बेलो, सॉल : (१० जुलै १९१५- ). अमेरिकन कादंबरीकार. जन्म लशीन, क्वीबेक येथे एका रशियन ज्यू कुटुंबात. १९१३ मध्ये त्याचे आईवडील रशियातून कॅनडात आले. मॉंट्रिऑल येतील एका झोपडपट्टीत त्याच्या बालपणीची आरंभीची काही वर्षे गेली. तो नऊ वर्षांचा असताना त्याचे आईवडील शिकागो येथे आले. शिकागो विद्यापीठात आणि नॉर्थवेस्टर्न विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले १९३७ मध्ये तो पदवीधर झाला त्यानंतर मिनेसोटा, प्रिन्स्टन, न्यूयॉर्क आदी विद्यापीठांतून त्याने अध्यापन केले. अध्यापनाबरोबर लेखनही तो करीत होता. डॅंगलिंग मॅन (१९४४) आणि द व्हिक्टिम (१९४७) ह्या त्याच्या पहिल्या दोन कादंबऱ्या. समाज व व्यक्तिव्यक्तींचे पर‌स्परसंबंध हा त्याचा आवडता विषय ह्या कादंबऱ्यांतून त्याने प्रभावीपणे मांडला आहे. द ॲड्‌व्हेंचर्स ऑफ ऑजी मार्च (९१९५३) ही त्याची पहिली कांदबरी विशेष गाजली व तिला ‘नॅशनल बुक ॲवार्ड’ देण्यात आले. शिकागो येथील गरीब पण संपन्न व्यक्तिमत्त्वाच्या एका ज्यू तरूणाची ही कहाणी आहे. ह्या कादंबरीपासून त्याच्या कादंबरीलेखनाने निराळेचे वळण घेतले. कादंबरीचा घाट रेखीव, काटेकोर ठेवण्याच्या तत्कालीन प्रवृत्तीविरुद्ध बंड करण्यासाठी ह्या कादंबरीत त्याने सैल, विस्कळित अशा शैलीचा वापर केला. हेंडरसन द रेन किंग (१९५९) ह्या बेलोच्या कादंबरीत हेंडरसन हा एक करारी, संतापी आणि निधड्या छातीचा अमेरिकन लक्षाधीश आफ्रिकेत येऊन स्वत:च्या आयुष्यात शांती मिळविण्याची धडपड कशी करतो हे प्रत्ययकारीपणे दाखविले आहे. हर्‌झॉग (१९६४) आणि मिस्टर सॅमलर्स प्लॅनेट (१९७०) ह्या कादंबऱ्यांतून दोन ज्यू बुद्धिवंतांच्या जीवनांचे चित्रण केले आहे. ह्या कादंबऱ्यांपैकी हर्‌झॉगने बेलोला आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त करून दिली. विद्यापीठात प्राध्यापक असलेला ह्या कादंबरीचा मध्यमवयीन नायक आपली पत्नी बेइमान ठरली म्हणून वेडापिसा होतो. तथापि अखेरीला सूडाची भावना व समाजाशी होणारा दुरावा ह्या दोहोंचेही वैयर्थ्य पटल्यानंतरच त्याला शांती लाभते. ‘आधुनिक समाजात व्यक्तीने आपले स्वत्व टिकविण्यासाठी चालविलेली धडपड हा कादंबरीचा प्रमुख विषय होय’, अशा आशयाचे बेलोने काढलेले उद्‌गार त्याच्या कादंबरीलेखनामागील भूमिका स्पष्ट करतात. आधुनिक ज्यूचे मन व आधुनिक अमेरिकन समाज ह्या दोहोंचेही मर्मग्राही विश्लेषण त्याने आपल्या कादंबऱ्यांतून केले आहे. १९७६ साली नोबेल पारितोषिक देऊन जागतिक पातळीवर त्याच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला.

नाईक म. कृ.