लिव्हिस, फ्रँक रेमंड : (१४ जुलै १८९५-१४ एप्रिल १९७८). विसाव्या शतकातील श्रेष्ठ इंग्रज समीक्षक. जन्म केंब्रिजचा. केंब्रिज येथील पर्स स्कूल व इमॅन्युएल कॉलेजमध्ये त्याचे शिक्षण झाले. पहिल्या महायुद्धात रुग्णवाहिकांवर त्याने काम केले. १९२५ मध्ये इमॅन्युएल कॉलेजमध्ये त्याने अध्यापन करावयास आरंभ केला. १९३६ मध्ये केंब्रिजच्या डाउनिंग कॉलेजचा तो अधिछात्र (फेलो) निवडला गेला. केंब्रिज विद्यापीठातील इंग्रजीचे प्रपाठकपदही त्याला मिळाले होते. १९६२ मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर अनेक विद्यापीठांत अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्याने काम केले.
लिव्हिसची पत्नी क्विनी डॉरोथी रॉथ ही स्वतः एक दर्जेदार समीक्षक होती. समीक्षेला वाहिलेल्या स्क्रूटिनी ह्या त्रैमासिकाची स्थापना त्याने आपल्या पत्नीच्या साहाय्याने १९३२ साली केली. ह्या त्रैमासिकासाठी लिहिलेल्या समीक्षात्मक लेखांनी तसेच त्याच्या ग्रंथांनी समीक्षेच्या क्षेत्रात मोठा प्रभाव निर्माण केला. त्याच्या ग्रंथात न्यू बेअरिंग्ज इन इंग्लिश पोएट्री (१९३२) , फॉर कंटिन्यूइटी (१९३३), कल्चर अँड इनव्हायर्नन्मेंट (१९३३) रिव्हॅल्यूएशन : ट्रॅडिशन अँड डिव्हलपमेंट इन इंग्लिश पोएट्री (१९३६), द ग्रेट ट्रॅडिशन (१९४८), द कॉमन परस्यूट (१९५२) , डी . एच्. लॉरेन्स , नॉव्हेलिस्ट (१९५५), ॲना करेनिना अँड अदर एसेज (१९६७), इंग्लिश इन अवर टाइम अँड द युनिव्हर्सिटी (१९६९) आणि डिकिन्झ द नॉव्हेलिस्ट (१९७०) ह्यांचा समावेश होतो. स्क्रूटिनीमधील महत्त्वाचे, पण अन्य कुठे पुनर्मुद्रित न झालेले त्याचे काही लेख ए सिलेक्सन फ्रॉम स्क्रूटिनी ह्या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत (२ खंड, १९६८). त्याच्या पत्नीचे महत्त्वपूर्ण असे काही समीक्षात्मक लेखनही त्यात अंतर्भूत आहे.
लिव्हिसच्या न्यू बेअरिंग्ज … आणि रिव्हॅल्यूएशन … ह्या ग्रंथांवर टी. एस्. एलियटचा प्रभाव आहे. रिव्हॅल्यूएशन … मध्ये सतराव्या शतकाच्या आरंभापासून एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापर्यंतच्या इंग्रजी कवितेची परंपरा व तिचा विकास ह्यांचे दर्शन त्याने घडविले आहे. विसाव्या शतकाच्या दृष्टिकोणातून इंग्रजी कवितेच्या इतिहासाचे पुनर्मूल्यांकन करण्याचा पहिला सुसंगत प्रयत्न म्हणून ह्या पुस्तकाचा उल्लेख केला जातो. द ग्रेट ट्रॅडिशनमध्ये इंग्रजी कादंबरीवाङ्मयाचे पुनर्मूल्यांकन करून त्याने जेन ऑस्टेन, जॉर्ज एलिशट, हेन्री जेम्स, जोसेफ कॉनरॅड आणि डी. एच्. लॉरेन्स हे इंग्रजी कादंबरीच्या परंपरेतले महान कादंबरीकार होत, असे दाखविले आहे. लॉरेन्सला त्याने जेन ऑस्टेनपासून जोसेफ कॉनरॅडपर्यंतच्या थोर कादंबरीकारांचा वारसदार मानले. डी. एच्. लॉरेन्स … हे एक खास पुस्तकच त्याने लॉरेन्सच्या कादंबरीलेखनावर लिहिले. १९५५ नंतर चार्ल्स डिकिन्झ आणि टॉलस्टॉय ह्या कादंबरीकारांतही त्याला स्वारस्य निर्माण झाले होते. ॲना करेनिना … आणि डिकिन्झ … ही त्याची दोन पुस्तकेही त्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. द कॉमन परस्यूट हा त्याच्या समीक्षात्मक लेखांचा संग्रह. शेक्सपिअर, मिल्टन, जॉन्सन, पोप ह्यांच्यावरील लेख मोलाचे आहेत. तसेच इ. एम्. फॉर्स्टर, टी. एस्. एलियट आणि डी. एच्. लॉरेन्स ह्यांच्यावरील लेख त्याची आधुनिक साहित्याबद्दलची अस्सल आस्था प्रकट करणारे आहेत.
कादंबरीकार आणि वैज्ञानिक सी. पी. स्नो ह्याने विज्ञान आणि मानव्यविद्या ह्यांच्यातील संबंधांवर केलेल्या काही विधानांचा परखड परामर्श घेण्याच्या हेतूने लिव्हिसने टू कल्चर्स ? द सिग्निनफिकन्स ऑफ सी. पी. स्नो (१९६२) हे पुस्तक लिहिले आणि ते वादग्रस्त ठरले.
आपल्या समीक्षेत नैतिक अभिरुची आणि नैतिक यथादर्शन (पर्स्पेक्टिव्ह) ह्यांवर त्याने भर दिला. साहित्यकृती ही एक संकुल पण संतुलित संरचना असून ती समजून घेण्यासाठी बाहेरील जगाचे आकलन आणि नैतिक यथादर्शनाची गरज आहे, अशी त्याची भूमिका होती. आपली मते त्याने अनेकदा धारदारपणे आणि तडजोड नाकारून मांडल्यामुळे त्याला अनेक विरोधक निर्माण झाले. केंब्रिज येथे तो निधन पावला.
संदर्भ : 1. Bilan, R. P. The Literary Criticism of F. R. Leavis, Cambridge, 1979.
2. Mckenzie, D. F. Allum, M. P. F. R. Leavis : A Check- List, 1924-64, 1966.
कळमकर, य. शं.