मुर, जॉर्ज : (२४ फेब्रुवारी १८५२–२१ जानेवारी १९३३). आयरिश कादंबरीकार. जन्म आयर्लंडमधील बॅलीग्लास, कांउटी मेयो, येथे एका आयरिश जमीनदाराच्या कुटुबांत. बर्मिंगहॅम येथील ऑस्कट कॉलेजमध्ये त्याचे शिक्षण झाले. चित्रकार होण्यासाठी तो पॅरिसला गेला होता पंरतु आपण ती कला साध्य करू शकणार नाही, अशी जाणीव होऊन १८८२ साली तो लंडन येथे आला आणि कादंबरीलेखन करू लागला. ए मॉडर्न लव्हर (१८८३) आणि ए ममर्स वाइफ (१८८५) ह्या त्याच्या आरंभीच्या कादंबऱ्यांतून फ्रेंच निसर्गवादाच्या काही प्रवृत्ती प्रत्ययास येतो. पुढे तो ऑनोरे द बाल्झॅक आणि ग्युस्ताव्ह फ्लोबेअर ह्यांच्या प्रभावातून वास्तववादी तंत्रांचा वापर आपल्या कादंबऱ्यांतून करू लागला. एस्थर वाटर्स (१८९४) एव्हलीन इन्स (१८९८) आणि सिस्टर तेरेसा (१९०१) ह्या त्याच्या अन्य उल्लेखनीय कादंबऱ्या. एस्थर वॉटर्स ह्या त्याच्या कादंबरीला मोठी लोकप्रियता प्राप्त झाली.

आयरिश साहित्याच्या पुनरूज्‍जीवनासाठी विख्यात आयरिश कवी विल्यम बटलर येट्‌स ह्याच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या चळवळीत सहभागी होण्यासाठी मुर १९०१ साली डब्लिनला गेला. तथापि १८९९ पासून तो ह्या चळवळीशी संबंध होता. डब्लिनमध्ये ‘आयरिश लिटररी थीएटर’ ची स्थापना करण्यासाठी येट्‌स आणि एडवर्ड मार्टीन ह्यांच्याबरोबर त्याने त्या वेळी धडपड केली. आयरिश पार्श्वभूमीवर तो लिहू लागला. द अन्‌टिल्ड फील्ड (कथासंग्रह–१९०३) आणि द लेक (कादंबरी–१९०५) हे त्याचे ह्या काळातले विशेष उल्लेखनीय लेखन. विख्यात रशियन कथा-कादंबरीकार इव्हान टुर्ग्येन्येव्ह ह्याचा प्रभाव ह्या लेखनावर दिसून येतो.

आयरिश साहित्याच्या पुनरूज्‍जीवनाच्या नेत्यांशी न पटल्यामुळे, १९११ मध्ये, मुर इंग्लडला परत आला. त्यानंतर त्याने इतिहास, आख्यायिका ह्यांतून आपल्या कादंबऱ्यांचे विषय शोधले. उदा., द ब्रुक केरिथ (१९१६), हेलॉइस अँड अबेलार्ड (१९२१) ह्या कांदबऱ्या.

मुरने आत्मचरित्रात्मक लेखन बरेच केले. त्यात कन्‌फेशन्स ऑफ अ यंग मॅन (१८८८), मेम्वार्स ऑफ माय डेड लाइफ (१९०६), हेल अँड फेअरवेल (तीन खंड-एव्ह,१९११ सॉल्व्ह, १९१२ व्हेल,१९१४), कॉन्व्हर्सेशन्स इन एबरी स्ट्रीट (१९२४) ह्यांचा समावेश होतो. हेल अँड फेअरवेल हा त्याच्या आत्मचरित्रात्मक लेखनाचा सर्वोत्कृष्ट नमुना समजला जातो. आयर्लंडमधल्या वाङ्‌मयीन चळवळीतील येट्‌स, ए. ई., लेडी ग्रेगरी ह्यांसारख्या सहकाऱ्यांची जिवंत शब्दचित्रे त्याने त्यात काढली आहेत. लंडनमध्ये तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.