेशाने तो बहुधा धर्मोपदेशक होता. अँथनी वुड ह्या इतिहासकाराने त्याचा उल्लेख ‘मिनिस्टर ऑफ गॉड्स वर्ड’ असा केलेला आहे. सु. १५६०पासून तो लंडनमध्ये होता. तेथे तो रोजिनाल्ड वुल्फ ह्या मुद्रक – प्रकाशकाकडे अनुवादक म्हणून नोकरीस होता. तेथे असताना त्याने इतिवृत्तांची योजना आखली (१५७७). ही इतिवृत्ते त्याच्या नावाने ओळखली जात असली, तरी त्यांची रचना त्याने एकट्याने केलेली नाही. अनेक लेखक त्या प्रकल्पात होते. द हिस्टरी ऑफ इंग्लंड हे इतिवृत्त त्याने स्वतः लिहिलेले आहे. ह्या इतिवृत्तातील ‘डिस्क्रिप्शन ऑफ इंग्लंड’ हा भाग मात्र विल्यम हॅरिसन (१५३४–९३) ह्याने लिहिला आहे. तसेच ‘द हिस्टरी अँड डिस्क्रिप्शन ऑफ स्कॉटलंड’ आणि ‘द हिस्टरी ऑफ आयर्लंड’ हे भाग अनुवादित वा रूपांतरित आहेत. ‘द हिस्टरी ऑफ आयर्लंड’ मधील काही परिच्छेद पहिल्या एलिझाबेथ राणीला पसंत पडले नाहीत. ती दुखावली गेली त्यामुळे ते काढून टाकण्यात आले. त्याची प्रत ब्रिटिश म्यूझीयममध्ये आहे. 

 

शेक्सपिअरने मॅक्बेथ, किंग लिअर, सिंबेलिन ह्या आपल्या नाट्य- कृतींसाठी ह्या इतिवृत्तांतून मिळालेल्या सामग्रीचा वापर केला. 

 

कुलकर्णी, अ. र.