हेवुड, जॉन : (१४९७ ?–१५८० ?). एक प्रसिद्ध ब्रिटिश नाटककार, कवी व विनोदी लेखक. त्याच्या जन्ममृत्यूच्या तारखा तसेच पूर्वायुष्य यांविषयी फारशी माहिती ज्ञात नाही तथापि इ. स. १५१९ पासून तो आठवा हेन्री (कार. १५०९–४७) याच्या दरबारात एक संगीतकार, पियानोवादक व खुशमस्कऱ्या म्हण्ून कार्यरत होता. पुढे राजाने त्याची संगीतशिक्षक म्हणून नियुक्ती केली. या काळात त्याला अनुकालिक देणग्या मिळत गेल्या. त्यावरून पुढे तो राजसत्तेच्या – विशेषतः सहावाएडवर्ड (कार. १५४७–५३) आणि पहिली मेरी (कार. १५५३–५८) यांच्या – मर्जीतील सेवक असावा. नंतर मात्र पहिली एलिझाबेथ राणी( कार. १५५८–१६०३) गादीवर आल्यानंतर तो रोमन कॅथलिक असल्यामुळे बेल्जियममधील मेक्लिनला पळून गेला आणि उर्वरितजीवन त्याने तेथे वाचन-लेखन यांत व्यतीत केले. वृद्धापकाळाने तेथेच त्याचे निधन झाले.
हेवुड याने विपुल लेखन केले. त्यांत मुख्यत्वे लघुनाट्ये असून द प्ले कॉल्ड द फोर पी, द प्ले ऑफ द वेदर, द प्ले ऑफ लव्ह्, बिटी ॲण्ड बिटलेस इ. मान्यवर व प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्याने स्पायडर ॲण्ड द फ्लाय (१५५६) हे रूपकात्मक काव्य लिहिले आणि ‘डायलॉग्ज ऑन बिट ॲण्ड फॉली’ ही इंग्रजी भाषेत उपलब्ध असलेल्या म्हणींवर विनोदी संवादात्मक रचना केली. त्याच्या सर्व चतुरोक्ती (एपिग्राम) जॉन हेवुड्ज वर्क्स (१५६२) यात संग्रहित केल्या आहेत. त्याने सेनिकोच्या द ट्रोजन विमेन (१५५९), थाय्स्टीज (१५६०), मॅड हर्क्यूलीज (१५६१) या ग्रंथांचे अनुवाद केले.
हेवुड याची विनोदी, उपाहासात्मक काव्यशैली नाटकांच्या रंगमंचावर लघुनाट्यांतून व्यक्त झाली असून रंगमंचांवरील संवादांना तिने उत्तेजनदिले. एलिझाबेथच्या काळात पूर्ण विकसित झालेल्या इंग्लिश नाट्य-सृष्टीला त्याने सुखात्मिकेच्या मार्गावर आणून सोडले. त्याच्या लघुनाट्यांनी बायबल संबंधीच्या रूपकातिशयोक्तीची जागा घेतली आणि त्या स्थळी दैनंदिन जीवनातील प्रातिनिधिक स्वरूपाचे प्रसंग दिग्दर्शितकेले. तसेच तत्कालीन चालीरीती व परंपरा यांना महत्त्व दिले. त्याच्या लघुनाट्यात व काव्यात इटालियन भावसदृश स्वच्छंदतावादी रचना आढळते. तीत त्याने कटाक्षाने व्यक्तिगत उल्लेख टाळले आहेत. भाषेवरील त्याचे प्रभुत्व संवादातून व्यक्त होते. छंद आणि लय या तंत्रांचा त्याने चपखल उपयोग लघुनाट्यात केला आहे. त्याने डच काव्याला नवीनदिशा दाखविली, असे समीक्षक म्हणतात. सुखात्मिकांचा लघुनाट्य-प्रकार त्याने सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात लोकप्रिय केला.
त्याच्या पत्नीचे नाव जोन. ती प्रसिद्ध नाटककार जॉन रॅस्टेल यांची कन्या होती. हेवुडला तिच्यापासून एलिस व जास्पर हे दोन मुलगे आणि एलिझाबेथ ही मुलगी होती. जास्पर हा लेखक असून त्याने वडिलांचे सर्व साहित्य प्रकाशित केले.
देशपांडे, सु. र.
“