ड्यूरेल, लॉरेंझ : (२७ फेब्रुवारी १९२२– ). इंग्रज कवी व कादंबरीकार. जन्म भारतात दार्जिलिंग येथे. शिक्षण दार्जिलिंग आणि कँटरबरी येथे. त्याचे बरेचसे वास्तव्य इंग्लंडबाहेरच झालेले आहे. प्रसिद्धी खात्यातील अधिकारी म्हणून ईजिप्त, ग्रीस, यूगोस्लाव्हिया आदी देशांत त्याने काम केले.

अ प्रायव्हेट कंट्री (१९४३) ह्या त्याच्या काव्यसंग्रहामुळे कवी म्हणून तो प्रथम प्रसिद्धीस आला. सिटीज, प्लेन्स अँड पीपल (१९४६), ऑन सीमिंग टू प्रिस्यूम (१९४८), द आय्‌कॉन्स (१९६६) हे त्याचे आणखी काही उल्लेखनीय काव्यसंग्रह.

सिक्लाडीझ बेटांवरील सतेज फुले, काळे पाषाण आणि झगमगते समुद्र ह्यांनी नटलेले ड्यूरेलचे काव्यविश्व त्याच्या वरील काव्यसंग्रहांतून विशेषत्वाने प्रत्ययास येते. ड्यूरेल हा स्थलकौतुकाचा कवी म्हणून ओळखला जातो. विविध स्थळांची आवाहक वर्णने त्याच्या अनेक कवितांतून येतात. तथापि स्थळचित्रे जिवंतपणे साकारणारी त्याची आवाहक शब्दकळा त्याच्या आत्मपर कवितेतील आशय मात्र धूसर करते.

द ॲलेक्झांड्रिया क्कार्टेट (१९६२) ही चार खंडांतील कादंबरी लिहून ड्यूरेलने आपल्या समर्थ गद्यलेखनाचीही प्रचीती दिली. जस्टिन (१९५७), बॅलथेझर (१९५८), माउंटॉलिव्ह (१९५८) आणि क्ली (१९६०) ह्या नावांनी हे चार भाग स्वतंत्रपणेही प्रसिद्ध झालेले आहेत. द अलेक्झांड्रिया क्कार्टेटने ड्यूरेलला आघाडीच्या कादंबरीकारांत स्थान मिळवून दिले. स्थळांचे प्रभावी चित्रांकन करण्याचे ड्यूरेलचे सामर्थ्य ह्या कादंबरीतही अनुभवास येते. ॲलेक्झांड्रिया नगरीची विविध रूपे ह्या कादंबरीतून त्याने रंगविलेली आहेत. ही नगरीच ह्या कादंबरीची नायिका होय. सत्याची सापेक्षता हा ह्या कादंबरीतील एक महत्त्वाचा विषय. ड्यूरेलने निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा लोकविलक्षण असल्या, तरी खोट्या वाटत नाहीत. त्याचे रचनाकौशल्यही लक्षणीय आहे. अन्य काही कादंबऱ्या, प्रवासवर्णने, पद्यनाटके असे लेखनही त्याने केले आहे.

इंग्लंडपेक्षा यूरोपमध्ये तो अधिक लोकप्रिय ठरला कारण त्याचे साहित्यिक भूमिकेचे नाते पूस्त व टोमास मान ह्या कादंबरीकारांशी अधिक निकटचे.

संदर्भ : 1. Moore, H. T. Ed. The World of Lawrence Durrell, Carbondale (Illinois), 1962.

           2. Unterecker, John, Lawrence Durrell, New York and London, 1964.

 

हातकणंगलेकर, म. द.