मॉर्गन, चार्ल्स: (२२ जानेवारी १८९४–६ फेब्रुवारी १९५८). इंग्रज कादंबरीकार, नाटककार आणि समीक्षक. ब्रॉमली, केंट येथे जन्मला. वयाच्या तेराव्या वर्षी त्याने ‘रॉयल नेव्ही’त (ब्रिटिश नौदल) प्रवेश केला पहिल्या महायुद्धात तो लढला. १९२१ मध्ये त्याने ऑक्सफर्ड विद्यापीठाची बी. ए. पदवी मिळवली. त्यानंतर लंडनच्या द टाइम्स ह्या वृत्तपत्राच्या संपादकीय विभागात तो नोकरी करू लागला. १९२६ ते १९३९ ह्या कालखंडात प्रमुख नाट्यसमीक्षक म्हणून त्याने तेथे काम केले. दुसऱ्या महायुद्धातही त्याने नौदलात काम केले. लंडन येथे तो निधन पावला. 

द गनरूम (१९१९) आणि माय नेम इज लिजन (१९२५) ह्या त्याच्या आरंभीच्या कादंबऱ्या. त्याच्या विशेष उल्लेखनीय कादंबऱ्यांत पोर्ट्रेट इन अ मिरर (१९२९), द फाउंटन (१९३२), स्पार्कनब्रोक (१९३६), द व्हॉयेज (१९४०) आणि चॅलेंज टू व्हीनस (१९५७) ह्यांचा समावेश होतो. 

द फ्लॅशिंग स्ट्रीम (१९३८), द रिव्हर लाइन (१९५२) आणि द बर्निंग ग्लास (१९५४) ही त्याची नाटके. रिफ्लेक्शन्स इन अ मिरर (१९४४) हा त्याच्या टीकात्मक लेखांचा संग्रहही प्रसिद्ध आहे.

मॉर्गनचा लौकिक मुख्यतः कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहे. कलासंपन्न आणि संस्कारित शैलीने लिहिणाऱ्या ह्या तरल व संवेदनशील लेखकाशी सामान्य वाचकाचे नाते नेहमीच जुळते असे नाही. सुखवस्तू जीवनातील मानसिक व्यथांचे करुण सौंदर्य त्याच्या कादंबऱ्यांत साकार झालेले आहे. आध्यात्मिक मूल्यांची सुबोध मांडणी त्यांत आढळते. ह्या कादंबऱ्या वाचताना, तत्त्वज्ञानाचे कूटप्रश्न आपल्याला समजले, ह्या जाणिवेने वाचक सुखावतो. मानवी जीवन हे ध्येयवाद, नवे नवे अनुभव व तरल अंतःप्रवृत्ती ह्यांचे बनलेले आहे, ही त्याची भूमिका आहे. पोर्ट्रेट इन अ मिरर द फाउंटन ह्या कादंबऱ्यांत ही वैशिष्ट्ये प्रामुख्याने दिसतात. त्यामुळे ह्या कादंबऱ्या लक्षणीय वाटल्या व इतर भाषांत त्यांचे अनुवाद झाले. द फाउंटन ह्या कादंबरीला १९३३ मध्ये हॉथॉर्नडन पारितोषिक देण्यात आले. 

मॉर्गनच्या प्रत्येक नाट्यकृतीत एखाद्या विशिष्ट समस्येचा विचार केलेला आढळतो. तथापि ही नाटके फारशी यशस्वी झालेली दिसत नाहीत. 

संदर्भ : Dufflin, H. C. The Novels and Plays of Charles Morgan, 1959.

हातकणंगलेकर, ग. द.