वायझेल, एली : (३० सप्टेंबर १९२८-). अमेरिकन कादंबरीकार. जन्माने रूमानियन ज्यू. बहुतांश लेखन फ्रेंचमधून. जन्म रूमानियातील सिगेट येथे. तेथेच त्याचे आरंभीचे आयुष्य गेले. तेथे त्याने ज्यू धर्म आणि परंपरा ह्यांचे शिक्षण घेतले. १९४४ साली नाझींनी सिगेटमधील ज्यूंना औशाव्हित्स येथे हद्दपार केले. त्यात एलीचा व त्याच्या अन्य कुटुंबियांचाही अंतर्भाव होता. औशाव्हित्स येथे त्याच्या आईला आणि धाकट्या बहिणीला ठार मारण्यात आले. त्यानंतर एलीला गुलाम मजूर म्हणून बृखनव्हाल्ट येथे पाठविण्यात आले. तेथे त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या वडिलांचा वध करण्याता आला. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर एली फ्रान्समध्ये स्थायिक झाला. सॉर्‌बॉन विद्यापीठात त्याने तत्त्वज्ञानाचे शिक्षण घेतले (१९४८- ५१). फ्रेंच आणि इझ्राएली वृत्तपत्रांसाठी त्याने लेखन केले. १९५६ साली तो अमेरिकेस गेला आणि १९६३ साली त्याला अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. तेथे सिटी कॉलेज ऑफ न्यूयॉर्क आणि बॉस्टन कॉलेज येथे त्याने अध्यापन केले.

नाझींच्या छळछावण्यांतील दुःख एलीने भोगले होते. तेथील भीषण अनुभवांवर आधारलेली अँड द वर्ल्ड हॅज रिमेन्‌ड सायलेंट (१९५६, इं. शी.) ही कादंबरी त्याने यिद्दिश भाषेत लिहिली. हेच त्यांचे पहिले पुस्तक. नाइट(१९५८, इं.शी.) ह्या नावाने त्याची संक्षिप्त आवृत्ती निघाली. एका यातनाविश्वाचे अत्यंत प्रभावी चित्रण म्हणून समीक्षकांनी त्याची प्रशंसा केली. द टाउन बियाँड द वॉल(१९६२, इं. शी.), ए बेगर इन जेरूसलेम(१९६८, इं.शी.), सोल्स ऑन फायर(१९७२, इं. शी.), द टेस्टामेंट(१९८०, इं. शी.) आणि वर्ड्‌‌‌स फ्रॉम स्ट्रेंजर(१९८२, इं. शी.) ह्या त्याच्या अन्य कादंबऱ्या फ्रेंचमध्ये लिहिलेल्या आहेत.

नाझींच्या राजवटीत ज्यूंवर झालेले अत्याचार, त्यांनी केलेला नरमेध हा एलीच्या लेखनाचा विषय असला, तरी त्यातून एक मूलभूत मानवी समस्या म्हणून त्याने हिंसाचारी वृत्तीचा विचार केलेला असल्यामुळे त्याच्या व्यक्तिगत अनुभवांना त्याने वैश्विक पातळीवर नेऊन ठेवले आहे. १९८६ सालचे शांततेचे नोबेल पारितोषिक त्याला देण्यात आले. हिंसा, दडपणूक, वंशवाद अशा दुष्ट प्रवृत्तींनी आजही भरलेल्या ह्या जगात एली वायझेल हा एक थोर आध्यात्मिक नेता आणि मार्गदर्शक ठरतो,असा गौरव त्या वेळी करण्यात आला. त्या यातनापर्वातून मी जिवंत राहिलो पण जे प्राणांना मुकले, त्यांचे आपण काही देणे लागतो, अशी माझी भावना असल्यामुळे त्या पर्वाची कथा सांगण्यालाच मी माझे आयुष्य वाहून घेतले. जगाने आपली आठवण ठेवावी, असे त्या दुःखात्म्यांना उत्कटतेने वाटत होते आणि ती न ठेवणे हा त्यांचा विश्वासघात ठरेल, असे उद्‌गार नोबेल पारितोषिकाचा स्वीकार करताना त्याने काढले होते.

  कुलकर्णी, अ. र.