वॉल्पोल, हॉरिस : (२४ सप्टेंबर १७१७ -२ मार्च १७९७). इंग्रज साहित्यिक. जन्म लंडन शहरी. इंग्लंडचा विख्यात मुत्सद्दी, संसदपटू आणि सामान्यतः ज्याला पहिला ब्रिटिश पंतप्रधान म्हटले जाते, त्या सर रॉबर्ट वॉल्पोलचा हा पुत्र. ईटन आणि केंब्रिज येथे त्याचे शिक्षण झाले. विख्यात इंग्रज कवी ⇨टॉमस ग्रे (१७१६-७१) हा त्याचा मित्र. त्याच्यासह हॉरिस हा फ्रान्स आणि इटलीच्या दौऱ्यावर निघाला (१७३९). ह्याच दौऱ्यात त्या दोघांचे भांडण होऊन त्यांची मैत्री तुटली होती पण नंतर त्यांनी जुळवून घेतले. १७४१ साली हॉरिस इंग्लंडच्या पार्लमेंटचा सदस्य झाला परंतु तेथे त्याचा प्रभाव पडला नाही. तो अविवाहित होता. आपली मित्रमंडळी आणि ट्विकनम येथे त्याने घेतलेले छोटेस घर-हेच पुढे ‘स्ट्राबेरी हिल’ ह्या नावाने ओळखले जाऊ लागले-ह्यांतच तो रमून जात असे. तेथे त्याने एक मुद्रणालयही काढले होते. स्वतःची आणि आपल्या लेखकमित्रांची पुस्तके तो तेथे छापीत असे. टॉमस ग्रेच्या उद्देशिका त्याने ह्याचे मुद्रणालयात १७५७ साली छापल्या. १७६४ मध्ये कासल ऑफ ऑट्रँटो ही त्याची कादंबरी प्रसिद्ध झाली. ही कादंबरी म्हणजे एका इटालियन कादंबरीचे भाषांतर होय, असे तिच्या पहिल्या आवृत्तीत नमूद केले होते. परंतु दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी मात्र हॉरिस वॉल्पोल हाच तिचा कर्ता असल्याचे उघड करण्यात आले. बाराव्या-तेराव्या शतकांतले वातावरण असलेल्या ह्या कांदबरीने कादंबरीचा एक नवा प्रकार-गॉथिक वा भयप्रदान कादंबरी-इंग्रजी साहित्यात आणला. ⇨सॅम्युएल रिचर्ड्सनच्या कादंबऱ्यांनंतर वास्तववादी कादंबरीलेखनाला फारसा वाव राहिलेला नसून कादंबरीत नवे चैतन्य ओतावयाचे असल्यास त्यासाठी वेगळ्या सामग्रीचा उपयोग करणे आवश्यक आहे, अशी हॉरिसची धारणा होती. तीनुसार मध्ययुगीन वातावरण, अतिमानुष शक्ती, गूढता आणि भयानकता ह्यांचा त्याने वापर केला. प्राचीन रोमान्स व आधुनिक रोमान्स ह्यांच्या वैशिष्ट्यांचे कलात्मक मिश्रण केल्यास त्यातून निर्माण होणारी कांदबरी ही एकाच वेळी नवी व भावनोद्दीपक ठरेल, असे हॉरिसला वाटत होते. कासल ऑफ ऑट्रँटो  ही कांदबरी वाङ्‌मयीन गुणवत्तेच्या दृष्टीने फारशी यशस्वी ठरली नाही पण तिला वाचकवर्ग मोठा लाभला. विशेष म्हणजे लॉर्ड बायरन, सर वॉल्टर स्कॉट ह्यांसारख्यांनी तिची प्रशंसा केली. त्याच्या कांदबरीचे अनुकरण करणाऱ्या काही कादंबऱ्या- विशेषतः स्त्रियांनी लिहिलेल्या-प्रसिद्ध झाल्या. क्लेरा रीव्ह, शार्लट स्मिथ, सोफिआ ली ह्या अशा काही कादंबरीलेखिका होत. हॉरिसच्या कादंबरीलेखनाचा प्रभाव काही अंशी स्कॉटवरही पडल्याचे दिसून येते. मिस्टिरिअस मदर (१७६८) ही एक शोकात्मिकाही त्याने लिहिली. ॲनिक्डोट्स ऑफ पेंटिंग इन इंग्लंड (४ खंड, १७६२-७१) हे त्याने लिहिलेले पुस्तक कलेतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्याचा खाजगी पत्रव्यवहार (सु. ३,००० पत्रे) त्याच्या काळाचा इतिहास, रीतिरिवाज, अभिरुची जाणून घेण्याच्या दृष्टीने मोलाचा आहे. पत्रलेखनाची कला त्याने जाणीवपूर्वक आत्मसात केली होती. विविध विषयांवर ही पत्रे त्याने लिहिली आहेत. जीवनाचे अलिप्तपणे निरीक्षण करण्याची प्रवृत्ती त्याच्या पत्रलेखनातून दिसते. त्याने लिहिलेल्या आठवणींतून इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज व तिसरा जॉर्ज ह्यांच्या कारकीर्दीत राजकीय घटनांची नोंद आढळते. लंडन येथेच तो मरण पावला.

संदर्भ : 1. Ketton-Cremer, R. W. Horace Walpole: A Biography, New York, 1940.  

           2. Lewis, W. S. Horace Walpole, New York, 1961.

           3. Smith, W. H. Ed. Horace Walpole : Writer, Politician and Connoisseur, London 1968.

कुलकर्णी, अ. र.