ल्यूकस, एडवर्ड व्हेरॉल : (११ जून १८६८-२६ जून १९३८). इंग्रज पत्रकार आणि निवंधकार. जन्म एल्थम, केंट येथला. लंडन विद्यापीठात काही काळ शिक्षण. ससेक्स डेली न्यूज ह्या पत्रात वयाच्या अठराव्या वर्षी नोकरीस लागला. ग्लोब, पंच ह्यांसारख्या नियतकालिकांतून त्याने लेखन केले. विविध विषयांवर हलकेफुलके लेखन करणे हे त्याचे वैशिष्ट्य. त्याच्या लेखनातून त्याचे सूक्ष्म निरीक्षण, बहुश्रुतता, संयत परंतु परिणामकारक विनोदाने नटलेली शैली ह्यांचा प्रत्यय येतो. विख्यात इंग्रज साहित्यिक ⇨चार्ल्स लँब ह्याच्या त्याने लिहिलेल्या चरित्रामुळेही-लाइफ ऑफ चार्ल्स लँब त्यास प्रसिद्धी मिळाली. चार्ल्स लँब आणि मेरी लँब  ह्यांच्या ग्रंथांचे संपादनही त्याने केले (द वर्क्स ऑफ चार्ल्स अँड मेरी लँब, १९०३-०५). चार्ल्स लँबच्या शैलीचे संस्कार त्याच्या निबंधलेखनावरही झालेले दिसतात. द ओपन रोड (१८९९), द फ्रेंड्ली टाउन (१९०५), लॉइटरर्स हार्वेस्ट (१९१३) हे त्याचे काही उल्लेखनीय निबंधसंग्रह. काही प्रवासवर्णनात्मक ग्रंथही त्याने लिहिले आहेत.

बापट, गं. वि.