गार्डनर, ॲल्फ्रेड जॉर्ज : (२ जून १८६५–३ मार्च १९४६). इंग्रज पत्रकार आणि लघुनिबंधकार. जन्म एसेक्स परगण्यातील चेम्सफर्ड येथे. अनेक वर्षे पत्रकार. डेली न्यूजचा संपादक (१९०२-१९). ‘आल्फा ऑफ द प्लाऊ’ ह्या टोपणनावाने अनेक उत्कृष्ट लघुनिबंध लिहिले. पेबल्स ऑन द शोअर (१९१५), लीव्ह्‌ज इन द विंड (१९१८) आणि मेनी फरोज (१९२४) हे त्याचे काही उल्लेखनीय लघुनिबंधसंग्रह. साधी, सोपी पण खेळकर भाषाशैली, नर्मविनोद, चुटके, अवतरणे ह्यांचा परिणामकारक उपयोग इ. गुणांमुळे हे लघुनिबंध अत्यंत लोकप्रिय झाले. अनेक भारतीय लघुनिबंधकारांवरही त्यांचा प्रभाव पडला. प्रॉफेट्‌स, प्रिस्ट्‌स अँड किंग्ज (१९०८), पिलर्स ऑफ सोसायटी (१९१३), द वॉर लॉर्ड्स (१९१५) आणि सर्टन पीपल ऑफ इंपॉर्टन्स (१९२६) ही त्याची इतर काही पुस्तके. त्यांत त्याचे विविध व्यक्तींवरील लेख आहेत. वेधक शैलीने नटलेली ही व्यक्ति चित्रे प्रशंसनीय ठरली आहेत.

ब्रिटिश मुत्सद्दी सर विल्यम हॅरकोर्ट आणि उद्योगपती जॉर्ज कॅडबेरी ह्यांची चरित्रेही त्याने लिहिली आहेत. प्रिन्सेस रिझबरो येथे तो निधन पावला.

बापट, गं. वि.