कूपर, विल्यम–१ : (१५ नोव्हेंबर १७३१–२५ एप्रिल १८००). इंग्रज कवी. जन्म ग्रेट बर्कहॅम्प्स्टेड येथे. शिक्षण वेस्टमिन्स्टर येथे. १७५४ मध्ये वकील झाला. तथापि काही वर्षांनी त्याला वेड लागले आणि त्याने आत्महत्येचा प्रयत्‍न केला. पुढे त्याचे वेड नाडीसे झाले.

जॉन न्यूटनच्या सहकार्याने कूपरने ओल्नी हिम्स  प्रकाशित केली (१७७९). त्यात ‘हार्क, माय सोल! इट इज द लॉर्ड’ आणि ‘गॉड मूव्ह्‌ज इन अ मिस्टरिअस वे’  ह्यांसारखी त्याची सुप्रसिद्ध स्तवने अंतर्भूत करण्यात आली होती. १७७९ नंतर त्याने बरीच काव्यरचना केली. तीत १७८२ मध्ये लिहिलेली द डायव्हर्टिंग हिस्टरी ऑफ जॉन गिल्पीन  ही विनोदी कविता आणि १७८४ मध्ये रचलेले द टास्क  हे दीर्घकाव्य विशेष उल्लेखनीय आहे. या दीर्घकाव्यात सुखलोलुप शहरी संस्कृतीविषयी उदासीनता आणि निसर्गरमणीय ग्रामीण जीवनाचे आकर्षण प्रत्ययास येते. मृत्यूपूर्वी उदास मनःस्थितीत लिहिलेल्या ‘द कास्टवे’ ह्या कवितेत त्याने मानवी एकाकीपणाचा विषय समर्थपणे हाताळलेला आहे.

नव-अभिजाततावाद आणि स्वच्छंदतावाद ह्यांच्यामधील संक्रमणकाळातील हा कवी. स्वच्छंदतावादाचा तो एक पूर्वसूरी होय. पोप आणि त्याचे अनुकरण करणारे नव-अभिजाततावादी कवी ह्यांच्या शैलीपेक्षा वेगळी अशी साधी आणि अकृत्रिम शैली त्याच्या काव्यात आढळते. ईस्ट डीअरम किंवा डीअरम येथे तो निधन पावला.

देवधर, वा. चिं.