मेस्‌फील्ड, जॉन : (१ जून १८७८–१२ मे १९६७). इंग्रज कवी. हरफर्डशरमधील लेडबरी येथे जन्मला. तो लहान असतानाच त्याचे आईवडील निवर्तले. वॉरिक येथील किंग्ज स्कूलमध्ये काही शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी एका व्यापारी गलबतावर खलाशी म्हणून तो काम करु लागला. १८९५ मध्ये आपल्या दर्यावर्दी जीवनाचा त्याग करून अमेरिकेत, न्यूयॉर्क सिटी आणि आसपासच्या भागात मिळतील ती कामे करून त्याने उपजीविका केली. १८९७ मध्ये तो इंग्लंडला परतला आणि वृत्तपत्रांत लेखन करू लागला. सॉल्ट-वॉटर बॅलड्‌स (१९०२) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह. बॅलड्‌स अँड पोएम्स (१९१०) हा त्याचा अन्य उल्लेखनीय काव्यसंग्रह. १९११ मध्ये ‘द एव्हरलास्टिंग मर्सी’ हे त्याचे दीर्घकाव्य प्रसिद्ध झाले. ह्या वास्तववादी कथाकाव्यात त्याने वापरलेली अत्यंत रांगडी अशी भाषा काहींना टीकार्ह वाटली, तरी हे काव्य अत्यंत लोकप्रिय झाले. ‘डॉबर’ (१९१३) आणि ‘रेनर्ड द फॉक्‌स’ (१९१९) ही त्याची दीर्घकाव्येही प्रसिद्ध आहेत. ‘रेनर्ड द फॉक्‌स’ मधील प्रारंभक मध्ययुगीन श्रेष्ठ इंग्रज कवी चॉसर ह्याने त्याच्या कॅंटरबरी टेल्सना लिहिलेल्या प्रारंभकाचे स्मरण करून देतो. मेस्‌फील्डवर येट्‌स आणि सिंग ह्या आयरिश कवींचा प्रभाव दिसून येतो. दर्याबद्दलचे विलक्षण प्रेम हे त्याच्या कवितेचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. सॉल्ट-वॉटर बॅलड्‌स वाचताना समुद्रावरील वारा अंगावर वाहत असल्याचा भास आपल्याला झाला, असे एका टीकाकाराने नमूद केले आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात मेसफील्डला रस होता व त्याचे प्रत्यंतरही त्याच्या कवितेतून येते. अधिकाधिक वाचकापर्यंत जाऊन भिडेल, असा एक नवा सूर आपल्या कवितेतून निर्माण करण्याचा त्याने प्रयत्न केला. द ट्रॅजिडी ऑफ नॅ (१९०९) आणि द ट्रॅजिडी ऑफ पाँपी द ग्रेट (१९१०) ही त्याची काही उल्लेखनीय नाटके. त्याने काही कथा आणि कादंबऱ्यांही लिहिल्या आहेत. इन द मिल (१९४१) आणि सोलाँग टू लर्न (१९५२) ही त्याची आत्मचरित्रात्मक पुस्तके.

इंग्लंडचा राजकवी रॉबर्ट  ब्रिजेस ह्याचे निधन झाल्यावर (१९३०) राजकविपद मेस्‌फील्डला देण्यात आले. १९३५ साली ऑर्डर ऑफ मेरिट देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.

ॲबिंग्डन, बार्कशर येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Spark, Muriel, John Masefield, 1953.

             2. Sternlicht, Sanford, John Masefield, Twayne, 1977.

बापट, गं. वि.