कमिंग्ज, एडवर्डएस्टलिन : (१४ ऑक्टो. १८९४ – ३ सप्टेंबर १९६२). आधुनिक अमेरिकन कवी. साहित्यातील एक विक्षिप्त बंडखोर म्हणून प्रसिद्ध. जन्म केंब्रिज(मॅसॅचूसेट्स) येथे. हार्व्हर्ड येथे विश्वविद्यालयीन शिक्षण घेतल्यावर त्याने पहिल्या महायुद्धात शुश्रूषापथकात काम केले. या काळातील त्याचे अनुभव द इनॉर्मस रूम (१९२२) या आत्मचरित्रात आलेले आहेत. ट्यूलिप्स अँड चिम्‍नीज (१९२३) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह. आपल्या पुस्तकांना शीर्षके देण्याच्या बाबतीतल्या त्याच्या बंडखोरपणाची साक्ष इज्‌ ५ (१९२६), नो थँक्स (१९३५), I × I (१९४४) हे काव्यसंग्रह देतात. १९३० साली प्रसिद्ध झालेल्या त्याच्या एका पुस्तकाला मुळी नावच नाही. या संग्रहांच्या अंतरंगातही असाच बंडखोरपणा दिसतो. अमेरिकन लोकांच्या शिष्टसंमत जीवननिष्ठांचा व विशेषतः त्यांच्या भोगवादाचा तीव्र उपहास, जॅझच्या लयीवर आधारलेल्या वृत्तांचा व बोलभाषेतील शब्दांचा उपयोग, शुद्धलेखनाच्या नियमांची पायमल्ली व कवितेच्या अर्थानुसार ओळींची विक्षिप्त वाटणारी रचना (उदा., धुराचे वर्णन करणाऱ्या ओळी वेड्यावाकड्या छापणे) अशी अनेक रूपे हा बंडखोरपणा घेतो. अतिरिक्त बंडखोरपणामुळे कमिंग्जमधील भावकवी वाया गेला, असे बरेच टीकाकार मानतात. नॉर्थ कॉनवे येथे तो निर्वतला.

संदर्भ :1. Friedman, Norman, E. E. Cummings, The Art of His Poetry, Baltimore, 1962.

2. Norman, Charles, Magic Maker A Biography of E. E. Cummings, New York, 1958.

नाईक, म. कृ.