कॉलिंझ, विल्यम विल्की : ( जानेवारी १८२४ — २३ सप्टेंबर १८८९). इंग्रज कादंबरीकार. जन्म लंडन येथे. १८४९ मध्ये बॅरिस्टर झाला. तथापि वकिली न करता त्याने स्वत:ला लेखनासच वाहून घेतले. अँटोनिया, ऑर द फॉल ऑफ रोम (१८५०) ही त्याची पहिली कादंबरी ऐतिहासिक होती. तथापि चार्ल्स डिकिन्झच्या हाउसहोल्ड वर्ड्स ह्या नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या द वूमन इन व्हाइट (१८६०) ह्या कादंबरीमुळे इंग्रजी हेरकथेचा जनक म्हणून त्याचा लौकिक झाला. उत्कंठा निर्माण करणाऱ्या गुंतागुंतीच्या प्रसंगांतून रहस्याची उकल करण्याचे तंत्र त्याने आत्मसात केले होते. आपल्या हेरकथांत त्याने शास्त्रीय शोध, भौगोलिक पार्श्वभूमी, गुन्हे शोधण्याची नवीन तंत्रे ह्यांचा उत्तम उपयोग करून घेतला आहे. त्याच्या इतर उल्लेखनीय कांदबऱ्या अशा : हाइड अँड सीक (१८५४), द डेड सिक्रेट (१८५७), द मूनस्टोन (१८६८) इत्यादी. लंडन येथेच तो मरण पावला.

देशपांडे, मु. गो.