एम्प्सन, विल्यम: (२७ सप्टेंबर १९०६ – ). आंग्ल कवी व टीकाकार. जन्म यॉर्कशरमधील हाउडन येथे. शिक्षण केंब्रिज विद्यापीठात. टोकिओ, पीकिंग व १९५३ पासून शेफील्ड येथे इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून काम. काही वर्षे बी. बी. सी. वरही काम केले. पोएम्स (१९३५), द गॅदरिंग स्टॉर्म (१९४०) आणि कलेक्टेड पोएम्स (१९५५) हे तीन काव्यसंग्रह तसेच सेव्हन टाइप्स ऑफ अँबिग्यूइटी (१९३०), सम व्हर्शन्स ऑफ पास्टोरल (१९३५), द स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्लेक्स वर्ड्‍‍‍‍‍स (१९५१) आणि मिल्टन्स गॉड (१९६१) हे समीक्षात्मक ग्रंथ त्याने लिहिले.

सोळाव्या-सतराव्या शतकांतील जॉन डनचा आणि चालू शतकातील टी. एस्. एलियटचा त्याच्या काव्यावर प्रभाव पडलेला दिसतो. तंत्राचा अतिरिक्त पुरस्कार केल्यामुळे त्याच्या काव्यात आशयाला योग्य स्थान राहिले नाही. जॉन वेनसारख्या कवींवर त्याच्या तंत्राचा आणि भाषाशैलीचा परिणाम झाला. सेव्हन टाइप्स ऑफ अँबिगयूइटी  ह्या त्याच्या विख्यात ग्रंथात त्याने विविधार्थतेचे तत्त्व हे एक काव्यलक्षण असून ते काव्याच्या मूल्यमापनाचा एक निकष होऊ शकेल, असे मत मांडले. शब्दांची विविधार्थक्षमता काव्याला अधिक अर्थ प्राप्त करून देते व ते अधिक सधन व समृद्ध बनविते, अशी त्याची धारणा आहे. विविधार्थता सात प्रकारची असते असे सांगून ती वेगवेगळ्या कवींच्या काव्यात कशी आढळते, हे त्याने दाखविले आहे. ह्या ग्रंथाने अमेरिकन साहित्यातील नवटीकेचा पाया घातला.

जोशी, अशोक