डी. एच्. लॉरेन्स

लॉरेन्स, डेव्हिड हर्बर्ट : (११ सप्टेंबर १८८५ – २ मार्च १९३०). इंग्रज कथा-कादंबरीकार, कवी, टीकाकार आणि विसाव्या शतकातील इंग्रजी साहित्यातील एक प्रभावी आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. नॉटिंगॅमशरमधील ईस्टवूट येथे तो जन्मला. त्याचे वडील खाणकामगार होते आणि आई शिक्षिका होती. ती कविताही करीत असे. आईच्या उत्तेजनामुळेच त्याला विद्यार्जनात रस निर्माण झाला. नॉटिंगॅम येथील शाळेत आणि ‘युनिव्हर्सिटी कॉलेजा’त त्याचे शिक्षण झाले. युनिव्हर्सिटी कॉलेजातून त्याने अध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र मिळविले. त्यानंतर फ्रॉयडन येथील शाळेत तो शिक्षक म्हणून काम करू लागला. १९१२ मध्ये फ्रीडा वीक्ली ह्या जर्मन स्त्रीशी त्याचा परिचय झाला आणि त्या दोघांत उत्कंट भावबंध निर्माण झाले. फ्रीडा उमराव घराण्यातील होती आणि तिचा पती नॉटिंगॅम येथे लॉरेन्सचा प्राध्यापक होता. १९१२ च्या मे महिन्यांत लॉरेन्स तिच्यासह जर्मनीला गेला. तेव्हापासून सततच्या भ्रमंतीचे आयुष्य तो जगला. काही काळ इटलीत घालवल्यानंतर लॉरेन्स आणि फ्रिडा इंग्‍लंडमध्ये परतले आणि १९१४ मध्ये त्यांनी विवाह केला. पहिल्या महायुद्धाच्या काळात लॉरेन्सला बराच त्रास सहन करावा लागला. लॉरेन्सची पत्‍नी जर्मन असल्यामुळे त्याच्याभोवती अविश्वासाचे आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले. ह्याच काळात रेनबो (१९१५) ह्या त्याच्या कादंबरीवर अश्लीलतेचा आरोप झाला आणि तिच्यावर बंदी आणण्यात आली. समकालीन जगातल्या भीषण वातावणापासून जेथे दूर, अलिप्तपणे राहता येईल, अशा एका आदर्श स्थळाचे स्वप्‍न ह्या काळात लॉरेन्स पाहात होता. इंग्‍लंडमधील ग्रामीण भाग, ओल्ड मेक्सिको, न्यू मेक्सिको अशा विविध ठिकाणी त्यासाठी तो भटकला. इटली आणि दक्षिण फ्रान्समध्येही तो राहिला. फ्रान्समधील व्हँस येथे तो निधन पावला.

लॉरेन्सने केलेले लेखन कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, निबंध प्रवासवर्णने असे विविध प्रकारचे असले, तरी त्याची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्याच्या कथा-कादंबऱ्यांवर. द व्हाइट पीकॉक ही त्याची पहिली कादंबरी १९११ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या कादंबऱ्यांत द ट्रेसपासर (१९१२), सन्स अँड लव्हर्स (१९१३), द रेनबो, विमेन इन लव्ह (१९२०). कँगरू (१९२३), द प्‍लूम्‍ड सर्पंट (१९२६) आणि लेडी चॅटर्लीज लव्हर (१९२८) ह्यांचा समावेश होतो.

लॉरेन्सचा पहिला कथासंग्रह – द प्रशियन ऑफिसर अँड अदर स्टोरीज – १९१४ साली प्रसिद्ध झाला. इंग्‍लंड, माय इंग्‍लंड (१९२२), द लेडीबर्ड (१९२३), द वुमन हू रोड अवे अँड अदर स्टोरीज (१९२८) आणि द लव्ह्‍ली लेडी (१९३३) हे त्यानंतरचे उल्लेखनीय कथासंग्रह.

स्त्री-पुरुष संबंध हा लॉरेन्सचा लेखनाचा मुख्य विषय. लैगिंक जीवनाबद्दलचा त्याचा दृष्टीकोणही वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्त्री-पुरुषांचे लैगिंक जीवन म्हणजे जीवनातील निर्मितिक्षमतेचा अनुभव व साक्षात्कार, अशी त्याची धारणा होती. त्यामुळे त्याच्या कादबऱ्यांतून लैगिंक जीवनाची मनमोकळी वर्णने आढळून येतात. लॉरेन्स प्रखर व्यक्तिवादी होता. जीवनाचा अनुभव आतून यावा आणि त्याने सारे व्यक्तिमत्व व्यापले जावे, असे त्याला वाटे. भावनांचा कोंडमारा करणाऱ्या नैतिक-बौद्धिक दडपणातून मुक्त व्हायला हवे, अशी त्याची भूमिका होती. त्याच्या कादंबऱ्यांतून त्याने माणूस आणि निसर्ग, स्त्री आणि पुरुष ह्यांच्यात योग्य तो समतोल साधणारे नाते शोधण्याचा प्रयत्‍न केला आहे. हा समतोल दुबळ्यांनी समर्थांना शरण जाण्यात साधला जातो, असे त्याला वाटे. आधुनिक यंत्रप्रधान संस्कृतीची घृणा, निसर्गाशी संपूर्ण संवाद साधण्याची ओढ, केवळ कोरड्या बुद्धीजीवी जीवनाचा तिटकारा आणि माणसाच्या सहजप्रवृत्तींवरचा गाढ विश्वास हे लॉरेन्सच्या जीवनतत्त्वज्ञानाचे मुख्य विशेष. द प्‍लूम्‍ड सर्पंट ह्या कादंबरीत स्त्रीने समर्पणाची भूमिका घ्यावी, असे तो सुचवतो. लॉरेन्सच्या द रेनबो ह्या कादंबरीवर अश्लीलतेचा आरोप आलेला होताच, तथापि लेडी चॅटर्लीज लव्हर ह्या कादंबरीवरही तो आला आणि ती वादग्रस्त ठरली. फ्लॉरेन्समध्ये (१९२८) आणि पॅरिसमध्ये (१९२९) तिच्या मर्यादित प्रती प्रकाशित करण्यात आल्या. ह्या कादंबरीतला आक्षेपार्ह मानला गेलेला भाग काढून ही कादंबरी इंग्‍लंडमध्ये १९३२ साली-लॉरेन्सच्या मृत्यूनंतर-प्रसिद्ध करण्यात आली. तिची संपूर्ण संहिता न्यूयॉर्क शहरी १९५९ मध्ये आणि लंडनमध्ये १९६० साली प्रसिद्ध झाली. त्यानंतर ह्या कादंबरीच्या प्रकाशनांना न्यायालयातही खेचण्यात आले. लॉरेनसच्या कादंबऱ्यांची भाषाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या आशयाच्या आवश्यकतेनुसार आपल्या भाषेची अभिव्यक्तिक्षमता वाढविण्याती त्याची धडपड त्याच्या कादंबऱ्यांतून प्रत्ययास येते. प्रतिमांचा आणि प्रतीकांचा वापर त्याने कल्पकतेने केलेला आहे. त्यामुले त्याची भाषा उक्तट व काव्यात्म झालेली आहे.

लॉरेन्सच्या कादंबरीलेखनाचे विषय आणि भाषा ह्यांची वैशिष्ट्ये त्याच्या कथालेखनातही आढळतात. लॉरेन्सचे आठ कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. त्याच्या कवितांतून आढळणारी आत्मचरित्रात्मकता लक्षणीय आहे. बर्ड्‍स, बीस्ट्‍स अँड फ्लॉवर्स (१९२३) मधील त्याची निसर्गकविता बहुढंगी सृष्टीसौंदर्यांचे प्रत्ययकारी दर्शन घडवते. अभिव्यक्तिची सहजता, भाषेचा साधेपणा व वृत्ततंत्राच्या जाचा विरुद्धची बंडखोरी हे त्याच्या काव्याचे काही ठळक विशेष. ट्‍वायलाइट इन इटली (१९१६), सी अँड सार्डिनिया (१९२१), मॉर्निंग्ज इन मेक्सिको (१९२७) व इट्रूस्कन प्‍लेसीन (१९३२) ही त्याने लिहिलेली उत्कृष्ट प्रवासवर्णने. सायकोअनॅलिसिस अँड दि अन्‍कॉन्‍शस (१९२१) आणि फँटाझिआ ऑफ द अन्‍कॉन्‍शस (१९२२) ह्या ग्रंथांत त्याचे मानसशास्त्राविषयक लेखन आहे.

ह्यांखेरीज स्टडीज इन क्‍लासिक अमेरिकन लिटरेचर (१९२३), पॉर्नग्राफी अँड ऑब्‍सीनिटी (१९२९) इ. समीक्षात्मक, वैचारिक लेखनही त्याने केलेले आहे. टच अँड गो (१९२०), डेव्हीड (१९२६). ए कोलिअर्स फ्रायडे नाइट (१९३४) ह्या त्याच्या काही नाट्यकृती. अलीकडे त्यांचे यशस्वी प्रयोगही झालेले आहेत. लॉरेन्सच्या सर्व नाट्यकृती १९६५ साली एकत्रित स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आल्या. तो एक चित्रकारही होता.

लॉरेन्सची पत्रेही त्याचे व्यक्तिमत्त्व समजावून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरतात. ए. हक्सली व एच्. टी. मूर ह्या दोघांनी लॉरेन्सची पत्रे संपादून प्रसिद्ध केली आहेत (हक्सली-१९३२, मूर-२ खंड, १९६२). लॉरेन्सचे ग्रंथ संकलित स्वरूपात २१ खंडांत प्रसिद्ध झालेले आहेत (फीनिक्स आवृ. १९५४-५७).

संदर्भ : 1. Aldington, Richard, Portrait of a Genius But …, London, 1950.

2. Beal, A. Ed. Selected Literary Criticism London, 1956.

3. Draper R. P. Ed. D. H. Lawrence : The Critical Heritage, 1970.

4. Hough Graham The Dark Sun : A study of D. H. Lawrence, 1961.

5. Leavis F. R. D. H. Lawrence : Novelist, London, 1964.

6. Moore, H. T. The, Intelliget Heart, New York, 1960.

7. Nehls E. Ed. D. H. Lawrence : A Composite Biography, 3 Vols., 1957-59.

8. Pinto, De Sola Roberts W. The Complete Poems of D. H. Lawrence, 2 Vols., London, 1964.

9. Spilka, Mark, Ed. D. H. Lawrence : A Collection o Critical Essays, EnglewoodCliffs 1963.

10. Vivas Eliseo D. H. Lawrence : The Failure And the triumph of Art, London, 1961.

कळमकर, य. शं.