एथरिज, सर जॉर्ज : (१६३५ ?–१६९२ ?). प्रसिद्ध इंग्रज नाटककार व ‘रेस्टोरेशन’ काळातील ‘कॉमेडी ऑफ मॅनर्स’  किंवा आचारविनोदिनी ह्या नाट्यप्रकारचा प्रणेता. त्याचा जन्म बार्कशर परगण्यातील मेडनहेड येथे झाला असावा. द कॉमिकल रिव्हेंज, ऑर लव्ह इन अ टब ह्या एथरिजच्या पहिल्याच नाटकाचा यशस्वी प्रयोग १६६४ मध्ये लंडन येथे झाला आणि त्याला प्रसिध्दी मिळाली. १६६८ मध्ये त्याचे शी वुड इफ शी कुड आणि १६७६ मध्ये द मॅन ऑफ मोड, ऑर सर फॉप्लिंग फ्लटर ही नाटके रंगभूमीवर आली. काही काळ कॉन्स्टँटिनोपल येथे इंग्लंडच्या राजदूताचा चिटणीस म्हणून तसेच बव्हेरियातील रेगेन्झबर्ग येथे इंग्‍लंडचा प्रातिनिधिक दूत म्हणून त्याने काम केले. दुसर्‍या जेम्सचा (१६३३–१७०१) तो पाठीराखा होता. इंग्‍लंडमध्ये राज्यक्रांती होऊन (१६८८) दुसरा जेम्स पदच्युत झाल्यानंतर त्याच्यापाठोपाठ तो पॅरिस येथे गेला (१६८९) व तेथेच त्याचे निधन झाले. प्रातिनिधीक दूत म्हणून त्याने केलेला पत्रव्यवहार लेटरबुक ह्या नावाने सिबिल रोझनफेल्ड यांनी संपादून प्रसिद्ध केला आहे (१९२८).

एथरिजची नाटके विनोदी असून त्यांवर ⇨ मोल्येरचा प्रभाव आहे. तत्कालीन समाजातील कृत्रिमता, नैतिक मूल्यांबाबतचे औदासीन्य, लैंगिक स्वैरता इत्यादींचे चित्रण त्याने केले. ते चित्रण अत्यंत वास्तव असले, तरी त्याला तरल काव्यात्मकतेची डूबही आहे. त्याच्या नाटकांतील उत्तान अश्लीलता त्यांतील अभिजात विनोदामुळे झाकून जाते.

संदर्भ : Brett-Smith, H. F. B. The Dramatic Works of Sir George Etherege, 2 Vols., Oxford, 1927.

भागवत, अ. के.